अकोले : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर किसान सभेचे राज्य सरचिटणीस, शेतकरी नेते डॉ.अजित नवले यांना राहत्या घरी स्थानबद्ध केले आहे.
डॉ.नवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या नाशिक दौऱ्याच्या निमित्ताने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी व निर्यातबंदी लादल्यामुळे कांदा उत्पादकांचे झालेले नुकसान भरून मिळावे यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करावी अशी भूमिका घेतली म्हणून काल रात्री बारा वाजता पोलिसांनी राहत्या घरी येऊन मला नोटीस बजावत घरातच रात्रभर स्थानबद्ध केले व सकाळी सुद्धा मी नाशिकच्या दिशेने जाणार नाही याची पुरेशी खबरदारी घेतली.
मला नाशिकला जाण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले असले तरीही मी आमच्या मागणीचा पुनरुच्चार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या दौऱ्याच्या निमित्ताने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याबद्दल घोषणा करावी व कांद्याची निर्यात बंदी उठवावी अशी मागणी किसान सभेच्या वतीने करतो आहे, असेही डॉ.नवले म्हणाले.