(मुंबई) : राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याचे समोर आले. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षा घेणे अशक्य असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
कोरोनाच्या संकटामुळे विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास महाराष्ट्रासह पंजाब, ओदिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आणि दिल्ली यांनी परीक्षा रद्द करत आपला विरोध दर्शवला आहे. अशातच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे राज्य सरकारला बंधनकारक असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
आज राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक मंत्रालयात पार पडली. सध्याची राज्यातील कोरोनाची परिस्थिती पहाता परीक्षा घेणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महाराष्ट्र सरकार परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.
युजीसी’चा राज्य सरकारला इशारा; परीक्षा रद्द कराल तर…
विद्यापीठ परीक्षांबाबत न्यायालयात याचिका दाखल असल्याने न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहणार असल्याची भूमिका सरकारने घेतली आहे. सध्याच्या परिस्थितीत परीक्षा घेणं शक्य नाही असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी यूजीसी घेणार का? असंही उदय सामंत यांनी विचारलं आहे. तसंच करोना गेल्यानंतर परीक्षा घेण्याचा घेण्याची तयारी आहे असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.
विद्यार्थी संघटनेच्या ऑनलाईन मोहीम
युजीसीच्या गाईडलाईन विरोधात विद्यार्थी संघटनेने ट्विटरवर मोहीम सुरू केल्या आहेत. त्यात “स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया” (SFI) ने “#BoycottUGCguidelines” हा ट्रेंड सुरु केला होता, तो ट्विटरवर तीन नंबर वर ट्रेंड होत होता, तर “नेशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया” (NSUI) ने”#SpeakUpForStudents” हा ट्रेंड सुरु केला होता. काही संघटना परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहेत. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषद “परीक्षा घेण्याच्या” निर्णयावर ठाम आहेत.