Friday, May 17, 2024
Homeराज्यमहाज्योतीच्या ढिसाळ कारभारावर राज्यातील ओबीसी विद्यार्थी आण संघटना आक्रमक, वडेट्टीवार आणि डांगे...

महाज्योतीच्या ढिसाळ कारभारावर राज्यातील ओबीसी विद्यार्थी आण संघटना आक्रमक, वडेट्टीवार आणि डांगे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र !

पुणे : महाराष्ट्र सरकारमार्फत ९ ऑगस्ट २०१९ रोजी ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी प्रवर्गासाठी “महाज्योती” संस्था सुरू करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यन्वित केली आणि या संस्थेच्या माध्यमातून संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये उच्च शिक्षण (Ph.D. आणि M.Phil.) घेणाऱ्या तरुणांना आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली. मात्र आता संस्थेच्या मनमानी आणि ढोबळ कारभारामुळे महाराष्ट्रातील उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना चांगलाच फटका बसत असल्याचा आरोप आता विद्यार्थी करत आहेत.

“महाज्योती” संस्थेमार्फत आलेल्या एप्रिल २०२१ ची जाहिरात कुठल्याही प्रकारच्या नियमांनुसार काढलेली नाही. या जाहिरातीमध्ये अमाप त्रुटी आहेत की ज्यांमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या जाहिरातीमध्ये दिले आहे की २०१९ नंतरच्या विद्यार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल. पण मग त्याअगोदरच्या सन २०१८ आणि २०१७ च्या शिक्षण चालू असणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? महाज्योतीने दरमहा रुपये २०,००० एवढे आर्थिक सहाय्य मिळेल असे जाहिरातीमध्ये सांगितले आहे. परंतु हे कोणत्या निकषांवर ठरवले आहे? कारण UGC च्या नियमांनुसार सर्व देशात अधिछात्रवृत्ती ही रुपये ३१,००० दरमहा इतकी मिळते आहे तर मग आपण ही जाहिरात काढण्यापूर्वी बाकी नियमांचा अभ्यास केला की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

तसेच ही जाहिरात फक्त १५० विद्यार्थ्यांसाठी काढली आहे आणि महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गाचा विचार करता या जागा अल्प प्रमाणात आहेत. त्यामुळे संस्थेने विद्यार्थ्यांशी चर्चा करुन जाहिरातीतील त्रुटी दुरुस्त कराव्यात व नवीन दुरुस्त केलेली जाहिरात लवकर प्रसिद्ध करावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

महाज्योती संस्थेच्या अशा रटाळ आणि मनमानी कारभारामुळे उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. ओबीसी जनतेच्या जीवावर निवडुन आलेले मंत्री विजय वडेट्टीवार त्याच ओबीसी समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यात मात्र असमर्थ झाले आहेत. जर मंत्री महोदयाना खरचं समाजातील विद्यार्थ्यांसाठी काही वाटत असेल तर त्यांनी लवकरात लवकर महाज्योतीकडून सुधारीत जाहिरात काढुन सरसकट बार्टी आणि सारथीप्रमाने सर्वच विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी. नाहीतर स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी आणि संचालक डांगे यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

समाजाची दिशाभूल केल्याप्रकरणी आणि महाज्योती फेलोशिपमधील चुकांसाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात धाव घेण्याची तयारी देखील उच्च शिक्षण घेणाऱ्या राज्यातील ओबीसी विद्यार्थी आणि विविध ओबीसी संघटनेकडून केली जात असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय