मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणारा अकोला-खांडवा प्रस्तावित रेल्वे गेज परिवर्तन या प्रकल्पाच्या बाहेरून इतर पर्यायी भागातून करावे अशी विनंती पत्रान्वये केली आहे.
भारतीय वन्यजीव संस्थेने या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागातून करण्याची सुचना केली आहे. केंद्रीय समितीने वन्यजीव राष्ट्रीय बोर्डास मेळघाट प्रकल्पाच्या वन अभयारण्यातील १६०.९४ हेक्टर वनजमीन रेल्वे मार्ग परिवर्तनासाठी देण्याबाबत पुनर्विचार करावा असे म्हटले आहे.
बोर्डाने राज्य शासनाला हा प्रस्ताव पाठवून विचार करावा असे कळविले आहे. रेल्वे मार्गांचा विकास व्हायलाच पाहिजे पण तसे करताना मेळघाटसारख्या ठिकाणी वाघांचे संवर्धन होणे व येथील पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे महत्वाचे आहे, त्यामुळे ब्रॉडगेजसाठी पर्यायी मार्ग निवडावा असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.