दिदी लखपती झाली, महिलांच्या नावाने जास्त घरे दिली, यावर्षीचा गणेशोत्सव शानदार होणार !
पुणे / क्रांतिकुमार कडुलकर : दि.०१- पुणे शहरात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले,त्यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली,त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारलेल्या सुमारे चार हजार घरांचे लोकार्पण करण्यात आले.
नीती, नियत आणि निष्ठेवर आधारित गृहनिर्माण : गरिबांना 4 कोटी घरे दिली
पंतप्रधान मोदी यांनी युपीए सरकारच्या आवास योजनेतील अपारदर्शक धोरणांवर टीका केली ते म्हणाले, नीती, नियत व निष्ठा असल्याशिवाय सरकारच्या योजना यशस्वी होत नाहीत, विकास योजनांसाठी उपलब्ध केलेला निधी योग्य वेळेत वापरून योजना यशस्वी करता येतात, असे सांगताना त्यांनी कर्नाटक, राजस्थानच्या विरोधी पक्षांच्या सरकारच्या कामातील त्रुटीचा उल्लेख करताना 2014 पूर्वीच्या सरकारने शहरी गरिबांची फक्त दहा वर्षात 8 लाख घरे बनवली,मात्र त्या घरांचा दर्जा इतका निकृष्ट होता की, दोन लाखाहून जास्त घरे इतक्या सुमार दर्जाची होती की, बहुतांश गरिबांनी ह या घरात राहायला नापसंती दर्शवली, महाराष्ट्रातील 50 हजार घरे खाली पडून होती,आम्ही घरांच्या योजनेसाठी संपूर्ण नीती नियत बदलून 9 वर्षात देशाच्या ग्रामीण व शहरी भागातील गरिबांसाठी 4 कोटी पक्की घरे दिली आहेत,यातील 75 लाख घरे शहरी गरिबांसाठी निर्माण केली आहेत. यातील बहुसंख्य घरे गरीब महिलांच्या नावावर करण्यात आली आहेत,त्यामुळे माझी दीदी लखपती झाली आहे. आणि तिचा गणेशोत्सव शानदार होणार आहे.
सत्ता येते आणि जाते : प्रत्येकाची स्वप्नपूर्ती ही मोदींची गॅरंटी आहे
स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापासून महाराष्ट्र राज्याने देशाच्या औद्योगिक विकासाला गती दिल्याचा उल्लेख करून नरेंद्र मोदी म्हणाले की, आहे असे सांगताना, महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी नवीन एक्सप्रेस हायवे, हाय स्पीड रेल्वेमार्ग विस्तारीकरण,विमानतळ प्रकल्प आदी पायाभूत सुविधांसाठी केंद्रसरकार पूर्वीपेक्षा 12 पट निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, महाराष्ट्रातील शहरे इतर राज्यातील शहरांना जोडण्यात येत आहेत, मुंबई दिल्ली इकॉनॉमिक कॉरिडॉर महाराष्ट्राला उत्तर भारताशी जोडत आहे. आमचे सरकार राज्याच्या विकासासाठी मिशनमोडवर काम करत आहे, जगभरात लोक भारताच्या विकासाची चर्चा करत आहेत (टाळ्या) स्टार्टअप व इनोव्हेशन्स वेगाने वाढली आहेत,आता एक लाख स्टार्टअप काम करत आहेत, भारतात डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वेगवान झाले आहे, गावोगावी इंटरनेट मोबाईल सेवेद्वारे डिजिटल सेवा स्वस्त झाल्या आहेत, आणि 5 जी सेवा गतिमान करण्यात आपण निवडक यादीत पहिल्या पाच मध्ये आहोत,या माध्यमाक्रांतीची सुरवात पुणे शहराने केली आहे. सत्ता येते आणि जाते, समाज व देशासाठी उद्याच्या उज्वल उद्यासाठी सर्वांची स्वप्नपूर्ती हीच मोदींची गॅरंटी आहे, असे आश्वासन त्यांनी राज्यातील जनतेला दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी स्वागतपर भाषणात पंतप्रधानांचे कौतुक केले.
पुणे आणि महाराष्ट्राच्या विकासाचा गौरव : आज 15 हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन आणि लोकार्पण
पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून सुरुवात केली, त्यांनी आपल्या भाषणात पुणे शहराचा गौरव केला. ते म्हणाले, ऑगस्ट महिना हा उत्सव आणि क्रांतीचा महिना आहे,मला इथे येण्याचे भाग्य मिळाले, पुणे शहराचे देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात मोठे योगदान राहिले आहे, पुणे शहराने लोकमान्य टिळक सह अनेक क्रांतिवीर व स्वतंत्र सेनानी देशाला दिले आहेत, आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित असलेल्या महान सुधारक अण्णाभाऊ साठे यांचा जयंती दिवस आहे, त्यांच्या साहित्यावर आजही विद्यार्थी आणि विद्वान मंडळी प्रबंध लिहितात,हा अतिशय मोलाचा दिवस आहे, पुणे हे देशातील युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारे आणि देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारे शहर आहे.
पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था, गरिबांच्या घरांची स्वप्नपूर्ती होत आहे
मेट्रो प्रकल्प व घरकुल योजनांची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले, पुणे मेट्रो प्रकल्प पाच वर्षात पूर्ण होत आहे,शहरातील मध्यमवर्गासह सर्व जनतेची जीवनशैली उंचावत आहोत, गुणवत्तापूर्ण जीवनासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा आधुनिक दर्जाची देऊन आमचे सरकार मेहनत घेत आहे, देशातील शहरामध्ये मेट्रो सेवेचा विस्तार होत आहे. 2014 मध्ये फक्त पाच शहरामध्ये 250 किमी इतके मेट्रोचे नेटवर्क होते, आज देशात 800 किमी पेक्षा जास्त मेट्रो नेटवर्क एकूण 20 शहरामध्ये आहे,1000 किमी जास्त मेट्रो लाईनचे सध्या देशात काम सुरू आहे. शहरामधील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रोचा विस्तार आवश्यक आहे, स्वछ भारत अभियान अंतर्गत फक्त शौचालये निर्माण करणे इतके सीमित काम नाही तर संकलित होणारा कचरा प्रक्रिया करून उर्जानिर्मिती करायची आहे, आपली शहरे कचऱ्याचे डोंगर होते, एकेकाळी कोथरूड येथे मोठा कचरा डेपो होता,आता तिथे मेट्रो स्टेशन आहे, पिंपरी चिंचवड मधील वेस्ट टू एनर्जी प्लॅन्ट मधून वीजनिर्मिती होणार आहे.