Friday, November 22, 2024
HomeNewsजनभूमी साहित्य : कविता - असळक, समारोप आणि फाटका दोरा - माधव...

जनभूमी साहित्य : कविता – असळक, समारोप आणि फाटका दोरा – माधव ह. गावित

जनभूमी साहित्य कविता



असळक

असळक तू तरी वरस

जाब दिला का मग्याचे गत

लगेच नको पळस…

असळक तू तरी वरस

झगडेल जं नवरीचे गत

पकी नको पळस…

असळक तू तरी वरस

खेकडाचे गत नाग दाखवत

ढवात नको पळस…

असळक तू तरी वरस

राजकुवरचे गत पकी

नको पळस..

असळक तू तरी वरस

गरीबीचे पोटावर पाय देत

हतीचे गत नको पळस…

असळक तू तरी वरस

सणावाराल नखर दाखवत

पकी नको पळस…

 माधव ह. गावित –

फाटका दोरा

प्रवास अगदी सरसर

टळत आहे…

रस्ते एकावर एकवेळी

दोन वाढत आहे..

लेखनी गवसत लेखकाला आतमध्ये शोधत आहे…

कुठेतरी लाटांचे दुःख,

कुठेतरी वादळाचा प्रवास

मांडत आहे…

कधी एकट्याला नमस्कार

करत चालत आहे…

कधी शिकताना फाटलेले

टिगळ जोडत आहे…

संवादाला विसंवादात

पकडत आहे…

आकड्यांचा खेळ

मनाच्या कोपऱ्यात

धरत आहे…

कधी आलेख, कधी

लेख याची सरमिसळ

सांधत चालत आहे…

विजेचे कंदील बनवत

दरबेदर लेखन करत आहे..

गडाडणाऱ्या ढगाला

पुढे पुढे ढकलत आहे…

रडणार्‍या पावसाच्या

थेंबाला दोन गोष्टी

सांगत आहे…

फाटका दोरा सांधत

लयबद्धता वाढवत आहे..

बुडालेल्या शब्दाला

नवीन अनुमोदन देत आहे…

माधव ह. गावित –


समारोप… 


नवीन शैक्षणिक धोरण

आतातरी शिक्षण देईल का…

वाड्यावरून पाड्यावर

आतातरी जाईल का…

नवीन शैक्षणिक धोरण कौशल्यधिष्ठीत

बदलाचा मागोवा घेईल का…

अवस्थेतील अस्वस्थता 

आतातरी बदलेल का…

नवीन शैक्षणिक धोरण

गतीच्या उधाणाला भरती

आणेल का…

खेड्यातील अर्थव्यवस्था

टाळेल का…

नवीन शैक्षणिक धोरण

गरीबी रेखा पार करेल का…

बुडत असलेल्या

दारिद्र्याला वळणावर

सारेल का…

नवीन शैक्षणिक धोरण

खरे स्वरूप धारण करेल का…

अंतरावरच्या पावलावरील स्थितिला धरेल का…



 माधव ह. गावित –

संबंधित लेख

लोकप्रिय