Monday, May 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयविशेष लेख: इस्रायलचे लेबोनॉन वर हवाई हल्ले,हुथीचे लाल समुद्रात जहाजांवर ड्रोन हल्ले,जागतिक...

विशेष लेख: इस्रायलचे लेबोनॉन वर हवाई हल्ले,हुथीचे लाल समुद्रात जहाजांवर ड्रोन हल्ले,जागतिक व्यापार संकटात

.

मध्यपूर्वेत युद्ध पसरण्याचा धोका वाढला

इराण समर्थीत हमास,हुथी,हिजबुल्ला आणि इस्रायल व अमेरिका या दोन्ही गटातील भीषण संघर्ष तीव्र झाला आहे.इस्रायलने लॅबोनॉन वर जोरदार हवाई हल्ले करून हिजबुल्लाहची ठिकाणे लक्ष करण्यास सुरुवात केली आहे
गाझा शहर पूर्ण बरबाद झाले असले तरी हमास दहशतवाद्यांबरोबर इस्रायलच्या सैन्याच्या चकमकी भीषण गोळीबार,इस्रायलच्या रणगाड्यावर हल्ले सुरूच आहेत,सलग तीन महिने सुरू असलेल्या या युद्धामध्ये पॅलेस्टाइनचे 20 लाख लोक नरकवास जीवन जगत आहेत.3 लाखाहून जास्त घरे गाझामध्ये उध्वस्त झाली आहेत,40 हजार हमास चे सैन्य अद्यापही गाझा मधील बोगद्यामधून प्रतिहल्ले करत आहे,अफाट ताकद असलेल्या इस्रायल समोर युद्धातील विजय दुरापास्त झालेला आहे.


लाल समुद्रातून मालवाहतूक करणाऱ्या जहाजांवरील हल्ले थांबवा,अन्यथा लष्करी कारवाई करू असा इशारा येमेनमधील हुथी बंडखोरांना अमेरिकेने दिला असला तरी हुथी बंडखोरांनी जहाजांवर ड्रोन,मिसाईल्स हल्ले सुरूच ठेवले आहेत.त्यामुळे भूमध्य समुद्र,सुएझ कालवा,लाल सागर मार्गे जगभर होणारी मालवाहतूक धोक्यात आली आहे.लाल सागर आणि एडनच्या आखातातून मार्गक्रमण करणे कठीण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांत 360 जहाजांनी (280 कंटेनर जहाजांसह) आपला मार्ग बदलून केप ऑफ गुड होप आणि सुएझ कालवामार्गे आपला प्रवास सुरू ठेवला आहे. या द्राविडी प्राणायमात जहाजांना 10 ते 12 दिवस जास्त प्रवास (1,900 नॉटिकल मैलांचा अधिक प्रवास) (विशेषतः आशिया-उत्तर युरोप मार्गावर) करावा लागतो.
इसरायलने हमास विरोधात केलेली लष्करी कारवाई व हजारो पॅलेस्टाईन मुले महिला यांच्या मृत्यूनंतर युद्ध विरामास इसरायल तयार नाही,आणि हे युद्ध चिघळणार आहे,त्यामुळे इराण,सीरिया,इराक,लॅबोनॉन मधील इस्रायल विरोधी सशस्त्र बंडखोरांनी आपला मोर्चा लाल समुद्राकडे वळवला आहे,हुथी बंडखोरांना इराण आधुनिक हत्यारासह मदत करत आहे.
सुएझ कालवा भूमध्य समुद्राला तांबड्या समुद्राशी जोडतो. या कालव्यातून दरवर्षी 20 हजार जहाजे जातात. 18 टक्के वार्षिक जागतिक व्यापार लाल समुद्रातून होतो.


एकूण 10 ट्रिलियन डॉलर्सचा माल लाल समुद्रातून आयात आणि निर्यात केला जातो. सुएझ कालवा आणि लाल समुद्राद्वारे भारताचा व्यापार सुमारे 200 अब्ज डॉलर्सचा आहे. हे सर्व लक्षात घेता लाल समुद्रातील हुथी बंडखोरांच्या हल्ल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी किती मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊ शकते, याचा अंदाज बांधणे सहजशक्य आहे. हे असेच सुरू राहिल्यास कच्च्या तेलाच्या आणि इतर आवश्यक उत्पादनांच्या किमती वाढू शकतात.कदाचित क्रूडच्या किमती वाढू शकतात,कारण
माल वाहतूक करण्यासाठी लागणारा वेळ 20 दिवसांनी उशीर होण्याची शक्यता आहे आणि खर्च 40-60 टक्क्यांनी वाढेल. जहाजे आणि माल मटेरियल विम्याच्या प्रीमियममध्ये 15-20 टक्क्यांनी वाढ होऊन आयात निर्यात महाग होऊ लागली आहे. त्यामुळे अमेरिकेने या सागरी परिसरात युद्धनौका,टेहळणी विमाने,मिसाईल्स सह संयुक्त लष्करी आघाडी हुथी बंडखोरांच्या बंदोबस्तासाठी स्थापन केलेली आहे,भारतीय नौदलाने सतर्क राहून सोमालिया,येमेन मार्गे येणाऱ्या आपल्या जहाजांना संरक्षण दिले आहे.लाल समुद्रात चाललेल्या या भीषण लढाईमध्ये अमेरिकेने मोठी कारवाई बजावली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार हुथी बंडखोर समुद्रात एका व्यापारी जहाजावर हल्ला करण्यास आले होते, सिंगापूरचा झेंडा असलेल्या व्यापारी जहाजावर हल्ला करण्यास आलेल्या हुथी बंडखोरांवर ताबडतोब अमेरिकेच्या लष्करी सैनिकांनी हल्ला केला.

गाझामधील युद्ध थांबले पाहिजे

युक्रेन युद्धापासून गाझा युद्धापर्यंत जागतिक महासत्ता सोयीचे राजकारण करत आहेत,विशेषतः युरोपमधून रशियाचे क्रूड,गॅसची बाजारपेठ तोडण्यासाठी 2008 पासून युक्रेनमध्ये अमेरिका व नाटो राष्ट्रांनी जो खेळ खेळला त्यातून 2014 व 2022 मध्ये रशियाने युक्रेनमध्ये लष्करी कारवाई केली,आताचे युक्रेन युद्ध हा अमेरिका व रशिया मधील मोठा संघर्ष 2023 मध्ये संपला नाही,त्यामुळे युरोपियन देशात व खुद्द अमेरिकेत 10 ते 12 टक्के चलनवाढ झाली आहे,2023 मध्ये रशिया,चीन,इराण,तुर्कस्तान,सीरिया,उत्तर कोरिया,अरब राष्ट्रे हा मोठा गट नाटो,अमेरिका आघाडीच्या विरोधात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पुढे आला आहे,आणि युक्रेन युद्धानंतर अमेरिका जागतिक स्तरावर बॅकफूटवर गेली आहे.


हमासच्या 7 ऑक्टोबर 2023 चा
इस्रायलवरील हल्ला अति क्रूर व जगाला अनपेक्षित होता,मात्र या हल्ल्यामागे हमासचा वापर करून अमेरिका,इस्रायल ला दुसऱ्या युद्धात गुंतवून ठेवण्यात कोणाचा कोणता सामरिक हेतू आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.तरी सुद्धा 2024 मध्ये इस्रायल हमास युद्ध थांबावे ही संयुक्त राष्ट्रसंघाची इच्छा आहे,मात्र इस्रायल सभोवताली असुरक्षितता अधिक वाढली आहे.
मात्र मंगळवारी लेबनॉनमध्ये हमासच्या एका सर्वोच्च नेत्याची झालेली हत्या आणि त्याच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित लॅबोनिज व हिजबुल्ला समर्थक आणि बुधवारी इराणमध्ये झालेल्या दुहेरी स्फोटात असंख्य जणांचा झालेला मृत्यू या पार्श्वभूमीवर पश्चिम आशिया आणि अमेरिका युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत.
अमेरिका,ब्रिटन,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बहारीन,बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, डेन्मार्क, इटली, जपान, सिंगापूर आणि नेदरलँड्स यांची नौदले,विमाने लाल समुद्रात गस्त घालत आहेत,तरीही हुथी बंडखोरांनी आपल्या कारवाया सुरू ठेवल्या आहेत.

अमेरिका गाझा मधील युद्ध थांबण्यासाठी प्रयत्नशील

अमेरिकेचे सेक्रेटरी अँटनी बिलकीन युद्धवर तोडगा काढण्यासाठी तुर्की येथे आले आहेत,इराणमध्ये झालेल्या बॉम्बहल्ल्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नाही,तरीही इराणने इस्राईलला जबाबदार धरले आहे, अँटनी बिलकीन इस्राईलबरोबर चर्चा करून युद्धविराम घडवण्याचा प्रयत्न करणार आहे.
गाझा मधील युद्धात हमासचे प्रचंड नुकसान झाले आहे,त्यांचे 9 हजार सशस्त्र दहशतवादी ठार झाले आहेत,इस्राईलचे 220 सैनिक मृत्यू पावले आहेत.या युद्धभूमीवर वार्तांकन करण्यास कोणी पत्रकार जात नसल्याने खरी आकडेवारी समोर येत नाही.
सीरिया,लॅबोनॉन,गाझा मधून इस्राईल शहरात हल्ले होऊ शकतात यामुळे इस्रायलमधील जनजीवन भीतीच्या छायेत आहे.


हमास इस्राईल यांच्यातील युद्ध हे क्रूड,नैसर्गिक गॅस एकूण जागतिक इंधन व्यापारात गुंतलेल्या अमेरिका व रशिया यांच्यातील सुप्त संघर्ष आहे.
खुद्द इस्रायल मधील जनतेला हे युद्ध नको आहे,मात्र अति उजव्या पंतप्रधान नेत्यांनाहू यांच्या कठोर भूमिकेला अमेरिका लगाम लावू शकलेली नाही,उलट इस्रायल सीरिया,लॅबोनॉन इथे प्रतिहल्ले करून चर्चेचे मार्ग बंद करत आहे,गाझा मध्ये हमास दहशतवादी शरण यायला तयार नाहीत,त्यामुळे अमेरिका अडचणीत आली आहे.याचा फायदा चीन व रशिया घेत आहे.इस्रायल विरोधात मध्यपूर्वेतील ५० हुन जास्त देश विरोधात गेले आहेत, तर यात रशिया आणि चीनचीही एन्ट्री झालेली आहे.अमेरिकेनंतर चीनच्या एक-दोन नव्हे तर सहा युद्धनौका अरबी समुद्रात पोहोचल्या आहेत. अरबी समुद्रात चीनच्या सहा युद्धनौकांच्या उपस्थितीमुळे तणाव वाढला आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी काळ्या समुद्रात लढाऊ विमाने तैनात केली आहेत. येमेनमधून एक-दोन नव्हे तर तीन क्षेपणास्त्रे इस्रायलच्या दिशेने डागण्यात आली होती.इराणने इस्रायलविरुद्धच्या युद्धाला जागतिक युद्धात रूपांतरित करण्याची धमकी दिली आहे.इराणने लेबनॉन,सीरिया, वेस्ट बँक,जॉर्डन,इजिप्त,भूमध्य समुद्र,लाल समुद्र आणि इराक या नऊ आघाड्यावर इसरायलला अडकवून ठेवण्याचे कारस्थान सुरू केले आहे,असे जागतिक तज्ञांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर आखाती देशांच्या दौर्‍यावर असलेल्या, ब्लिंकन यांनी अरब देशांवरही दबाव टाकला आहे. ‘हमास’ला इस्रायली बंधकांची सुटका करण्यास भाग पाडून, युद्धविराम करण्याचे प्रयत्न यशस्वी होतात का,यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.
जगाची वाटणी करण्यासाठी युक्रेनपासून महासत्तांच्या प्रोक्सि युद्धाला सुरवात झाली आहे,अति टोकाचा साम्राज्यवादी विस्तारवाद 2024 मध्ये तरी थांबला पाहिजे,कारण या संघर्षाचा आर्थिक फायदा युद्ध सामुग्री निर्मिती करणाऱ्या अमेरिकन,युरोपियन व रशियन कंपन्या घेत आहेत.आणि विकसनशील देश यामध्ये भरडले जात आहेत.

क्रांतिकुमार कडुलकर-पिंपरी चिंचवड

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय