पुणे : देशभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीने विक्रमी उच्चांक गाठला आहे. आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज राज्यभर चुलभाकरी आंदोलन करण्यात आले.
सरकारने गॅसचे दर पुन्हा एकदा वाढवल्याने सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणी यांच्यामध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाकाळात महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा काळात केंद्र सरकारने महागाई कमी करावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. या दर वाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यातील विविध भागात चुलभाकरी आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी रस्त्यावर चूल मांडून, त्यावर भाकरी थापत “नही चाहिये अच्छे दिन; लौटा दो हमारे बुरे दिन, वाढलेला गॅस, कोंडतोय सर्वसामान्यांचा श्वास, धोरण मोदींचे, मरण सर्वसामान्यांचे यांसारख्या घोषणा देण्यात आल्या.