चणे किंवा काळे वाटाणे अशी versatile गोष्ट आहे कि नुसते भिजवून खाल्ले तरी चांगले लागतात; भाजून फोडून चणे केले तरी चांगले लागतात, निव्वळ उकडूनसुद्धा खाता येतात किंवा मसालेदार भाजीही करता येते.
भिजण्यास वेळ – ८ तास
मोड येण्यास वेळ – १६ तास
करण्यास वेळ – २० मिनिटे
मोड येण्याची आवश्यकता नाही. नुसते भिजलेले चालतात.
चना मसालाचे साहित्य :
काळे वाटाणे – २ वाट्या
कांदे – २ मध्यम
टोमॅटो – १ मध्यम
लसूण – ६-७ पाकळ्या
आलं, कोथिंबीर
चना मसाला / छोले मसाला / गरम मसाला / कांदा-लसूण मसाला / उसळ मसाला – काहीही एक
चना मसाला कृती :
चणे उकडावेत. अगदी लगदा नको.
कांद्याची आणि टोमॅटोची प्युरी करावी.
लसणीच्या पाकळ्या ठेचाव्या. आलं ठेचावं.
कढईत नेहमीपेक्षा थोडे जास्त तेल घ्यावे. गरम झाल्यावर त्यात जराशी मोहरी टाकून तडतडल्यावर हिंग, हळद, ठेचलेलं आलं आणि ठेचलेली लसूण घालावी.
सतत परतावे व तयार केलेली कांद्याची पेस्ट घालावी. १-२ मिनिटे परतल्यावर चना मसाला / छोले मसाला / गरम मसाला / कांदा-लसूण मसाला / उसळ मसाला (यांपैकी जे उपलब्ध असेल ते), तिखट टाकून पुन्हा परतावे. यानंतर त्यात अर्धा चमचा साखर घालावी. त्यामुळे भाजीला तेलाचा तवंग येतो.
अजून ४-५ मिनिटे परतून टोमॅटो पेस्ट घालावी आणि बाजूबाजूने तेल सुटे पर्यंत ढवळत राहावे.
उकडलेले चणे टाकून व्यवस्थित ढवळावे. किंचित पाणी घालून शिजवावे .
या भाजीला जास्त रस नसावा. पण पूर्ण कोरडीसुद्धा करू नये.
गरमागरम चण्याच्या उसलीचा आस्वाद घ्यावा.