Monday, May 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयIsrael-Hamas War:मध्यपूर्वेतील निखारे विझणार कधी?भीषण चकमकी सुरू:हुथी बंडखोरांचे पाश्चिमात्य जहाजावर लाल समुद्रात...

Israel-Hamas War:मध्यपूर्वेतील निखारे विझणार कधी?भीषण चकमकी सुरू:हुथी बंडखोरांचे पाश्चिमात्य जहाजावर लाल समुद्रात हल्ले

सौदी अरेबियाकडून भारतात येणाऱ्या एमव्ही केम प्लुटो या इंधनवाहू जहाजावर गुजरातपासून २०० नॉटिकल मैलांवर (३७० किलोमीटर) हल्ला करण्यात आला आहे.सलग तीसऱ्या महिन्यात सुरू असलेल्या हमास इसरायल युद्धामुळे जगभर चिंतेचे वातावरण पसरले आहे.युक्रेन रशिया युध्दापेक्षा अति भयानक स्वरूपात सुरू असलेल्या या युद्धात इसरायल व पॅलेस्टाईन मधील जनता होरपळून गेली आहे. हमासच्या दहशतवादी हल्ल्यात निरपराध 1200 इसरायल नागरिक ठार झाले त्याचा बदला घेत इसरायलच्या भीषण बॉम्ब हल्ल्यात आतापर्यंत 21900 पॅलेस्टाईन नागरिक त्यामध्ये सुमारे 10 हजार महिला मुले मृत्युमुखी पडली आहेत.आणि संपूर्ण गाझा शहर बरबाद झाले आहे.52000 लोक जखमी अवस्थेत वैद्यकीय सुविधा अभावी व 19 लाख पॅलेस्टाईन नागरिक भूकमारीत मरत आहेत.
इसरायलने हमासला नष्ट करण्यासाठी ग्राउंड ऑपरेशन सुरू करूनही अद्यापही हमास पराभूत झाले नाही.या युद्धात इसरायलचे 350 सैनिक व 5000 हमास बंडखोर ठार झाले आहेत.बोगद्यातील लढाई व स्ट्रीट फायटिंग यामुळे हे गनिमी युद्ध ठरत आहे.व्हिएतनाम युद्धात टनेल वॉर फेअर मूळे अमेरिकन सैन्य पराभूत झाले होते,तशाच प्रकारचे गाझा मधील टनेल्स मधून उच्च तंत्र विकसित बलाढ्य इस्राईल बरोबर हमास दहशतवादी व त्यांचे समर्थक बंडखोर गट उध्वस्त गाझाच्या ढिगाऱ्यातून युद्ध खेळत आहेत.अतिशय क्रूर व इस्लामीक कडवट विचारसरणीची हमास संघटना काही दिवसात पराभूत होईल अशी अपेक्षा बेंजामिन नेत्यानाहू यांची होती पण हे युद्ध लांबत असल्याने अमेरिकेने युद्धबंदीसाठी खूप उशिरा प्रयत्न सुरू केले आहेत.
आणि आता इराण समर्थक हौथी बंडखोरांनी लाल समुद्रात तेलवाहू जहाजे व अन्य सामुग्रीची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ले सुरू करून हमासला पाठिंबा दिला आहे.अरब सागर,लाल समुद्र,सुवेझ कालवा ते भूमध्य समुद्रातून जगातील 25 टक्के व्यापार अति विशाल कार्गो जहाजातून चालतो,ही जहाजे युरोप,अमेरिका,भारत,रशिया,चीन यांच्या मालकीची आहेत.
लाल समुद्रातून मोठया प्रमाणात तेलाची वाहतूक जगभर होत असते,तसेच इतर दैनंदिन जीवनावश्यक वस्तू,औद्योगिक उत्पादने आदी मालवाहतूक,आयात निर्यात भूमध्य सागर,सुवेझ कलवा,लाल समुद्र,अरबी सागर या जलमार्गाने होते.


1876 मध्ये भूमध्य सागर व लाल सागर यांना जोडणारा सुवेझ कालवा ब्रिटिश कंपनीने बांधून जागतिक जलमार्ग वाहतुकीचे सुमारे 7000 किमी अंतर व एकूण 6 दिवसाचे जहाज प्रवासाचे अंतर कमी केले आणि जागतिक व्यापाराला गती मिळाली.त्यामुळे खर्चिक अशा आफ्रिकन जलमार्गाचे महत्व कमी झाले.
अमेरिका सोव्हिएट युनियन यांच्या शीतयुद्ध काळात सुवेझ कालवा व आजूबाजूच्या तेलसंपन्न इजिप्त,जॉर्डन,सुदान,सीरिया,इराक,इराण,तुर्की,लॅबोनॉन,युएई,येमेन आदी देशामध्ये अमेरिका रशिया यांच्या कुरापती फक्त सुवेझ कालवा केंद्रीभूत धरून सुरूच होत्या,नंतरच्या काळात इस्राईलची निर्मिती या प्रदेशात करून अमेरिकेने ग्यानबाची मेख कायमस्वरूपी इथे मारून ठेवली आहे.
हमास इस्राईल युद्धात अप्रत्यक्षपणे इराण सीरिया काही प्रमाणात तुर्की पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ हमासला पाठिंबा देत आहेत,लॅबोनॉन मधून हिजबुल्ला इस्राईलवर हल्ले करत आहे,आणि आता येमेन मधील हूथी बंडखोरांनी अधिकृतपणे लाल समुद्रात इस्राईल व पाश्चिमात्य जहाजावर हल्ले सुरू करून या युद्धाची तीव्रता संपूर्ण अरब प्रदेशात पसरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
आता पर्यंत दहाहून जास्त जहाजावर ड्रोन व मिसाईल्स हल्ले करण्यात आले आहेत.
युरोप इसरायल,अमेरिका आदी तेलवाहू जहाज कंपन्यांनी या हल्ल्यामुळे आपली जहाजे आफ्रिकेला वळसा घालून पुढे नेण्याचे ठरवले आहे,त्यामुळे एकूण 9 हजार किमी व 6 दिवसाचा वाढीव प्रवास होऊन जागतिक पुरवठा साखळीत मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर दोन ते पाच टक्क्यांनी वधारले आहेत.भारताला सध्या रशियाकडून प्राधान्याने तेलपुरवठा होतो आणि रशिया-इराण संबंध सुरळीत असल्यामुळे या तेलवाहू जहाजांना अद्याप हुथींनी लक्ष्य केलेले नाही.
या हल्ल्यांमुळे मालवाहतूक जहाजे आफ्रिका खंडाभोवतीच्या मार्गाने वळवण्यास पुरवठा कार्गो शिप कंपन्यांनी सुरवात केल्यामुळे एकूण खर्चात 18 टक्के वाढ झाली आहे.
म्हणून अमेरिकेने सुएझ कालव्यातून लाल समुद्रातील व्यापाराचे रक्षण करण्यासाठी बहुराष्ट्रीय ऑपरेशन सुरू केले आहे.
हुथी अतिरेकी गट आयात निर्यात करणाऱ्या आंतरराष्ट्रीय जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली आहेत,त्याचे महत्वाचे उद्देश एकच आहे की,अमेरिका मित्र राष्ट्रे या युद्धात गुंतली पाहिजेत,इराण कडून हुथीना पूर्ण मदत मिळत आहे,लाल सागरातील येमेन देशावर हुथीचे नियंत्रण आहे,आणि इस्राईल हा इराणचा प्रमुख शत्रू 1979 पासून आहे.
या बंडखोरांनी अधिकृतपणे हमासच्या पॅलेस्टाईन स्वातंत्र्य संघर्षाला पाठिंबा देऊन कार्गो जहाजाच्या एकूण 25 टक्के मावाहतुकीच्या व्यापारावर संकट उभे केले आहे.

लाल समुद्राचे महत्व व जागतिक व्यापार

आशिया आणि युरोप खंडांना जोडणारा सुएझ कालवा आणि बाब-एल-मंडेबची एडनच्या आखाताकडे जाणारी सामुद्रधुनी या प्रदेशात 32 किमी रुंदीचा लाल समुद्र आहे.युरोपियन जहाजे लाल समुद्रातून अरबीसागर व पुढे आशिया खंडात येतात.जगातील सुमारे 25 टक्के व्यापार याच मार्गावरून सुएझ कालव्या मार्फत युरोपला होतो.क्रूड,वायू,भाजीपाला,औषधे,मांस,मासे,कार,मोटार,कच्चा माल आदी सर्व प्रकारच्या वस्तूंची वाहतूक या मार्गाने होते.
येमेन हा देश लाल समुद्राजवळ आहे.इथून इसरायल व इस्राईल संबंधित व्यापारी जहाजे जा ये करत असतात.बहुतांश उत्तर येमेन 2014 पासून हूथींच्या नियंत्रणाखाली आहे.सौदी अरेबिया व अमेरिकेच्या विरोधातील ही सशस्त्र संघटना इस्रायल विरोधी आहे. दर महिन्याला 20 हजार मालवाहतूक कार्गो जहाजे लाल समुद्रातून सुएझ मार्गे व्यवसाय करतात.


गाझा मधील इस्राईलने हल्ले सुरू केल्यानंतर हुथी बंडखोरांनी एकूण दहा कार्गो शिपवर ड्रोन व मिसाईल हल्ले केले आणि त्याचे व्हिडीओ प्रसारित करून अमेरिका,ब्रिटन,इसरायल,जर्मनी,फ्रांस,नार्वे आदी देशाच्या जहाजांवर हल्ले सुरू ठेवले आहेत.
ब्रिटिश पेट्रोलियम(BP)कंपनीने लाल समुद्रातून सर्व जहाजे आफ्रिका खंडाला 10 हजार किमीच्या आणि किमान वाढीव सहा दिवसांचा न परवडणारी जहाज वाहतूक सुरू केली आहे.
मार्स्कसह अनेक शिपिंग कंपन्यांनी हुथी बंडखोरांच्या या हल्ल्यांची गंभीर दखल घेतली आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी इस्लामी गट हमास यांच्यातील युद्धातून निर्माण झालेले संकट अतिशय सुसंघटित पणे संपूर्ण तेल उत्पादक अरब जगत आणि आशिया युरोपमधील जलमार्ग व पुरवठा साखळीमध्ये व्यत्यय निर्माण करत आहे.
इस्राईलच्या बंदराकडे जाणारी आयात निर्यात व इंधन रसद बाधित करण्यासाठी येमेन मधून हुथी बंडखोरांना इराण पाठीशी घालत आहे,असे अमेरिकन युद्ध अभ्यासकाना वाटते.
इराण,तुर्की,सीरिया,येमेन,लॅबोनॉन देशांनी इसरायल या युद्धात युक्रेन सारखे अडकवून ठेवण्याचे सामाईक धोरण गुप्तपणे सुरू ठेवले आहे.
नव्या वर्षात हे युद्ध पसरत आहे,कारण गाझा पट्टी उध्वस्त करून इस्राईलचे सैन्य जमिनी युद्धात हमास ला पराभूत करू शकले नाही.21 हजार मृत्यू सर्वात 8 हजार लहान मुले मारली गेल्यामुळे 52 हजार जखमी व 19 लाख लोक विस्थापित झाले आहेत,शाळा,हॉस्पिटल,संयुक्त राष्ट्रांची व सेवाभावी संस्थांची मदत केंद्रे यावर भीषण हल्ले केल्यामुळे जगभर इस्राईल सहानुभूती गमावून बसलेला आहे.
इसरायल मधील बांधकाम,शेती,मॉल्स,स्टोअर्स व पर्यटन सर्व क्षेत्रात सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.ओलिसांच्या सुटकेसाठी हमास युद्ध थांबवून चर्चा करा यासाठी बेंजामिन नेत्यांनाहू यांच्या विरोधात इसरायल मध्ये निदर्शने होत आहेत.
त्यामुळे अमेरिका अडचणीत आली आहे,त्याचवेळी लाल समुद्रातील सुरक्षा महत्वाची असल्याने अमेरिकेने नाटो मधील एकूण दहा देशांची लष्करी आघाडी स्थापन करून येमेनमधून होणारे हल्ले रोखण्यासाठी नियोजन केले आहे.
हमासने 7 ऑक्टोबर रोजी सीमापार हल्ल्यात 1,200 इस्रायली मारले,एक विनाशकारी इस्रायली आक्रमण जाणीवपूर्वक घडवून आणले आहे,त्यामुळे पॅलेस्टाईनचा प्रश्न सुटलेला नाही.हेच हमासला अधोरेखित करायचे होते,असा लष्करी तज्ज्ञांचा अभ्यास आहे.युक्रेन मध्ये रशियाची कोंडी करू इच्छिणाऱ्या अमेरिका युरोप नाटोला हमास इसरायल युद्धात अडकवून रशियाला अमेरिकेची दमछाक करायची आहे हे स्पष्ट झाले आहे.
संघर्ष सुरू झाल्यापासून हुथी आणि लेबनीज हिजबुल्लासह इराणी गटांनी इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू ठेवले आहेत.दरम्यान, हौथींनी त्यांचे लाल समुद्रातील हल्ले वाढवले आहेत,इस्रायलला जाणाऱ्या सर्व जहाजांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे आणि शिपिंग कंपन्यांना इस्रायली बंदरांशी व्यवहार करण्यापासून चेतावणी दिली आहे.त्यामुळे 2024च्या नव्या वर्षात जगभरचा व्यापार व्यवहार प्रभावित होणार आहे.दोन महासत्तांच्या वादात इराण व इसरायल हे भिडू लढवले जात आहेत.रशिया,इराण,इसरायल,अमेरिका,फ्रांस,जर्मनी आदी देशांच्या आर्म इंडस्ट्रीला सुगीचे दिवस आले आहेत.

1948 साली ब्रिटन व अमेरिकेने हिटलरने विस्थापित केलेल्या ज्यू लोकांसाठी पॅलेस्टाईन भूमीवर ज्यूसाठी स्वतंत्र राष्ट्र स्थापित केल्यापासून पॅलेस्टाईन इसरायल संघर्ष सुरू आहे.ज्यू लोकांना सुरवातीला आश्रय देणाऱ्या पॅलेस्टाईन लोक आता इसरायल मध्ये गाझा पट्टी व वेस्ट बँक एव्हड्या किरकोळ प्रदेशात निर्वासित आहेत.
अमेरिका ब्रिटन आदी पाश्चिमात्य राष्ट्रांनी मध्यपूर्वेत तेल संपन्न अरब देशावर नियंत्रण ठेवण्यासाठी इसरायलची निर्मिती केली आहे.पहिल्या महायुद्धात मध्यपूर्वेतील ऑटोमन साम्राज्याचा पराभव झाल्यानंतर ब्रिटनने पॅलेस्टाईन म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्षेत्राचा ताबा घेतला.
या भूमीवर अल्पसंख्याक ज्यू, बहुसंख्य अरब आणि इतर लहान वांशिक गटांचे वास्तव्य होतं.नाझी हिटलरच्या होलोकॉस्टमुळे युरोपमधले ज्यू पळून जात होते,पण अनेक देशांची दार त्यांना बंद होती. त्यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनचा आसरा घेतला.
पुढे त्यांना ही जमीन राष्ट्र म्हणून देण्यात आली. त्यांनी हळूहळू बळाचा वापर करत गाझा हा इस्रायल आणि भूमध्य समुद्राच्या दरम्यान असलेला जमिनीचा एक अरुंद पट्टा आहे.त्याचा ताबा घेतला.
फक्त 41 किलोमीटर (25 मैल) लांब आणि 10 किलोमीटर रुंद असलेल्या या गाझा पट्टीत वीस लाखांहून अधिक लोक राहतात.हे ठिकाण जगातील सर्वात दाट लोकवस्तीच्या ठिकाणांपैकी एक आहे.गाझा पट्टी भोवती मोठे कंपाउंड बांधून इसरायलने गाझा व वेस्ट बँक मध्ये पॅलेस्टाईनची कोंडी केली आहे.
एकेकाळी सुसंपन्न असलेले पॅलेस्टाईन लोक इसरायलच्या शेती उद्योग व इतर ठिकाणी परमिट लेबर म्हणून कामाला जाऊ लागले इसरायलच्या लेबर फोर्स मधील 1 लाख पॅलेस्टाईन हे वर्क परमिट असलेले लेबर पॅलेस्टाईन आहेत.
जगातील सर्वात जास्त गरिबी बेरोजगारी घनदाट लोकसंख्या तीही कमी जागेत पॅलेस्टाईन नागरिकांची आहे.

त्यामुळे हमासच्या आधीपासून यासर अराफत हे पॅलेस्टाईन स्वातंत्र्यासाठी लढत होते.
1967,1973 च्या अरब इसरायल युद्धात अमेरिका ब्रिटन फ्रांस यांनी इसरायलला प्रचंड मदत दिली आणि अरब राष्ट्रे पराभूत झाली.
इसरायलमधील विविध पुरोगामी,लोकशाहीवादी राजकीय पक्षांना व जनतेला अति उजव्या युद्धखोर धोरणाला विरोध होता.
पॅलेस्टाईन व ज्यू लोकांची दोन राष्ट्रे एकत्र असावीत त्यांनी एकमेकांच्या सहकार्याने गुण्यागोविंदाने राहावे यासाठी इसरायलचे पंतप्रधान यित्झाक राबिन आणि पॅलेस्टीनी लिबरेशन ऑर्गनायझेशन (पीएलओ) चेअरमन यासिर आराफत यांच्यात एक करार झाला,नॉर्वे च्या पुढाकाराने झालेल्या या करारामध्ये बिल क्लिंटन यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
पण दोन्ही बाजूच्या अति कट्टर गटामुळे या कराराची वाट लागली ज्यू माथेफिरुने पंतप्रधान राबिन यांची हत्या केली.
पॅलेस्टाईन आणि इस्त्राईल हे हाडवैरी आहेत.त्यांच्या या वादाला नेमकी कारण असलेली हमास संघटना पूर्णता ज्यू विरोधी आहे.आमच्या भूमीवर इसरायलचे आक्रमण आहे,आणि पॅलेस्टाईन मुक्तीसाठी लढाई हेच हमासच हमासचे मूळ उद्दिष्ट आहे.हमास ही संघटना 1980 मध्ये स्थापन झाली.वेस्ट बँग आणि गाझा पट्टीतून ज्यू लोकांना हकलण्यासाठी हमास संघटना सशस्त्र हल्ले करू लागली.या संघटनेने दहशतवादी कारवाया सुरु केल्या. ज्यू लोकांना टार्गेट करायला सुरुवात झाली. दोन्ही भागात लष्करी प्रशिक्षणाला सुरुवात झाली. वेस्ट बँक,गाझा पट्टी मध्ये त्यांनी सेवाभावी संस्था,शाळा,दवाखाने ई माध्यमातून लोकमताचा पाठिंबा मिळवला.
लॅबोनॉन,सीरिया,इजिप्त,अरब राष्ट्रे,युरोप अमेरिकेत असलेल्या इसरायल विरोधी गटाकडून त्यांना धनदौलत व प्रचंड सहानूभूती मिळू लागली.
अरब राष्ट्रात पूर्वीपासून इसरायल विरोधी वातावरण होते.निर्वासित ज्यू लोकांसाठी युरोप रशिया यांनी कोणतीही स्वतःची भूमी दिली नाही,तर ती पॅलेस्टाईनची हक्काची भूमी देऊन पश्चिम आशियात अमेरिका तेल साम्राज्य संरक्षित करण्यासाठी एक नवा देश स्थापन करत आहे.हे अरब जगतात स्पष्ट झाले होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर च्या स्वातंत्र्याचा लढ्यात अनेक ठिकाणी फाळण्या घडवून पेटते निखारे अमेरिकेने तयार केले आहेत.
भारत पाकिस्तान,उत्तर कोरिया,दक्षिण कोरिया,उत्तर व्हिएतनाम दक्षिण व्हिएतनाम आदी प्रमुख ठिकाणी अमेरिका ब्रिटनच्या कारवाया स्पष्ट दिसतात.मध्यपूर्वेत रशियाला काउंटर करण्यासाठी इसरायलची निर्मिती ही अमेरिकन कुटनीती होती.आता मध्यपूर्वेत नियंत्रण ठेवून इजिप्त,जॉर्डन,सीरिया,सौदी,कतार,इराक,इराण या तेल संपन्न देशावर कुटनीती प्रभाव आजही अमेरिका व नाटो गटाचा आहे.
याच इसरायल मार्फत सीरिया,इराक,जॉर्डन,इजिप्त आदी देशांना अमेरिका नियंत्रित करत असते,सिरियावर 2011 पासून इसरायलने अनेक हल्ले केले आहेत.अमेरिका विरोधी सत्ताधाऱ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी अमेरिका इसरायलचा वापर करते.इराकची अणुभट्टी इसरायलने नष्ट केली होती.या सर्व घटना 1990 साली कोसळला रशिया गुपचूप सहन करत होता.

हमासचा उदय आणि त्याचे पाठीराखे

अनेक देश हमासला पॅलेस्टाईन दहशतवादी संघटना म्हणून ओळखतात.तर ही संघटना स्वतःला पॅलेस्टाईन इस्लामिक चळवळ मानते.या संघटनेचाच राजकीय पक्ष पॅलेस्टाईनमध्ये सक्रिय आहे.गाझा पट्टीत जवळपास 20 लाखाहून अधिक पॅलेस्टाईन नागरिक राहतात. इस्त्राईलविरोधात लढण्यासाठी त्यांनी मिलिटरी सारखी संघटना बनवली त्यालाच हमास म्हणतात.हमासचा एक गट पूर्णतः दहशतवादी कारवायात गुंतलेला आहे.बेरोजगार पॅलेस्टाईन व इतर अरब गटातील तरुण हमास रिकृट करते व इस्त्राईलवर हल्ला चढवणे.अशांतता निर्माण करणे या त्यांचा दहशतवादी कामासाठी वापरत असते.प्रचंड पैसा,जिहादी तत्वज्ञान,पॅलेस्टाईनबद्दल सहानुभूती या भांडवलावर केवळ इस्त्राईलच नाही तर अमेरिका,इंग्लंड,युरोपातील अनेक देशांविरोधात ही संघटना काम करते.हमासने आत्मघातकी बॉम्बस्फोट,रॉकेट हल्ले आणि इस्रायली प्रदेशात हिंसक हल्ले सुरू ठेवले.हरकत अल-मुकावामा अल-इस्लामिया’ (हमास) असे नाव देण्यात आले. ही एक धार्मिक,तसेच पॅलेस्टिनी सुन्नी मुसलमानांची ही एक सशस्त्र संघटना आहे. ‘इस्रायल शासनाला हटवून तेथे इस्लामी शासन निर्माण करणे’, हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. हमासची औपचारिक स्थापना वर्ष 1987 मध्ये झाल्याचे मानले जाते.हमास ही पॅलेस्टाईनमधील इस्लामिक चळवळ आहे.
त्यानंतरच्या काळात लेबोनॉन मध्ये हिजबुल्ला ही इस्लामिक संघटना स्थापन झाली.हमास व हिजबुल्ला दोन्हीचा उद्देश एकच आहे तो म्हणजे इसरायल विरोध.
अत्याधुनिक युद्ध तंत्र,युद्ध सामुग्री,इराण सीरिया तुर्की,लॅबोनॉन,इराक मधील शिया पंथीय व इतर गटाकडून मिळणारी प्रचंड मदत यामुळे या संघटना मध्यपूर्वेत ताकदवर बनल्या आहेत.
सन 2000 व 2006 साली इस्राईल हिजबुल्ला यांच्यात भीषण युद्ध झाले दोन्ही बाजूने मोठा विनाश झाला.हमास व हिजबुल्ला यांच्याकडे खडी फौज आणि आधुनिक शस्त्रे असल्यामुळे व इस्राईल पण भारी ताकदवान असल्याने या युद्धात कोणी विजयी न होता आंतराष्ट्रीय दबावामुळे युद्ध विराम झाला होता.
आताच्या या युद्धात मोठी मानवी त्रासदी आहे,हे युद्ध जिंकून हमास संपुष्टात आणू ही बेंजामिन नेत्यांनाहू यांची अपेक्षा पूर्ण होत नाही,इसरायल मध्ये त्यांच्या एकूण युद्ध धोरणाला प्रचंड विरोध होत आहे,ओलिसांच्या सुटकेसाठी चर्चा करून हे युद्ध थांबवा,अशी इसरायल जनतेची भावना आहे,कारण या युद्धात इसरायलचे उद्योग शेती सह अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे,आणि 19 लाख विस्थापित पॅलेस्टाईन नागरिकांच्या गाझा मधील पुनर्निर्माण कार्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.तरी सुद्धा भविष्यात हा संघर्ष संपेल असे वाटत नाही.

क्रांतिकुमार कडुलकर,पत्रकार-पिंपरी चिंचवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय