Saturday, April 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडश्रमिक चळवळीतील उत्कृष्ठ संघटक, लाल बावट्याचा आधार गेला

श्रमिक चळवळीतील उत्कृष्ठ संघटक, लाल बावट्याचा आधार गेला

कामगार नेत्यांची कॉम्रेड शरद गोडसे यांना आकुर्डीत श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड
: ग्रीव्ह्ज कॉटन अलाईड एम्प्लॉईज युनियन (आयटक) चे उपाध्यक्ष दिवंगत कॉम्रेड शरद गोडसे यांना श्रमशक्ती भवन आकुर्डी येथे आयोजित शोकासभेमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील कामगार नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी आयटक चे जेष्ठ कामगार नेते कॉम्रेड माधव रोहम यांच्या उपस्थितीत कॉम्रेड शरद गोडसे यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष पुणे जिल्हा सचिव कॉम्रेड अरविंद जक्का म्हणाले, आयुष्यातील सलग 50 वर्षे त्यांनी पुणे जिल्ह्यातील कामगार चळवळीसाठी अर्पण केली.लाल बावट्याच्या विचाराने प्रेरित त्यांनी विविध लढ्यात रस्त्यावर उतरून कामगार संघटनांना बळ दिले.

तर जेष्ठ कम्युनिस्ट नेते डॉ.सुरेश बेरी म्हणाले, त्यांचे जीवन संघर्षमय होते. 1970 ते 1980 च्या कालखंडात कामगारांच्या किमान आर्थिक मागण्यासाठी कामगार संघटना बांधत होते. सरकार आणि कंपनी व्यवस्थापन यांची दडपशाही सुरूच होती. त्या विरोधात विविध आंदोलनात आघाडीवर राहून तरुण वयात त्यांनी लाल बावटा हातात घेतला. जमिनीवर उतरून चळवळीसाठी त्याग करणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.

नागरी हक्क सुरक्षा समिती चे मानव कांबळे म्हणाले, पिंपरी चिंचवड औद्योगिक कामगारांच्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे कॉम्रेड गोडसे हे एक लोकप्रिय कामगार नेते होते.

तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुणे जिल्हा सचिव गणेश दराडे म्हणाले, कामगार चळवळीत सध्या निराशेचे वातावरण आहे. लाल बावट्याचा कामगार वर्गीय विचार पुढे नेण्यासाठी कार्यरत राहणे हीच कॉम्रेड गोडसे यांना श्रद्धांजली आहे.

या शोकसभेला कॉम्प्टन ग्रीव्ह्ज नाशिक, पियाजीओ व्हेहिकल्स बारामती, प्रीमियर ट्रान्समिशन, नागरी हक्क सुरक्षा समिती, आयटक, सिटू, माकप, भाकप सह विविध कामगार संघटना,संस्थाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेचे अध्यक्षस्थानी एच आर मॅनेजर प्रीमियर ट्रान्समिशन लि चिंचवड चे जयंत हर्षे होते.

कॉम्रेड शिवराज शिंदे, श्रीपाद देशपांडे, रामभाऊ लोंढे, एस.जी‌सुळके, डी. पी. गायधनी, टी. ए. खराडे, नितीन आकोटकर, किरण पेडणेकर आदी कामगार प्रतिनिधीं या शोकसभेला उपस्थित होते. कॉम्रेड अनिल रोहम यांनी प्रास्ताविक केले तर दत्तात्रय गायधनी यांनी सूत्रसंचालन केले. उमेश धर्मगुत्ते, कुंदन खानका यांनी संयोजन केले.

– क्रांतिकुमार कडुलकर

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय