निसर्ग सृष्टी मध्ये प्रत्येक ऋतुमध्ये त्या त्या हवामानानुसार जीव जंतू पासून मानवा पर्यंत आरोग्यसंवर्धनाच्या दृष्टीने जीवनोपयोगी फळे आणि वनस्पती निर्माण करून निसर्गाने माणसावर अनंत उपकार केले आहेत. आता काही आठवड्यात वैशाख वणवा सुरू होईल, हवामानातील बदल अति घातक होत आहेत. या भर तप्त उन्हात मोहोरलेली आंब्याची झाडे ग्रामीण व शहरी भागात दिसतात.(Mango panhe)
आंब्याच्या विशिष्ठ स्वादामुळे त्याला फळांचा राजाच म्हणतात. मंगलकार्य, सण, उत्सव, देवपूजा आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने आंब्याला खूप महत्त्व आहे. आमराईत गारवा आणि प्रसन्नता मिळते. गर्भवती स्त्रीचे आमराईत डोहाळजेवण करण्याची पद्धत आहे. अर्थाजनाच्या दृष्टीने आंब्याचे महत्व खूप आहे. कैरीचे लोणचे, मुरंबे, आंबापोळी, कैरीचे सरबत, आंब्याचा गोळा, आंबा बर्फी असे विविध पदार्थ आंब्यापासून केले जातात. खेड्यात अनेक ठिकाणी महिला गटातर्फे हे पदार्थ केले जातात. स्त्रियांना स्वावलंबी बनवण्यात या वृक्षाचा वाटा आहे.(Mango panhe)
आंबा हा वृक्ष सर्वसाधारणपणे सहा ते पंधरा मीटर उंच असतो. कधी कधी २० ते ३० मीटर उंचही वाढतो. झाड डेरेदार आणि भरपूर सावली देणारे असते. आम्रावृक्षाचा उल्लेख पुराणात आणि प्राचीन साहित्यात बऱ्याच ठिकाणी आढळतो. या झाडाला प्रजापतीचे रूप मानतात. आम्रमंजिरी ( मोहोर) हि कामदेवाच्या पाच बाणातील एक बाण आहे असे मानतात. महाकवी कालिदासाच्या साहित्यात मनाला प्रसन्नता देणाऱ्या आमराईचे आणि कोकीळ कुजनाचे वर्णन आढळते. वेद काळी आंबा हे राष्ट्रीय फळ होते.(Mango panhe)
बहुगुणी आम्रवृक्ष, भर उन्हात छाया देतो, आरोग्य रक्षण करतो
आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वं सी (Vitamin C) असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. आंबा हे जीवनसत्त्व एंटीऑक्सिडंट्स (Antioxidants) चे उत्तम स्त्रोत आहे ते तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि त्वचेची चमक राखण्यास मदत करते. आंब्यात फायबरही असते जे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत करते. कच्च्या आंब्यामध्ये लिंबाच्या आम्लासारखे गुणधर्म असतात, जे खोकला आणि सर्दीसाठी उपयोगी असतात.
आंब्याच्या पानांचा सुद्धा आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला जातो. आंब्याचा हंगाम एप्रिल ते जून पर्यंत असतो. या हंगामात आंबा ताजा आणि चांगल्या चवीचा असतो. आंब्याची पानं व खोडाची साल तुरट असून त्यांचा वापर संधिवात व रोगसंसर्ग यांवर केला जातो, तर आंब्याचा डिंक त्वचारोग आणि टाचेच्या भेंगांवरील उपचारात गुणकारी असतो. कैरी किंवा आंब्याचे कच्चे फळ आंबट-तुरट असून त्यापासून लोणचे, पन्हे, मुरंबा, छुंदा, यांसारखे पदार्थ तर बनविले जातातच, पण त्याचे तुकडे मीठ-तिखट लावून खाण्याच्या नुसत्या विचारानेदेखील तोंडाला पाणी सुटते. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात व आशियातसुद्धा कैर्या/आंब्यांपासून अनेक पाककृती केल्या जातात.
कोकणात उन्हाळ्यात कैरी व मीठ लावून खातात,कैरी म्हणजे कोवळा आंबा,अतिशय हिरवागार,त्यातील आतली कोय अतिशय शुभ्र धवल असते, ही कैरी ही खूप चवदार,तुरट, आंबट असते. शहरात कैरीचे पदार्थ कमी खातात, शीतपेयांचा धूमधडाका सुरू असतो. खरच शीत पेयामध्ये उष्णता,किंवा उष्माघात टाळण्यासाठी काहीही नसते. मात्र उन्हाळी आजारापासून लहान थोर सर्वांना उष्माघातापासून वाचण्यासाठी कोकणच्या कैरीच्या पेयांचे सेवन करा, म्हणजे कैरीचे पन्हे. कैरीचे पन्हे अनेकजण आवडीने पितात. यामुळे उष्माघातापासून दूर ठेवणारे हे पेय पिल्यास ताजेतवाने वाटते. हे थंडगार पन्हे कसे बनवावे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.(Mango panhe)
कैरीचे पन्हे बनवण्यासाठी साहित्य
साहित्य:
१) २ कैऱ्या
२) दीड वाटी साखर
३) १ छोटा चमचा वेलची पूड
४) ५-६ पुदिन्याची पाने
५) काळ मीठ
६) साध मीठ चवीनुसार
७) पाणी
८) बर्फ
कसे बनवायचे बघा
आधी कैऱ्या स्वच्छ धुवून कूकरला लावून शिजवून घ्याव्यात.थंड झाल्या की त्यांची साल काढुन गर काढुन घ्यावा. या गरात साखर पुदिन्याची पान घालून मिक्सर मध्ये फिरवा,गाळणीने गाळून घ्यावे व साध मीठ, काळ मीठ घालून ग्लासमध्ये थोडेसे पन्हे घ्यावे, पाणी व बर्फाचे तुकडे घालून थंडगार पन्ह हळूहळू प्राशन करा. हे पन्हे ३-४ दिवस टिकते. घट्ट पन्हे फ्रिजमध्ये बॉटल मध्ये भरून ठेवावे. द्यायच्या वेळेस पाणी व बर्फ घालून थंडगार पन्हे सर्व्ह करावे.