Sunday, May 19, 2024
HomeNewsएसटी प्रवासी बसथांब्यासह शहरात नवीन सुसज्ज महिला स्वच्छतागृहाची मागणी

एसटी प्रवासी बसथांब्यासह शहरात नवीन सुसज्ज महिला स्वच्छतागृहाची मागणी

शहरात अतिरिक्त 50 महिला स्वछतागृहे लवकर बांधणार

आयुक्त राजेश पाटील यांचे वुई टूगेदर फाउंडेशन संस्थेला आश्वासन

पिंपरी चिंचवड
: शहरातील वाकड, नाशिकफाटा, चिंचवड स्टेशन, निगडी येथील एस टी बस थांबे, पीएमपीएल प्रवासी बस स्टॉप तसेच आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, निगडी ई सह आठही क्षेत्रीय प्रभागमध्ये महिला स्वच्छतागृहे सुरू करा. अशी मागणी वुई टूगेदर फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

संस्थेच्या सोनाली मन्हास, स्मिता जाधव, शैलजा कडुलकर, तारा बोऱ्हाडे, सलीम सय्यद या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
चिंचवड, निगडी, आकुर्डी, प्राधिकरण, कृष्णानगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर, रूपीनगर, तळवडे सह विविध प्रभागात तहसीलदार, तलाठी, निबंधक, पोस्ट ऑफिस, मनपा दवाखाने, पीएमपीएल बस स्टॉप, बँका सह शासकीय आणि कार्पोरेट कार्यालये, शॉपिंग सेंटर आहेत. कामानिमित्त बाहेर पडलेल्या महिलांसाठी सदर परिसरात सुरक्षित मुतारी व स्वछतागृहांची सुविधा उपलब्ध नाही. विशेषतः निगडी, चिंचवड स्टेशन, नाशिकफाटा, वाकड येथे एस टी महामंडळाचे प्रवासी थांबे आहेत. याठिकाणी आंतरजिल्हा प्रवासीसंख्या मोठी आहे. तेथे प्राधान्याने महिला स्वछतागृहे असावीत. अशी मागणी आम्ही करत आहोत.

पुरेशी सुसज्ज स्वछतागृहे नसल्यामुळे महिला, मुलींची कुचंबणा होत आहे. प्रत्येकवेळी युरीन नियंत्रित केल्यामुळे मूत्रपिंड इन्फेक्शन सारख्या आजारांना महिला बळी पडतात. सर्वसामान्य महिला पासून ते कार्पोरेट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांना अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे महिला प्रतिनिधींनी सांगितले.

विशेषतः महिला पोलिसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. बंदोबस्तावेळी दिलेली ड्युटी किंवा बारा तास घराबाहेर करावी लागणारी नोकरी यामध्ये पोलीस महिलांची कुचंबणा होते. पोलीस चौकीच्या ठिकाणी स्वतंत्र महिला स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्या वेळी महिला पोलिसांना शेजारील सोसायटीमध्ये स्वच्छतागृह वापरण्यासाठी विनंती करावी लागते. भाजीविक्रेत्या महिला, गवंडीकाम, तसेच इतर किरकोळ विक्रीव्यवसाय करणाऱ्या महिलांना अशा समस्या वारंवार उद्भवतात. प्रशासनाने या सर्व अडचणींचा विचार करून प्रत्येक प्रभागात महिलांसाठी स्वतंत्र पुरेशी स्वछतागृहे बांधावीत, अशी मागणी केली.

आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले की, शहरात अतिरिक्त 50 सुसज्ज महिला स्वछतागृहे बांधण्यात येत आहेत. नोकरी, व्यवसाय, प्रवास, दैनंदिन कामानिमित्त शहरात महिलांच्या या गरजा पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात सलीम सय्यद, मनीषा लाटकर, मनीषा सपकाळे, अर्चना धाणके, कविता मंदोधरे, डॉ.किशोर खिल्लारे, श्रीनिवास जोशी, शंकर कुलकर्णी, स्वप्निल जेवळे, क्रांतिकुमार कडुलकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय