Sunday, May 19, 2024
Homeराज्यसंरक्षण उत्पादन क्षेत्र अतिसंवेदनशील आहे. त्याचे खाजगीकरण राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक ठरू शकते...

संरक्षण उत्पादन क्षेत्र अतिसंवेदनशील आहे. त्याचे खाजगीकरण राष्ट्रीय सुरक्षेला धोकादायक ठरू शकते – क्रांतिकुमार कडुलकर

पिंपरी चिंचवड : भारतातील संरक्षणसामुग्री, शस्त्रे, दारुगोळा, रायफली, रणगाडे इ. 650 प्रकारची उत्पादने आयुध निर्मिती कारखान्या मार्फत (Ordnance Factories) संरक्षण संशोधन विकास (DRDO) आणि संरक्षण सार्वजनिक सरकारी उपक्रम (Defence PSUs) यांच्या मार्फत केली जातात.

1857 च्या बंडा नंतर ब्रिटिशांनी 12 दारुगोळा आणि आयुध निर्माण कारखाने उभे केले. भारताच्या सैन्यदलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बुटापासून लढाऊ विमाने निर्माण करण्यात संरक्षण उद्योगातील लाखो कामगारांनी गौरवास्पद कामगिरी केली आहे. एम टी एस एस डी वर्कर्स युनियन (संलग्न ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज युनियन AIDEF) च्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त दीपप्रज्वलन क्रांतिकुमार कडुलकर कार्यालयीन सचिव मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पिंपरी चिंचवड यांनी केले त्यावेळी ते बोलत होते.

खडकी युनियन सभागृहात कामगारांना संबोधित करताना क्रांतिकुमार कडुलकर पुढे म्हणाले की, संरक्षण उत्पादन क्षेत्र आणि त्याची उत्पादने नफ्या तोट्यासाठी नसतात. कोणत्याही क्षणी युद्ध जन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. युद्धात संरक्षण उत्पादन क्षेत्रातील 4 लाख कामगारांनी अहोरात्र कारखाने सुरू ठेवून युद्धे जिंकली आहेत. मात्र केंद्र सरकारच्या नव्या आर्थिक धोरणाने मेक इन इंडिया द्वारे संरक्षण उत्पादन क्षेत्रात 100 टक्के खाजगी उद्योगांना परवाना देण्यात आला आहे.

 

भारतातील खाजगी कार्पोरेटचा डोळा संरक्षण उद्योगाच्या मालकीच्या हजारो हेक्टर जमिनी वर आहे. संरक्षण मंत्रालयाचे अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणि अंदाजपत्रक खाजगी उद्योजकाना फायदा देण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड, भारत डायनॉमिक्स लिमिटेड, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपन्या आजारी पाडण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. आर्मीबेस वर्कशॉप बँड करून ते खाजगी कंपन्यांकडून करार तत्वावर चालवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

41 आयुध निर्माण कारखान्याची 60 हजार एकर जमीन पुणे, आवडी, नागपूर, कानपुर, जबलपूर, मेडक इ. मोक्याच्या शहरात आहेत, तसेच आयुध कारखान्याची सर्व यंत्रसामुग्री सुसज्य आहे. खाजगी उद्योगपती फक्त नफे कमवतील आणि हळू हळू कंत्राटी करणामुळे तीन लाख  कामगारांचे भविष्य अंधारात जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण उद्योगाचे खाजगीकरण धोक्याचे आहे. ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन आणि एम टी  एस एस डी वर्कर्स युनियनच्या सभासदांनी खाजगीकरणाच्या प्रत्येक धोरणाला विरोध करावा असे आवाहनही कुडलकर यांनी केले आहे.

एम टी एस एस वर्कर्स युनियनच्या 73 व्या वर्धापन दिन कार्यक्रमास युनियनचे अध्यक्ष गोपाळ पिसे, मोहन होळ, निलेश झपके, दयानंद मावळीकर, प्रभाकर गजमल, शशिकांत सोळंकी, अरविंद कुमार पाटील, राजू बांग हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते, यावेळी सूत्र संचालन टिपू सुलतान मुल्ला यांनी केले तर समारोप सलीम सय्येद यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय