Tuesday, September 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडसिद्धेश्वर स्वामींच्या विचारांचे अनुकरण केल्यास जीवनात परिवर्तन – बसवलिंग महास्वामी

सिद्धेश्वर स्वामींच्या विचारांचे अनुकरण केल्यास जीवनात परिवर्तन – बसवलिंग महास्वामी

अनेक मान्यवरांकडून सिद्धेश्वर महास्वामींना शब्दांजली 

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : गौतम बुद्धमध्ये असलेले शांती, महावीरामध्ये असलेली अहिंसा, महात्मा बसवेश्वरांमधील बुद्धी या सर्व गुणांची बेरीज म्हणजेच श्री सिद्धेश्वर महाराज होय. सिद्धेश्वर स्वामींनी आकाशातील नक्षत्र होऊन जगाला प्रकाश दिला, तर आपण ग्रहज्योती होऊन समाजाला प्रकाशित केले तर जीवन समृद्ध होईल. सिद्धेश्वर स्वामींनी दिलेले अनेक विचारांपैकी एखादा विचार आत्मसात केल्यास परिवर्तन होईल. त्याचा जीवनामध्ये आचरण करणे म्हणजेच आज गुरु नमन केल्याचे सार्थकी लागेल, असे उदगार कर्नाटक येथील ज्ञान योगाश्रमाचे प्रमुख पूज्य बसवलिंग महास्वामी यांनी काढले. 

बसव सेवा संघाच्या वतीने भोसरी येथे आयोजित केलेल्या श्री सिद्धेश्वर महास्वामीजींच्या स्मरणार्थ गुरू नमन महोत्सवात ते बोलत होते.

यावेळी पूज्य अमृतानंद स्वामी, पूज्य हर्षानंद स्वामी, पूज्य श्रध्दानंद स्वामी, पूज्य आत्माराम स्वामी, पूज्य ईश प्रसाद स्वामी, अप्पर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर, डॉ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी.डी पाटील, ज्येष्ठ विचारवंत डॉ. विजयालक्ष्मी बाळेकुंद्री, ऱा. स्व. संघाचे प्रांतीय सदस्य हेमंत हरहरे, उद्योजक एस बी पाटील, स्वागताध्यक्ष प्रा शिवलिंग ढवळेश्वर, अणाराय बिरादार,बसव सेवा संघाचे अध्यक्ष राम नाईक, उपाध्यक्ष शंकरगौडा हादिमनी, सचिव विश्वनाथ शेलार आदी उपस्थित होते.

यावेळी अण्णा हजारे यांनी व्हिडिओ क्लिप पाठवून कार्यक्रमास शुभेच्छा देत निस्वार्थी समाजसेवा करणारे  स्वामीजी मला गुरू सामन होते. त्यांचा सहवास लाभला हे माझे भाग्यच अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

अप्पर जिल्हाधिकारी अमृत नाटेकर म्हणाले कि, गुरूंचे नमन करणे हि आपली भारतीय संस्कृती आहे. आश्रमात जावून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना चिकाटीने अभ्यासक करत रहा हा गुरुमंत्र स्वामींकडून मिळाला.कर्म करीत रहावे फळ आपोआप मिळते. स्वामींच्या या उपदेशात्मक सल्ल्यानुसार मी अथक परिश्रम केले. मला ६ वर्षाने या उपदेशाची अनुभूती मिळाली. स्वामींच्या आशीर्वादाने आज मी उपजिल्हाधिकारी आहे. 

डॉ.पी.डी पाटील म्हणाले कि, महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्याला मोठी संत परंपरा लाभलेली आहे. सिद्धेश्वर स्वामी हे ज्ञानाचे प्रतीक होते. त्यांच्या कडून समाजाला ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी आपल्या ज्ञानाने मानवाला सदमार्गाला लावले.ओंजळीत  मावेल तेवढेच अन्नग्रहण करीत होते. महान,त्यागी स्वामींनी आयुष्यात पैशाला स्पर्श केला नाही. अशा महान संतास आपण मुकलो आहोत.असे ते शेवटी म्हणाले.

डॉ. विजयालक्ष्मी बाळेकुंद्री म्हणाल्या कि, मन आणि बुद्धी. अंतरंगात असूनही एक्सरे काढला तरी दिसत नाहीत. ईश्वराला ओळखण्याची पात्रता आणि शक्यता या दोन अदृश्य अवयवांमध्ये आहे. पण या दोहोंचे स्वभाव विशेष टोकाचे. मन वेगवान, चपळ, चंचल आणि स्वैर, तर बुद्धी तेज, तरल, धारदार आणि प्रगल्भ. मनाचे स्वभावविशेष म्हणजे आहारी जाणे, भरकटणे, दिवास्वप्ने पाहणे, बुद्धीपासून दूर पळणे. तर बुद्धीचे स्वभावविशेष म्हणजे, विचार करणे, योग्य निर्णय घेणे, स्वप्ने खरी करणे व भरकटत्या मनाला ताळ्यावर आणणे. मनाला बुद्धीने हाताळले तर जीवन शांत आणि समृद्ध होते. हुशार सत्शील मुलाला बुद्धीने हाताळले तर तो विद्वान होईल. गुंड प्रवृत्तीच्या मनावर बुद्धी स्वतंत्रपणे राज्य करू लागली तर विध्वंसक ‘गॉडफादर्स’ निर्माण होतील. सद्‍गुरू श्री सिद्धेश्वर स्वामीजी म्हणतात, ‘सत्पुरुषांच्या संगतीत मनाचा विकार कमी होतो. मनाचा विकार कमी होत जाईल, तशी बुद्धीची प्रगल्भता वाढेल’.

हरहरे म्हणाले कि, निसर्गाने जसे दिले तसेच जगावे त्यामुळे मी अद्याप औषधे घेणार नाही अशी भूमिका घेणारे स्वामींच्या अंत्यसंस्कारास तब्बल ४० लाख जनसमुदाय उपस्थित होता हे चमत्कारिक आहे.

बसव सेनेबद्दल माहिती देताना अध्यक्ष राम नाईक म्हणाले कि, या संस्थेची स्थापना दि १४ जानेवारी २००१ रोजी बसवेश्वरांचे जन्मस्थान बसवन बागेवाडी येथे समाज हितासाठी केली. या संस्थेचे  उदघाटन महान ज्ञानयोगी परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या हस्ते करण्यात आले. हि संस्था २२ वर्षा पासून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित आहोत. 

यावेळी शेलार उद्योग समूहाचे अध्यक्ष विश्वनाथ शेलार यांनी स्वामींनी २०१४ साली लिहून ठेवलेल्या इच्छापत्र वाचून दाखवले. मीही नाही तुम्ही नाही. आयुष्य हे समुद्राच्या लाटाप्रमाणे,विझणार्या दिव्याप्रमाणे शून्य आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया चिक्केरुर यांनी तर आभार शंकरगौडा आदिमनी यांनी मानले. शेलार उद्योग समूहाच्या पुढाकाराने भोजन व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अण्णाराय बिराजदार, नंदकुमार साळुंखे,शिवण्णा नरुणी , आनंद जक्कनवर, अजय जाधव,युवराज कनवी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Mahaegs Maharashtra Recruitment
संबंधित लेख

लोकप्रिय