Friday, May 17, 2024
HomeNewsDYFI चे रेल्वेशी निगडित समस्यांना घेऊन रेल्वे प्रशासनास निवेदन

DYFI चे रेल्वेशी निगडित समस्यांना घेऊन रेल्वे प्रशासनास निवेदन

परभणी : डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेच्या जिल्हा व पूर्णा तालुका समितींकडून रेल्वे विभागाशी संबंधित पूर्णेतील विविध समस्यांना घेऊन आज विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डी आर एम) व वरिष्ठ अभियंता यांच्या नावे पूर्णेतील स्टेशन व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, पूर्णेतील नांदेड व अकोला रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गावरील रस्ता मागच्या वर्ष दीड वर्षात खूप खराब झाला आहे. सर्व रस्ता उखळला असून त्यावर मोठं मोठे खड्डे झाले आहेत व गुडघ्याच्यावर पाणी साचत आहे. मागच्या वर्षी त्यात ऑटो पलटी होणे, मोठे कंटेनर्स रस्त्याच्या खाली उतरणे असे व इतर अपघात झाले आहेत. डीवायएफआय ही संघटना मागच्या वर्षीपासून सतत याचा पाठपुरावा करीत आहे‌ पण नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभाग या रस्त्याची जबाबदारी त्यांची नाही म्हणून एकमेकांवर टोलवण्याचे काम करीत होते. मात्र आता या रस्त्याची जागा रेल्वे विभागाच्या अधिकार क्षेत्रातच येते याची निश्चिती झाल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे व हा रस्ता करण्याची जबाबदारी रेल्वे विभागाचीच आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

या रस्त्यासोबतच त्या रस्त्याला लागूनच ड्रेनेज सिस्टमची सुद्धा समस्या असल्यामुळे नांदेड मार्गावरील पुलाखाली पाणी तुडुंब भरलेले असते, ज्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होतो. मागच्या वर्षी डीवायएफआय ने आंदोलन केल्यावर त्यावर तात्पुरता उपाय केला. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय काढावा असेही निवेदनात म्हटले आहे. 

या मागण्यांशिवाय नांदेड विभागात येणाऱ्या सर्व रेल्वे स्थानकांवरील साधारण / जनरल तिकीट कॉउंटर्स सुद्धा लवकरात लवकर सुरु करावे आणि यात्रा गाड्या व जलद गाड्यांचे तिकीट भाडे जे सरासरी केले आहे ते रद्द करून पूर्वी प्रमाणे तिकीट दर करावेत, नांदेडहून दौंडला जाणारी यात्रा गाडी सुद्धा सुरु करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

या मागण्या पुढील ८ दिवसांत पूर्ण न केल्यास १० जुलैला संघटनेकडून रास्ता रोको करण्यात येईल असे जिल्हा सचिव नसीर शेख यांनी सांगितले.

निवेदनावर डीवायएफआय चे राज्य सहसचिव तथा जिल्हा सचिव नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका सचिव अमन जोंधळे, तालुकाध्यक्ष सचिन नरनवरे, जिल्हा तथा तालुका कोषाध्यक्ष जय एंगडे, तालुका सहसचिव अजय खंदारे, शहर अध्यक्ष सुमित वेडे व शहर सचिव संग्राम नजान आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय