Thursday, September 19, 2024
Homeकृषीकिसान सभेची मागणी: सदोष बियाणे प्रकरणी पंचनामे करून दोषींवर कारवाई करा.

किसान सभेची मागणी: सदोष बियाणे प्रकरणी पंचनामे करून दोषींवर कारवाई करा.

कृषी सेवा केंद्र अखंडितपणे सुरू ठेवा.


मुंबई :-  सदोष बियाणे प्रकरणी पंचनामे करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेने राज्य सरकारकडे केली आहे.

           सोयाबीनचे सदोष बियाणे वितरित झाल्यामुळे सोयाबीन पेरा वाया गेल्याच्या गंभीर तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. उगवण न झालेल्या शेतांमध्ये शेतकऱ्यांना दुबार पेरणी करायची आहे. मात्र लेखी तक्रार करूनही कृषी विभागाच्या वतीने नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडत आहे, असल्याचे किसान सभेने म्हटले आहे.

             अशातच राज्यभरातील कृषी सेवा केंद्र दर रविवारी बंद रहात असल्याने शेतकऱ्यांना हंगामाच्या काळात निविष्ठा उपलब्ध होताना अडचणी येत आहेत. कृषी सेवा केंद्रांच्या राज्य संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यभरातील कृषी सेवा केंद्र आठवड्यातून एकदा बंद ठेवण्यात येत आहेत. बहुतांश ठिकाणी रविवारी केंद्र बंद ठेवली जात आहेत. तोंडावर आलेला हंगाम व कोरोनामुळे अगोदरच खंडित झालेली वितरण साखळी पाहता कृषी सेवा केंद्राच्या राज्य संघटनेने आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.

               कोरोना लॉकडाऊनमुळे वितरण व्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे खरीप हंगामात खते, बियाणे, औजारे यांचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो, तसेच लॉकडाउनच्या संधीचा गैरफायदा घेत बियाण्यांच्या गुणवत्तेत फेरफार होऊ शकतो, असा इशारा किसान सभेने हंगामापूर्वीच दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांना या संबंधीचे निवेदनही देण्यात आले होते. मात्र तरी पुरेशी खबरदारी घेतली गेली नाही ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे किसान सभेने म्हटले आहे

                सोयाबीनच्या बनावट बियाण्यांचे वितरण, खतांची राज्यभरातील टंचाई व निविष्ठांचा तुटवडा हे खरिपाच्या तयारीत सरकारी यंत्रणेने निष्काळजीपणा केला असल्याचेच लक्षण आहे. राज्य सरकारने आता तरी याबाबत गांभीर्याने हस्तक्षेप करावा. वाया गेलेल्या पेऱ्याच्या शेतात शेतकऱ्यांना वेळेत दुबार पेरणी करायची असल्याने अशा शेतांचे तातडीने पंचनामे करावेत, दोषींवर कारवाई करावी. शेतकऱ्यांना संबंधित कंपनीकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याची व कृषी सेवा केंद्र अखंडितपणे सुरू राहतील यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, जे.पी.गावीत, राज्य अध्यक्ष किसन गुजर, कार्याध्यक्ष अर्जुन आडे, राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले, उमेश देशमुख यांनी केली आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय