जुन्नर / आनंद कांबळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव ता. जुन्नर येथे स्वस्त आणि मस्त आनंदी बाजार या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आनंदी बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा पल्लवी वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर व्यावहारिक ज्ञान प्रत्यक्ष अनुभवता यावे, नफा – तोटा यासारख्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, स्वकमाई व स्वयंरोजगार याचे संस्कार व्हावेत, श्रमाचे महत्त्व शालेय वयातच या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील 90 विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, हार, वेण्या, विविध खाद्य पदार्थ, मातीच्या, लाकडाच्या व कलाकुसरीच्या वस्तू, संक्रांतीचे सुगडे इत्यादी वस्तू या आनंदी बाजारात लक्षवेधी ठरल्या. या सर्व वस्तूंची खरेदी करण्यासाठी पालकांनी व ग्रामस्थ व महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आपल्या सर्व वस्तू विकल्या गेल्याचा आनंद विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक मोहन नाडेकर सर यांनी दिली.
या उपक्रमाला श्री लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई, गिरीजा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश बिडवई, ग्रामपंचायत सदस्य अरविंद बिडवई, भारत शेटे, रोहिदास बिडवई, खंडू वाणी, शैलेश माळी, राम हेलम, सुप्रिया बिडवई, छाया ढेकणे, अनिता ताम्हाणे, आदी पदाधिकारी यांनी भेटी दिल्या व या उपक्रमाचे कौतुक केले.
या उपक्रमाचे आयोजन करण्यासाठी शाळेतील शिक्षक दत्तात्रय उगले, उमेश शिंदे, किरण पवार, मारुती साबळे यांनी विशेष परिश्रम घेऊन उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.