Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडमराठा सेवा संघ सामाजिक क्रांती घडवेल : प्रकाश जाधव

मराठा सेवा संघ सामाजिक क्रांती घडवेल : प्रकाश जाधव

संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर :
छत्रपती शिवराय, फुले, शाहु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चार्वाक, बुद्ध, तुकोबा, अण्णा भाऊ साठे यांच्यासारख्या असंख्य बहुजनवादी महापुरुषांच्या विचारांची सांगड घालून खेडोपाड्यात मराठा सेवा संघाने प्रबोधन केले आहे.इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांना आळा घालण्याचे काम केले आहे. जनतेसमोर खरा इतिहास मांडून सर्वसामान्यांमध्ये महापुरूषांविषयीची अस्मिता जागी केली आहे.आगामी काळात मराठा सेवा संघ हा सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवून दिशा देईल,असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव म्हणाले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा सेवा संघाचा 33 वा वर्धापन दिन चिंचवड येथील दिनकर गजाबा भोईर व्यायाम शाळेमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना जाधव बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अशोक सातपुते यांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोभे, जिल्हा उपाध्यक्ष नकुल भोईर, शहर कार्याध्यक्ष वैभव जाधव, शहर सचिव मंगेश चव्हाण, उपाध्यक्ष सुभाष जाधव, मुळशी तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, प्रवक्ते बाळासाहेब मुळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी हभप देवराव महाराज कोठारे, निरंजन सोखी, अशोक सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांनी मराठा सेवा संघाच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केली. या वेळी शिवचरित्राचे तसेच मिठाईचे वाटप करण्यात आले.

संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे म्हणाले की, संपूर्ण मानवजातीच्या समानतेचे तत्वज्ञान मांडणारा, महाराष्ट्राच्या सामाजिक, वैचारिक,सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदु मराठा सेवा संघ ठरलेला आहे. आधुनिकतेची जोड घालून बहुजन समाजाला अंधश्रद्धेपासून वाचविण्यासाठी मराठा सेवा संघ नेहमी अग्रेसर असतो. लहू अनारसे यांनी सूत्रसंचालन केले. संजय जाधव यांनी आभार मानले. संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय