Sunday, May 19, 2024
Homeग्रामीणकोरोनाच्या काळात न्हावेड गावातील तरुणांनी "आमच्या गावातील आमची शाळा - शाळा बंद...

कोरोनाच्या काळात न्हावेड गावातील तरुणांनी “आमच्या गावातील आमची शाळा – शाळा बंद पण शिक्षण चालू” हा अनोखा उपक्रम केला सुरु

घोडेगाव  : 2020 साला चे आगमन झाले आणि नावाचा विषाणू (पाहुणा म्हणून) आपल्या भारत देशात येऊन पोचला त्याच्या सहवासाचे पडसाद शहरी व ग्रामीण भागात चांगल्या व वाईट स्वरूपात प्रत्यक्षात अनुभवयास मिळत आहेत. कोवीड -१९ या महामारीमुळे देशातील सर्व क्षेत्रात परिस्थिती चिंताजनक बनली आहे. उद्योग, व्यवसाय, दळणवळण, अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि अशा अनेक क्षेत्रातून मानवी जीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे. 

परंतु तरीही या कठीण काळात सुद्धा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर परिसरामध्ये वसलेल्या ‘न्हावेड’ या छोट्याशा आदिवासी गावात घडत आहे, एक ऐतिहासिक – सामाजिक समन्वय तत्त्वाचे अनमोल कार्य 22 मार्च 2020 या दिवसापासून महाराष्ट्रातील सर्व शाळा व महाविद्यालयाचे दरवाजे विद्यार्थ्यांसाठी बंद झाले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आता 15 जून 2020 रोजी पण शाळा सुरू झाल्या नाहीत. मात्र शासनामार्फत ऑनलाइन स्वरूपात शिक्षण कार्याची घोषणा होऊन कार्यप्रणाली सुरू झाली. पण मात्र शिक्षण प्रणालीचा प्रभावी फायदा व अंमलबजावणी ग्रामीण भागात प्राकृतिक व अनेक सुविधांच्या अभावामुळे फारशी प्रभावीपणे राबविली जाऊ शकत नाही. 

     

त्यामुळे या गावातील मुलांच्या शिक्षणाचे काय? त्यांच्या भवितव्याचे काय होणार? अशा अनेक समस्यांचे गांभीर्य विचारात घेऊन मुलांचे मन शिक्षणापासून भरकटू नये. मुलांमधील अभ्यास करण्याच्या सवयींमध्ये सातत्य राहून हि अभ्यासाची सवय सक्रीय व निरंतर जोपासली जावी. या उद्देशांच्या पार्श्वभूमीचा विचार करून न्हावेड गावातील सुशिक्षित व उच्चशिक्षित युवक व युवतींनी तरुण मंडळाच्या माध्यमातून गावातील ग्रामस्थ, पालक वर्ग, व गावातील पण नोकरीनिमित्त शहरी भागामध्ये असणारे नोकरदार वर्ग यांच्या सहकार्यातून “आमच्या गावातील आमची शाळा” – शाळा बंद पण शिक्षण चालू हा अनोखा उपक्रम रविवार दिनांक 21 जून 2020 रोजी प्रत्यक्षात राबविण्यास सुरुवात केली.

परंतु 3 जून 2020 या दिवसाच्या चक्रीवादळामुळे गावातील जि. प. प्राथ. शाळा व सार्वजनिक समाज मंदिर या इमारतींचे पत्रे उडून गेले आणि बांधकाम पण काही अंशी खचले आहे. जून व जुलै महिन्यात पावसाचे जास्त प्रमाण, विजेचा/लाईटीचा नेहमी अनियमित पुरवठा अशा एक ना अनेक समस्या युवकांच्या समोर ‘आ’ वासून उभ्या होत्या. परंतु तरी ही या गावातील तरुणांनी आपले मनोधैर्य खचून न देता अतिशय हिमतीने सर्वांच्या विचार विनिमयातून नियोजन करून निर्णय घेतला. सुरुवातीस त्या गावातील एका व्यक्तीच्या घरात शाळा -अभ्यास वर्ग सुरू केला. 

परंतु काही दिवसाने पावसाचे प्रमाण थोडेफार कमी झाल्याने 9 ऑगस्ट 2020 या दिवसापासून गावातील २० ते २२ वर्षांपूर्वी पासून असलेल्या अतिशय जीर्ण/ जुने सार्वजनिक समाज मंदिर इमारतीमध्ये नियोजन करून शाळा अभ्यासवर्ग शिक्षणाचे कार्य चालू ठेवले आहे. या शाळेमध्ये इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे मूलभूत अध्यापन केले जाते आहे. इयत्ता, वेळ, विषय, अध्यापक करणारे घटक यांचे नियोजन करून वेळापत्रक तयार करून अध्यापन केले जात आहे.

आठवड्यातील रविवार या दिवशी स्पर्धा परीक्षा उपयुक्त जनरल नॉलेज (सामान्य ज्ञान) विषयावर चर्चासत्र घेतली जातात. 

या उपक्रमाची विशेष नोंद म्हणजे हे कार्य तरुण मंडळाने स्वयंस्फूर्तीने व मोफत करीत आहेत. तसेच गावातील ग्रामस्थ पालकवर्ग, नोकरदार वर्ग यांची सदैव सक्रीय सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. दुसरे विशेष म्हणजे जि. प. प्राथ.शाळा मधील शिक्षक वृंद व त्यांचे नेहमीच सहकार्य मिळत आहे. दि. 4 ऑक्टोबर 2020 या दिवशी त्यांच्या सहकार्यातून काही आधुनिक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था, संघटना शासकीय वर्ग विविध प्रशासकीय कार्यालय प्रतिनिधी सुद्धा या उपक्रमास प्रत्यक्ष भेट देत आहेत. त्यांच्या सानिध्यातून मार्गदर्शन व सहकार्यामुळे आम्हाच्या कार्यास प्रेरणा मिळते असे या तरुण मंडळाचे म्हणणे आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय