Tuesday, May 21, 2024
Homeराज्यबाबासाहेबांच्या राजगृहावरील हल्लेखोरावर मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश; राजकीय वर्तुळातून विविध पडसाद

बाबासाहेबांच्या राजगृहावरील हल्लेखोरावर मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश; राजकीय वर्तुळातून विविध पडसाद

(मुंबई) :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर काल (दि.७) संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचा, कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

       मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटले आहे की, राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे.

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. तसेच कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे कि, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्हं असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनानं घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरू केलंय.

       गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कारवाई करण्याचे आदेश देत म्हंटले आहे की, दादर येथील ‘राजगृह’ या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.

     वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे की, राज्यातील सर्व आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. ‘राजगृह’ आपल्या सर्वांसाठी आदराचे ठिकाण आहे. माझे आपल्या सर्वांना आवाहन आहे की, आपण शांतता राखावी.

      विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे की, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे. मी स्वतः मा. भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर चर्चा केली तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय