Friday, May 3, 2024
Homeआंबेगावपदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद, सामूहिक राष्ट्रगीताने होणार समारोप

पदयात्रेला नागरिकांचा प्रतिसाद, सामूहिक राष्ट्रगीताने होणार समारोप

आंबेगाव : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील सुमारे 30 पेक्षा अधिक गावातून ही पदयात्रा येत आहे. सुमारे 70 ते 90 किलोमीटर चालत येत पदयात्रा आहे. गावागावात संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन होत आहे.

किसान सभा, आंबेगाव तालुका समिती, आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच व एस.एफ.आय.आंबेगाव तालुका समिती यांच्या वतीने ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. मागील दोन दिवस चालून ही पदयात्रा गावागावात संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन करत आहे. आतापर्यंत सुमारे 40 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पायी चालत ही पदयात्रा येत आहे.

यावेळी आदिवासी भागातील विविध धोरणात्मक प्रश्नावर लोकांशी संवाद साधत व पेसा, वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी योग्य ते मार्गदर्शन करत ही पदयात्रा पुढे येत आहे. ही पदयात्रा गावात पोहचल्यावर गावातील नागरिकाना सोबत घेऊन महापुरुषांना अभिवादन करते, व त्यांनंतर संविधान उद्देशपत्रिकेचे वाचन करून त्यावर चर्चा घडवून आणत आहे.

आहुपे परिसरातून व कोंढवळ परिसरातून अशा दोन ठिकाणाहून ही पदयात्रा तीन दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. आतापर्यंत 12 ते 15 गावात ही पदयात्रा पोहचली आहे. आज सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत म्हणून या पदयात्रेचा समारोप होणार आहे. या पदयात्रेला स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न यावेळी त्यांनी संघटनेच्या पदाधिकारी यांच्यापुढे मांडले.

किसान सभेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष कृष्णा वडेकर, उपाध्यक्ष राजू घोडे, सचिव अशोक पेकारी, देविका भोकटे, एस.एफ.आय.चे अविनाश गवारी, दीपक वाळकोली, समीर गारे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा सुरू आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय