Tuesday, January 14, 2025
HomeNewsराजगुरूनगर : कोविड-१९ चा अटकाव करण्यासाठी किसान सभेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन, केल्या...

राजगुरूनगर : कोविड-१९ चा अटकाव करण्यासाठी किसान सभेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन, केल्या “या” महत्वपूर्ण मागण्या

राजगुरूनगर : पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर तालुक्यात दररोज शेकडो पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अक्षरशः   कोलमडून पडली आहे असा अनुभव अनेक रुग्णांना येत आहे.तालूक्यातील आरोग्य विषयक स्थितीच्या विषयी तात्काळ काही ठोस निर्णय घेवून कोविड-१९ चा अटकाव करणेसाठी सामुहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.या अनुषंगाने किसान सभा राजगुरुनगर तालुका समितीने  उपविभागीय अधिकारी राजगुरुनगर यांना आपल्या मागण्यांचे  निवेदन दिले आहे. 

संघटनेने या निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत – 

१.राजगुरुनगर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोविड-१९ ची रॅपीड टेस्ट व्हावी. यात सर्वात महत्वाचे की आदिवासी व ग्रामीण भागातील डेहणे तसेच वाडा यासारख्या दवाखान्यात लवकरात लवकर रॅपिड टेस्ट चालू करावी. याविषयी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात नियोजन व्हावे.

२.राजगुरुनगर तालुक्यातील आदिवासी भागात तात्काळ कोविड सेंटर सुरु व्हावे.आदिवासी भागातील भौगोलिक परिस्थिती व चांडोली ते खेड तालुक्यातील आदिवासी भागातील अंतर लक्षात घेता हे कोविड सेंटर सुरु होणे अत्यंत गरजेचे आहे.

३.चांडोली रुग्णालयातील आँक्सिजेन बेडची संख्या वाढवावी व तेथील व्हेंटीलेटर बेड सुरु करावेत.राजगुरुनगर तालुक्याचा वाढलेला विस्तार व वाढत चाललेली कोविड रुग्णांची संख्या पाहता चांडोली येथील रुग्णालय अधिक सक्षम करणे जास्त गरजेचे झाले आहे.

४.सद्यस्थितीत चांडोली येथील रुग्णालय कोविडसाठी असल्याने तालुक्यातील गरोदर माता यांची प्रसूती करणेकामी अनेक वेळा शेजारील तालुक्यात किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये गरोदर माता यांना नेले जाते.तरी तालुक्यातील एक रुग्णालय हे गरोदर माता प्रसूतीसाठी नामनिर्देशित करणे गरजेचे आहे, ते लवकरात लवकर करावे.

५.तालुक्यातील सर्व प्रकारच्या शासकीय रुग्णवाहिका व त्यांची सद्यस्थिती,त्यांचा वापर याविषयी आढावा घेवून सर्व शासकीय रुग्णवाहिका कार्यान्वित करावी.

यावेळी अखिल भारतीय किसान सभा राजगुरुनगर तालुका समितीचे अमोद गरुड,महेंद्र थोरात,  रज्जाकभाई शेख,विकास भाईक हे उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय