Monday, May 20, 2024
HomeNewsजेजुरीचा खंडोबा गड भाविकांनी फुलला

जेजुरीचा खंडोबा गड भाविकांनी फुलला

महाशिवरात्रीनिमित्त जेजुरीच्या खंडोबा गडावर त्रैलोकीच्या दर्शनाकरिता भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी संपूर्ण गड भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. खंडेराया हा शिवशंकराचा अवतार मानला जातो.
गडकोटातील मुख्य मंदिरात असलेल्या स्वयंभू शिव-पार्वतीच्या शिवलिंगाला मृत्यूलोकीचे मुख्य मंदिरातील भूगर्भात असलेले पाताळलोकीचे शिवलिंग तर मुख्य मंदिराच्या कळसातील शिवलिंगाला स्वर्गलोकीचे शिवलिंग समजले जाते.

मृत्यूलोकीचे वगळता भूगर्भातील व कळसातील शिवलिंग वर्षातून एकदाच म्हणजे महाशिवरात्रीच्या पहाटे भाविकांना देवदर्शनासाठी खुले असते. सालाबादप्रमाणे शनिवारी (दि.18) पहाटे दोन वाजता तिन्ही शिवलिंग भाविकांना देवदर्शनासाठी खुली करण्यात आली. तत्पूर्वी प्रमुख मानकरी, सेवेकरी पुजारी व ग्रामस्थांच्या वतीने विधिवत पूजा अभिषेक करण्यात आला.

यावेळी सहधर्मादाय आयुक्त सुधीर बुक्‍के, तहसीलदार रुपाली सरनोबत, पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, देवसंस्थानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दिवसभरात हजारो भाविकांनी त्रैलोकीच्या दर्शनाचा लाभ घेतला. मुंबई येथील दोन भाविक व देवसंस्थानच्या वतीने फराळ व फळे यांची व्यवस्था करण्यात आली होती. गडकोटातील मंदिराबरोबरच परिसरातील लवथळेश्‍वर, बल्लाळेश्‍वर, शंकेश्‍वर आदी शिवमंदिरातही देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.

महाशिवरात्री व लगेच सोमवती उत्सव असल्याने तसेच भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्‍यता गृहीत धरून गडावर जाणारा आपत्कालीन घाटरस्ता बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे देवसंस्थानची रुग्णवाहिका वगळता दुचाकी, चारचाकी वाहने या मार्गावरून तीन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय