Monday, May 20, 2024
Homeआंतरराष्ट्रीयभारताच्या शांततेला चीनने भित्रेपणा समजू नये.

भारताच्या शांततेला चीनने भित्रेपणा समजू नये.

         दगाबाज चीनने 15 जूनच्या मध्यरात्री गलवान खोऱ्यात अचानकपणे भारतीय सैन्यावर हल्ला केला आणि एका कमांडरसह 20 भारतीय जवानांनी आपले प्राण गमावले. दगड आणि खिळे असलेल्या काठ्यांनी त्यांनी भारतीय सैन्यावर हल्ला केला. सीमेवर खिळे असलेल्या काठ्यांचं कोणतं काम. यावरून हा हल्ला म्हणजे सुनियोजित कटच होता. यात संशय उरला नाही. त्यातच दोनच दिवसांनी चिनी माध्यमांनी त्यांच्या सैन्यसरावाची चित्रफित व्हायरल करून एकप्रकारे या कटकारस्थानाची पुष्टीच केली आहे. या हल्ल्यांमध्ये चीनचेही काही सैनिक मारले गेल्याची चर्चा आहे. चीन अधिकृतपणे हे मान्य करीत नसला तरी आम्हाला आमच्या जवानांच्या पराक्रमावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी मरता-मरता चाळीस-पन्नास चिन्यांना यमसदनी धाडलेच असणार. या घटनेने संपूर्ण भारत देश शोकमग्न आणि तेवढाच संतापलेला आहे.  परत एकदा हे सिद्ध झाले आहे की, चीन हा दगाबाज तर आहेच मात्र तोच आपला शत्रू नंबर एक सुद्धा आहे.

        चिन दगाबाज कसा आहे आणि त्याने भारताची चहूबाजूने कोंडी कशी केली, यासंदर्भात मागील लेखांमध्ये विवेचन करण्यात आले होते. चीन हा भारताचा कधीच सच्चा मित्र नव्हता. तरीसुद्धा आपण मित्रत्वाचा हात वारंवार त्यांच्या पुढे केला.  2014 ते 2019 या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग हे अठरा वेळा एकमेकांना भेटले आहे. यापैकी पाच वेळा तर स्वतः मोदी हे चीनमध्ये जाऊन आले. मोदींच्या परराष्ट्रीय नीतीमध्ये शेजारी राष्ट्रांच्या प्रमुखांची प्रत्यक्ष भेट घेण्याला  प्राधान्य देण्यात येत होते. शेजारील राष्ट्रांच्या प्रमुखांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी किवा त्यांच्या सणाच्या दिवशीही ते शुभेच्या देत असत आणि यामध्ये काही वावगं नाही. प्रत्यक्ष भेट आणि चर्चेमधून आपण अधिक जवळ येऊ असा त्यांना विश्वास होता. मात्र चिन आतल्या गाठीचा असल्याने त्याने अशा भेटीचे काहीच मोल ठेवले नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

        या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी चिनी वस्तूंची होळी होत असून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे. भारताने बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्यांमध्ये 4G तंत्रज्ञानासाठी वापरण्यात येणाऱ्या चिनी यंत्रसामुग्रीच्या खरेदीवर बंदी घातली आहे. एका चीनी कंपनीचे 471 कोटींचे रेल्वेचे कंत्राटही रद्द केले आहे. चेंबर ऑफ कॉमर्सने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ज्या चिनी वस्तूंच्या ऑर्डर दिल्यात त्या रद्द करण्याचा संदेश पाठविला आहे. देशातील विविध क्षेत्रातील अनेक नामवंतांनी या पार्श्वभूमीवर स्वदेशीचा नारा दिला आहे. चिनी वस्तूंचा बहिष्कार हा मुद्दा यासाठी विशेष आहे की, आजघडीला भारतीय बाजारपेठ चिनी वस्तूंनी व्यापून गेलेली आहेत. आपल्या दैनंदिन वापरातील बहुतांश वस्तू या चिनी बनावटीच्या आहेत. भारत हा चिनी वस्तूंचा मोठा आयातदार देश आहे. आपण चीनकडून खते,रसायने, औषधी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळणी, सजावटीच्या वस्तू, फर्निचर, रंग, धातू, प्लास्टिक, मोबाईल फोन, यासोबतच टूथपेस्ट, ब्रश, पेन्सिल, पेन अशा एकना अनेक वस्तूंची आयात करीत असतो. ही यादी फारच मोठी आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास पेन्सिल पासून तर मोबाईल टॉवरच्या एंटीना पर्यंत चिनी वस्तूंनी आपली बाजारपेठ व्यापली आहे. भारतात आज घडीला जे मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत त्या सर्वांमध्ये चिनी गुंतवणूक आहे. अगदी नागपूरच्या मेट्रो मध्ये सुद्धा. त्यामुळे आपण चिनी वस्तूंवर किती अवलंबून आहोत हे स्पष्ट होते.

          या सर्वच वस्तूंची भारतामध्येही निर्मिती होते. मात्र भारतीय वस्तू ह्या चीनच्या तुलनेत महाग मिळत असल्याने त्याचा खप कमी असतो. त्यातल्या त्यात विदेशी वस्तू वापरण्याची मानसिकता अलीकडे भारतीयामध्ये वाढू लागली आहे. 2018-19 या एका वर्षात भारताने 95 अब्ज डॉलरची आयात चीनमधून केली होती. कोरोंना संकटाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी त्यामध्ये 12.5 टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. हे विशेष. चिनी वस्तूंच्या संदर्भात एक म्हण प्रचलित आहे, चली तो चाँदतक नही तो  शामतक. असे असतानाही केवळ स्वस्त मिळत असण्याच्या मोहापायी त्या घेतल्या जातात. आपणही चीनला वस्तू निर्यात करतो मात्र आपण जेवढ्या वस्तू व मालाची निर्यात करतो, त्याच्या चौपट चीन भारतात पाठवीत असतो.

            बरं आता मुद्दा हा उरतो की, एखाद्या देशाच्या वस्तूंवर असा बहिष्कार टाकण्याचे निर्देश सरकार देऊ शकते काय? किंवा त्या देशातून आयात होणाऱ्या मालावर बंदी आणू शकते काय? तर तूर्तास याचे उत्तर नाही असेच द्यावे लागेल. कारण भारत जागतिक व्यापार संघटनेशी जोडला असल्याने अशी कोणतीही कृती ही नियमबाह्य ठरविली जाते.कारण असे केले तर हाच नियम भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तूंनापण लागू होऊ शकतो. चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात आयात कर लावल्यास त्या वस्तूंच्या किमती वाढतील आणि बाजारपेठेत त्यांची मागणी घटेल असे काही करता येऊ शकते.

         चीनच्या या हल्ल्यामागे त्याची विस्तारवादी भूमिका दडलेली आहे, हे स्पष्टच आहे. कारण 1962 मध्ये चीनने असेच आक्रमण करून भारताचा 42 हजार 735 की.मी. एवढा प्रचंड प्रदेश अवैधरित्या मिळवला होता. हा प्रदेश आजही चीनच्याच ताब्यात आहे. या वेळेलाही भारताचा काही प्रदेश गिळंकृत करण्याचा त्याचा मनसुबा आहे. एक-एक करून भारताचे सगळेच मित्र चीनने आपल्या दावणीला बांधले आहे. काल परवा पर्यंत आपल्या सोबत असणारा नेपाळही आपल्यावर डोळे काढत आहे. कारण त्याच्यावर चीनचा वरदहस्त आहे.

          चिनी वस्तूंचा बहिष्कार व होळी ही तर होतच राहणार, नव्हे व्हायलाच पाहिजे. कारण आपलाच पैसा जर आपल्या  विरोधात वापरल्या जात असेल तर असा बहिष्कार हा झालाच पाहिजे. पण यासोबतच दगाबाज चीनचे  मिचमिचणारे डोळे भीतीने सताड उघडे राहतील, अशी काहीतरी ठोस कृती करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. चीनने भारताच्या शांती अहिंसेच्या धोरणाला भित्रेपणा समजू नये. कारण ज्या देशात बुद्ध आणि गांधींनी जन्म घेतला त्याच देशात भगतसिंग सुखदेव व राजगुरूही जन्मास आले होते. हे चिनने विसरू नये.

 

   

– प्रा. डॉ. संतोष संभाजी डाखरे

– राज्यशास्त्र विभागप्रमुख, 

  राजे विश्वेश्वरराव                  

– महा.भामरागड,गडचिरोली

8275291596

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय