विविध अपघातांमध्ये हात गमाविल्यानंतर किंवा जन्मत:च हात नसलेल्यांसाठी आयुष्य प्रचंड संघर्षमय होते. मात्र वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे यावरदेखील मात करता येणे शक्य झाले आहे.
सर्व प्रकारच्या क्रिया करू शकणारा स्वयंचलित हात विकसित करण्यात आला असून मोबाईल ॲपच्या माध्यमातूनदेखील याला संचालित करता येणे शक्य झाले आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित असलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक हॅंड’ ठरला आहे.
हैदराबाद येथील एका कंपनीने याला विकसित केले आहे. वजनाने अतिशय हलका असलेल्या या ‘बायोनिक हॅंड’मध्ये १८ प्रकारच्या ग्रिप्स आहेत. याचा उपयोग करून ८ किलोपर्यंतचे वजन सहजपणे उचलता येणे शक्य आहे. हा हात बॅटरीच्या माध्यमातून चार्ज होतो व एका चार्जिंगमध्ये सहजपणे ८ ते १० तास याचा वापर करता येतो. विशेष म्हणजे याला मोबाईल ॲपच्या माध्यमातून संचालित करता येणे शक्य आहे. ब्लुटूथच्या माध्यमातून याला कनेक्ट केल्यानंतर यातील विविध कंट्रोलदेखील वापरता येतात. यासोबतच यात ऑनलाईन अपडेट्सदेखील देण्यात येत आहेत, अशी माहिती संबंधित कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक विजय बगाडे यांनी दिली.