Friday, November 22, 2024
Homeकृषीजुन्नर : पावसाने मारली दांडी, भात लावणी खोळंबली

जुन्नर : पावसाने मारली दांडी, भात लावणी खोळंबली

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात भात लावणी खोळंबली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी पावसाने लवकरच सुरुवात केली. यावर्षी लवकर पाऊस असल्यामुळे भात पेरणी देखील लवकर झाली होती. परंतु भात लावणीचा हंगाम सुरू झाल्यानंतर पावसाने दांडी मारली आहे. जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात भात लावणी खोळंबली असून बळीराजा चिंतेत आहे.

हवामान खात्याने काही दिवस पाऊस पडणार नसल्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर कृषी विभागाने पावसाचा अंदाज पाहून पेरणी करण्याचे आवाहन केले. परंतु भात पिकाची पेरणी तोपर्यंत होऊन गेली होती. त्यामुळे पुन्हा दुबार पेरणीचे संकट तर ओढवणार नाही ना? या चिंतेने शेतकरी ग्रासलेला आहे.

अलीकडे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे हे खरे आहे परंतु साधारणपणे जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भात लावणीला आम्ही सुरुवात करत असतो आणि ही भात लावणी जुलै महिना अखेर पूर्ण होत असते. आम्ही मोठ्या विश्वासाने भाताची पेरणी केली परंतु १५ ते २० दिवसातच पावसाने दांडी मारली यामुळे काही ठिकाणी भाताची रोपे जळून/करपून गेली आहेत.

– वामन साबळे (भात उत्पादक शेतकरी)

यंदा ज्यावेळी भात लावणीला सुरुवात केली नेमकी त्याच वेळी पावसाने दडी घेतली आहे, त्यामुळे भात लावणी अद्याप खोळंबली आहे.

– प्रविण कोकाटे (भात उत्पादक शेतकरी)

काही शेतकऱ्यांनी पाऊस पडत असताना भात लावणी केली, तर काहींनी बोर आणि इतर साठवलेल्या पाण्यावर भात लावणी केली, मात्र गेल्या आठवड्यापासून पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. लावलेली भाताची वावरे पुन्हा कोरडी पडून भात उन्हाच्या कडाक्याने जळण्याच्या मार्गावर आहेत, अजुन काही दिवस पाऊस पडला नाही तर शेतकरी खुप मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे.

जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात बहुतांश शेतजमीन हि पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. एकच पीक उत्पादनाचे साधन असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय