Thursday, September 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर : रोजगार, हिरडा प्रश्नी सुकाळवेढे गावात बैठक, गाव शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर

जुन्नर : रोजगार, हिरडा प्रश्नी सुकाळवेढे गावात बैठक, गाव शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर

सुकाळवेढे गाव शाखेच्या अध्यक्षपदी पोपट डेंगळे, तर सचिवपदी अनिल ढेंगळे

जुन्नर : सुकाळवेढे (ता.जुन्नर) येथील युवकांच्या पुढाकाराने रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार मिळावा यासाठी किसान सभा जुन्नर आणि गावातील युवक यांच्यामध्ये संवाद बैठक नुकतीच पार पडली. भातरोपे पेरून झाल्यावर भात लावणी सुरु होईपर्यंत हाताला कोणतेही काम नसल्याने रोजगार हमी योजनेतून काम मिळावे या प्रयत्नामध्ये या गावातील युवक होते. रोजगार हमी योजना कायदा, काम सुरु करण्याची प्रक्रिया, कामाची पद्धती, काम मागणी, कायद्याने देय सोयीसुविधा यांबाबत सविस्तर चर्चा आणि मार्गदर्शन किसान सभेचे पदाधिकारी यांनी येथील युवकांना केले.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरु असून रोजगारासाठी महिला, युवक, युवती व मजूर यांना गाव सोडून इतरत्र जावे लागत नाही. मागेल त्याला, मागेल तेव्हा आणि मागेल ते काम मिळते, कामाप्रमाणे मजुरी मिळते. यामुळे गावामध्ये नवीन कायमस्वरूपी मत्ता निर्मिती होते. जनतेच्या मागणीनुसार आणि महत्वाची कामे जनसहभागाने पूर्ण होतात. मजुरांच्या एकत्र येण्याने एकोप्याही आणि संवादाची, संरक्षण, सहकार्याची स्थिती निर्माण होते. यासह अनेक कामे ग्रामस्त आणि ग्रामसभेच्या माध्यमातून करता येतील, असे किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे म्हणाले.

या वेळी किसान सभेच्या माध्यमातून बाळ हिरडा आदिवासी विकास महामंडळाने खरेदी करावा आणि सरकारने आदिवासी हिरडा उत्पादकांचे होणारे नुकसान भरून काढावे. यासाठी चाललेले प्रयत्न याबाबतही माहिती देण्यात आली. आणि येत्या काळात हिरड्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभे करण्याची गरज असल्याचेही किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी म्हणाले.

यावेळी पुढील कामकाजासाठी समन्वय करता यावा यासाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली गावकमिटी तयार करण्यात आली. कमिटीच्या अध्यक्षपदी पोपट ढेंगळे, सचिवपदी अनिल ढेंगळे, उपाध्यक्षपदी रामदास शेळकंदे, पुनाजी ढेंगळे, बुधाजी ढेंगळे, देवराम ढेंगळे, धोंडू पोटे, ज्ञानेश्वर ढेंगळे, दत्तात्रय ढेंगळे यांची निवड करण्यात आली.

यावेळी आंबे ग्रामपंचायतचे सरपंच मुकुंद घोडे, किसान सभेचे तालुका सदस्य संदिप शेळकंदे, ग्राम रोजगार सेवक पांडुरंग ढेंगळे यांच्यासह सुकाळवेढे गावातील तरुण, ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय