Friday, November 22, 2024
Homeराज्यआदिवासी महिलेला जिवंत पेटविणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची बिरसा फायटर्सची मागणी

आदिवासी महिलेला जिवंत पेटविणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची बिरसा फायटर्सची मागणी

दापोली : मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यात आदिवासी महिलेवर डिझेल टाकून पेटवण्याची धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, दिनांक ३ जुलै २०२२ रोजी ३८ वर्षीय आदिवासी महिला रामप्यारी सहारिया यांना त्यांच्याच शेतात अंगावर डिझेल ओतून पेटवून देण्यात आले. अशी भयानक घटना मध्यप्रदेशात गुना जिल्ह्यात घडली आहे, या घटनेचा बिरसा फायटर्स संघटनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

महिलेची तब्येत अत्यंत गंभीर आहे. शेताच्या मुद्द्यावरून गुन्हेगारांनी हे कृत्य केले. गुन्हेगार बळजबरीने रामप्यारी यांच्या शेतात मशागत करत होते. त्यांना रोखण्यासाठी गेल्यावर ही घटना घडली. २३ जून रोजी रामप्यारी यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. परंतू महिलेने पोलिसांकडे तक्रार करूनही पोलीस प्रशासनाने कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे आदिवासी समाजात प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे आदिवासी महिलेवर डिझेल टाकून पेटवून देणाऱ्या आरोपींना फौजदारी गुन्हे दाखल करुन जलद खटल्याद्वारे फाशीची शिक्षा देण्याची मागणी बिरसा फायटर्स संघटनेतर्फे करण्यात आली आहे. अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय