Sunday, May 19, 2024
Homeआरोग्यआशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या घराला घेराव आंदोलनाची घोषणा...

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड; सत्ताधारी पक्षांच्या आमदारांच्या घराला घेराव आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सरकारचा निर्णय

मुंबई : राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७.५६ कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने आज शासन निर्णय निर्गमित केला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक ह्या दोन्ही घटकांच्या भूमिका महत्त्वाच्या आहेत. ग्रामीण आरोग्याचा त्या कणा आहेत. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय दिनांक २५ जून २०२० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना १ जुलै २०२० पासून प्रत्येकी २०००  व ३००० रुपये इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु ४ महिने होऊनही मोबदला देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने ५ नोव्हेंबर रोजी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या घराला घेराव आंदोलन करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज्य सरकारने आपला निर्णय जाहीर केला आहे.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते मार्च २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला अदा करण्यास पावसाळी अधिवेशनात विधिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यास अनुसरुन वित्त व नियोजन विभागाने जुलै ते ऑक्टोबर या कालावधीचे ५७.५६ कोटीच्या अनुदान वितरणास मान्यता दिली आहे. दिवाळी सणापूर्वी राज्यातील सुमारे ७० हजार आशा भगिनींना वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

तर सरकारच्या या निर्णयानंतर आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या नेत्या आनंदी अवघडे म्हणाल्या की, आशा व गटप्रवर्तकांनी न्याय मागण्यांना घेऊन सातत्याने नेमून दिलेले काम करत संघर्ष केले आहे. त्या संघर्षाचे आणि संघटनेच्या ताकतीमुळे सरकारला निर्णय घेणे भाग पडले आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय