मुंबई:- मुंबई आणि उपनगर परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने दादर, हिंदमाता, अंधेरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली बोरीवली आदी भागात पाणी साचलं आहे. तर दादर आणि परळ भागात पाणी साचल्याने वाहतूक बंद केली आहे. पावसाची संततधार कायम असल्याने पाण्याचा निचरा होऊ शकत नाही.
कांदिवलीत पावसाने रस्त्याच्या बाजूला असलेल्या डोंगराचा भाग कोसळला. डोंगराचा भाग बाजूला करण्याचं काम सुरु आहे. रस्त्यांवरील वाहतूक मंदावली असून मध्य आणि पश्चिम रेल्वेलाही पावसाचा फटका बसला आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पाऊस आणि भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलं आहे. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच रहावे, असंही बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सांगण्यात आलं आहे.