पिंंपरी चिंचवड : लसीकरणाचे विकेंद्रीकरण करून लसीचा पुरवठा वाढवा, अशी मागणी माजी महापौर राहुल जाधव यांनी केली आहे.
चिखली प्रभाग 2, जाधववाडी, मोशी राजेशिवाजीनगर येथील लोकसंख्या 80 हजारच्या आसपास आहे. साई जीवन शाळा येथे एकच लसीकरण केंद्र आहे. तेथे किमान रोज 1000 नागरिकांचे लसीकरण झाले तर येत्या तीन महिन्यात लसीकरण मोहीम यशस्वी होईल. केंद्रावर सध्या फक्त 200 डोस उपलब्ध होतात.
नागरिक रांगेत उभे राहून वैतागलेले आहेत. प्रभागात तरुण कामगार श्रमिकांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रशासनाने राजेशिवाजी नगर, रिव्हर रेसिडेन्सी मोशी, कुदळवाडी प्रभागात अजून दोन लसीकरण केंद्रे स्थापन करावीत, असे मत विद्यमान नगरसेवक आणि माजी महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले आहे.
लोकसभा, विधानसभा मतदान केंद्राच्या धर्तीवर अशा प्रकारची केंद्रे प्रत्येक प्रभागात स्थापन करून विशिष्ट मुदतीत लसीकरण पूर्ण करण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्था प्रशासनाला मदत करण्यास तयार आहोत, असेही ते म्हणाले.