Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमहापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची "मॅरेथॉन" बैठक

महापालिका भवनात आमदार महेश लांडगे यांची “मॅरेथॉन” बैठक

पिंपरी चिंचवड : महानगरपालिका क्षेत्रातील संतपीठ, सफारी पार्क आणि चिखली येथील प्रस्तावित रुग्णालय अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी शनिवारी महापालिका प्रशासकीय भवनामध्ये मॅरेथॉन बैठक घेतली.

विविध प्रश्नांवर चर्चा करत तातडीने हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावीत यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली. “तांत्रिक मुद्द्यांवर बोट न ठेवता विकास कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर द्या” असेही आमदारांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.

यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी पक्षनेते नामदेव ढाके, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रभारी व माजी नगरसेवक शंकर जगताप, प्रशासक व आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ तसेच सर्व विभागांचे तसेच क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार लांडगे म्हणाले, की शहरातील कोणतेही विकास काम प्रशासकीय राजवट आहे, म्हणून तांत्रिक मुद्द्यावर प्रलंबित ठेवू नका. प्रत्येक पदाधिकारी शहरातील प्रत्येक विकास कामांकडे बारीक लक्ष ठेवून आहे. विकास कामांच्या प्रगती बाबत वेळोवेळी आढावा घेतला जाईल, असेही अधिकाऱ्यांना आमदार लांडगे यांनी सांगितले.
नागरिकांचे आरोग्य, पाणी आणि रस्ते या मुद्द्यांवर प्रकर्षाने लक्ष द्या असा सूचना देखील यावेळी आमदारांनी अधिकाऱ्यांना केले आहेत.

मॅरेथॉन बैठकीतील प्रमुख विषय पुढीलप्रमाणे :

संतपीठ उर्वरित कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. सफारी पार्कचा प्रस्ताव लवकर राज्य शासनाकडे पाठवण्यासाठी पाठपुरावा करावा. स्पाईन रोडचा उर्वरित रोड ते त्रिवेणीनगर चौक रोडचे काम पुर्ण करावे. या रस्त्याचे काम येत्या ऑक्टोबर पर्यत पुर्ण करुन ६० टक्के ट्राफिक कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे कामाला गती द्यावी. ज्या कामाची तरतूद संपली आहे त्यांना तरतूद वाढवून द्यावी. पीएमपीएलच्या नवीन ७ मीटर गाड्यांची खरेदी रद्द करणे. शहरातील सर्व प्रभागातील प्रलंबित कामांसाठी तरतूद उपलब्ध करून द्यावी. नागरवस्ती विभाग ज्या योजना प्रशासन काळात बंद केल्या आहेत त्या तात्काळ सुरु कराव्यात. गोशाळा बांधण्याचे नियोजन करून शहरात चार विभाग करून जनावरांच्या डॉक्टरांची नेमणूक करावी.

आरोग्य सुविधांना प्राधान्य द्या – आमदार लांडगे

अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार लांडगे यांनी सूचना केल्या की, नागरिकांच्या आरोग्याला सर्वप्रथम प्राधान्य दिले जावे. त्या दृष्टीने शहरातील प्रलंबित हॉस्पिटलची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. ग्रामीण उपनगरीय भागामध्ये येत असलेल्या चिखली येथील नवीन पालिका हॉस्पिटलचे काम सुरु करा, अशा सूचना यावेळी आमदारांनी केल्या आहेत.

आमदारांच्या सूचनांचे तंतोतंत पालन – आयुक्त पाटील

आयुक्त राजेश पाटील म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होईल. याकडे प्रशासन कटाक्षाने लक्ष देणार आहे. सध्यातरी प्रभागातील तरतुदी किंवा विकास कामांना कोणताही अडसर नाही. वेळेत ही कामे पूर्ण होतील याकडे प्रशासनाचे लक्ष आहे. ऑक्टोबरपर्यत शहरातील कोणत्याही कामांना अडचण येणार नाही. परंतु, ऑक्टोबरनंतर नव्याने अंदाजपत्रक केले जाईल.

  • क्रांतिकुमार कडुलकर
संबंधित लेख

लोकप्रिय