Saturday, May 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयगरुडझेप : झारखंडच्या दुर्गम खेड्यातील १७ वर्षीय सीमा कुमारीची हार्वर्ड विद्यापीठात निवड...

गरुडझेप : झारखंडच्या दुर्गम खेड्यातील १७ वर्षीय सीमा कुमारीची हार्वर्ड विद्यापीठात निवड !

भारतात गरीब कुटुंबातील मुलींना अभ्यास आणि करिअर करण्याची संधी फारच कमी मिळते. त्यांचे पालक लवकरात लवकर लग्न केले पाहिजे या चिंतेने काळजी करतात. परंतु रांचीच्या दाहो गावची सीमा कुमारी असे नाव आहे. जिची कथा ऐकून आपण आश्चर्यचकित व्हाल आणि आपल्याला विश्वास देखील बसणार नाही. मात्र हे खर आहे कि, झारखंड मधील दाहु गावातील एका गरीब कुटुंबातील मुलगी अमेरिकेमधील हार्वर्ड विद्यापीठापर्यंत गेलीय.

झारखंडची राजधानी रांची पासून २४ किलोमीटर उर्मांझीमधील दाहू या दुर्गम गावात सीमा कुमारी राहते. कुंटुबाची आर्थिक परिस्थिती गरीब आहे.  घरामध्ये आई, वडील, भाऊ आणि सीमा. आई वडील अशिक्षित आहेत. तिचे वडील सिकंदर महतो ( वय – ४४) यांनी दुसऱ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले आहेत. त्याचवेळी, तीची आई सरस्वती देवी (वय- ४०) फक्त पहिल्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेऊ शकली आहे. १७ वर्षीय सीमा ने देखील गावातल्या सरकारी शाळेत शिक्षण घेतले आहे. वडील तेथील एका स्थानिक धागा कारखान्यात मजदूर म्हणून काम करतात. तसेच आई वडील उदरनिर्वाहासाठी शेती हि करतात. घरात मदत म्हणून सीमा देखील गवत कापण्याचे काम करते.

२०१२ मध्ये एक दिवस ती आपल्या चुलत्यांसोबत गाई साठी गवत कापण्यासाठी जात असताना, तिथे तीला काही मुली फुटबॉल खेळताना दिसल्या. त्यांना खेळताना पाहिल्यावर तीला ते खूप आवडलं आणि आपण हि खेळावे असे तिला वाटले. त्यानंतर सीमाने युवा फांऊडेशन या संस्थेची चौकशी केली. युवा फांऊडेशन हि स्वयंसेवी संस्था झारखंड मधील ग्रामीण भागामध्ये काम करते. हि  संस्था गरीब कुंटूबातील मुलींना फुटबॉल खेळायला शिकवते आणि शिक्षण घेण्यासाठी मदत करते. या संस्थेची माहिती मिळविल्यानंतर सीमाने २०१२ मध्ये कुटुंबीयांच्या परवानगीने युवा फुटबॉल टीममध्ये दाखल होऊन फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. युवा फुटबॉल टीममध्ये सामील झाल्यानंतर, सीमाने बाल विवाह रोखण्यासाठी, सर्वाना शिक्षणाचा अधिकार मिळावा यासाठी आवाज उठवायला सुरुवात केली. कारण, सीमाच्या शॉर्ट्स घालण्यावर हि गावातील लोकांनी विरोध केला  होता. तर तीच्या सोबत येणाऱ्या काही मुलींची त्यांच्या घरच्यांनी लग्न लावून दिली. मात्र तरीही हा विरोध पत्कारून देखील ती फुटबॉल खेळत राहिली. यामध्ये तिच्या कुटुंबीयांनी तीला साथ दिली. २०१६ मध्ये तीला स्पेनला जाण्याची संधी मिळाली होती. तसेच फुटबॉल खेळण्यासाठी तिला अनेक देशात जाण्याची संधी मिळाली आहे. ‘फुटबॉलमुळेच तिला हार्वर्ड विद्यापीठात शिकण्याची हि संधी मिळाली आहे’, असे तिचे म्हणणे आहे. 

सीमा अजूनही बारावीत शिकणारी आहे. ती भारत सरकारच्या नॅशनल स्कूल ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) मधून शिकत आहे आणि परीक्षेची वाट पाहत आहे. मागील आठवड्यात मॅसेच्युसेट्सच्या केंब्रिजमधील हार्वर्ड विद्यापीठाकडून तिला संपूर्ण शिष्यवृत्ती मिळाली आहे. याशिवाय सीमाला अशोक विद्यापीठ, मिडलबरी कॉलेज आणि ट्रिनिटी कॉलेज – हार्टफोर्ड या ठिकाणी हि तिची निवड झाली आहे. हार्वर्ड विद्यापीठात पदवीच्या शिक्षणासाठी तिची निवड झाली आहे. यावर्षी अधिक संख्यने प्रवेश अर्ज आल्याने यूनिवर्सिटी ने केवळ ३.४ % विद्यार्थ्यांना संधी दिली आहे. यावर्षी हार्वर्ड विद्यापीठाचा स्वीकार्यता दर कमी असल्याचे सांगण्यात आले, परंतु सीमाने सर्व अडथळे दूर करून स्वत: साठी एक जागा मिळविली. 

हार्वर्ड विद्यापीठात जाऊन ती समाजशास्त्र किंवा स्त्री अभ्यास या विभागात शिक्षण पूर्ण करणार आहे. हि तर सुरुवात आहे असे तिला वाटते. ती सांगते कि, “मला शिक्षण पूर्ण करून पुन्हा आपल्या गावी येऊन तिला रांची मध्ये संस्था (NGO ) स्थापन करायची आहे. हि संस्था स्त्रियांसाठी काम करेल. रोजगार उपलब्ध करून देईल. मला लैंगिक भेदभाव, घरगुती हिंसाचार, बालविवाह इ. सारख्या महिलांवरील अन्याय कमी करण्यासाठी समाजात लैंगिक समानता आणणे आवश्यक आहे, हे केवळ आर्थिक प्रगतीच नाही तर सामाजिक देखील दर्शवेल जिथे प्रत्येक घरात निर्णय घेण्यास महिला भाग घेता येईल. माझ्या गावात महिलांसाठी संस्था सुरू करण्याची दोन उद्दिष्टे असतील. एक छोटासा व्यवसाय सुरू करणे जे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यास प्रशिक्षण देईल.  दुसरे म्हणजे महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल शिक्षित करेल आणि आवश्यक व्यवसाय कौशल्य आणि ज्ञान देऊन महिलांना सक्षम होण्यासाठी मोठे नेटवर्क तयार करणे.” 

सीमाच्या आयुष्यात फुटबॉल खेळाची महत्वाची भूमिका राहिली आहे. ती फुटबॉल चांगली खेळाडू तर नाही बनू शकली, मात्र ती जिथपर्यंत तिथे जाण्यासाठी फुटबॉल खेळाचा महत्वाचा वाटा आहे. ती जेंव्हा २०१६ ला स्पेन मध्ये खेळण्यासाठी गेली. हाच तिच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला आहे. कारण इथे जाऊन तिने जगाचा वेगळाच चेहरा पाहिला. आणि असं जीवन जगण्याची तिची इच्छा बळावत गेली. ती आज सांगते कि, “मला अमेरिकेतील विद्यार्थी संघटनेत काम करायचं आहे, तिथे होणाऱ्या घडामोडींमध्ये तिला भाग घ्यायचा आहे, या शिवाय तेथील प्राध्यापकांना जाणून घ्यायच आहे आणि अमेरिका फिरायची आहे.” या पुढील चार वर्ष ती अमेरिकेत शिक्षण घेणार आहे. या चार वर्षात कधीतरीच तिला घरी यायला मिळेल. सप्टेंबर महिन्यापासून तिच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असुन, ती ऑगस्ट मध्ये अमेरिकेत जाणार आहे. तिला शिक्षण घेण्यासाठी प्रत्येक वर्षी ८३,००० अमेरिकी डॉलर इतकी शिष्यवृती मिळणार आहे, जी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीनुसार प्रत्येक वर्षी वाढविली जातेय. 

आज उच्चशिक्षण घेणारी ती तिच्या कुटुंबातील पहिली मुलगी आहे. ज्या गावामध्ये मुलीचे शिक्षण अत्यंत अल्प प्रमाणत आहे. कोणती हि पार्श्वभूमी नसताना सीमा ने  घेतलेली हि भरारी हि खरच अभिमानास्पद आहे.

स्नेहल साबळे

(लेखिका सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी करत आहेत.)


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय