‘लाडकी बहीण योजने’मुळे राज्यातील महिला आत्मनिर्भर – आमदार अश्विनी जगताप (Chinchwad Vidhan Sabha 2024)
राज्यातील महायुती सरकारला बळ देण्यासाठी शंकर जगताप यांना मताधिक्याने विजयी करा
आमदार अश्विनी जगताप यांच्या निर्धार सभेला पिंपळे गुरवमधील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि. १५ – ‘लाडकी बहीण योजना’ ही राज्यातील महायुतीच्या सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेद्वारे महिलांना आर्थिक मदत मिळत असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या योजनेंतर्गत मिळणाऱ्या निधीचा मोठा फायदा होत आहे. महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून महायुतीचे सरकार महिला सशक्तीकरणासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन, आमदार अश्विनी जगताप यांनी केले आहे.
(Chinchwad Vidhan Sabha 2024)
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – रिपाइं (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ पिंपळे गुरव येथे महिलांचा भव्य मेळावा संपन्न झाला. यावेळी आमदार अश्विनी जगताप यांनी महिलावर्गाला संबोधित करत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी माजी महापौर शकुंतला धराडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, शशिकांत कदम, माजी नगरसेविका उषा मुंडे, पल्लवी जगताप, शोभा जगताप, रविना सागर आंघोळकर, युवा नेते महेश जगताप यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना आमदार अश्विनी जगताप यांनी ‘उज्ज्वला योजना’चे महत्त्व पटवून दिले. “गरीब महिलांना स्वयंपाकाचा गॅस मिळाल्यामुळे त्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि स्वयंपाकात सुलभता वाढली आहे.तसेच, ‘सुकन्या समृद्धी योजना’द्वारे मुलींच्या शिक्षण व विवाहासाठी आर्थिक मदत होत आहे. महिला बचत गटांना प्रोत्साहन देत महायुती सरकारने महिलांना स्वावलंबनाची प्रेरणा दिली. महिलांच्या आरोग्यासाठी त्यांनी प्रामुख्याने ‘प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना’, ‘मिशन इंद्रधनुष’ या योजना आणून महिलांच्या आरोग्याचे संरक्षण केले.
‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानंतर्गत मुलींसाठी मोफत उच्चशिक्षण देण्यासाठी काम केले आहे. त्याचबरोबर मुलींचा जन्मदर व शिक्षणाचं प्रमाण वाढवणे हे महायुती सरकारचं उद्दिष्ट असून, ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ अंतर्गत महिलांनी स्वतःचं बँक खाते उघडून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा महायुती सरकारचा मूळ उद्देश आहे” असे त्यांनी यावेळी सांगितले.
या मेळाव्याच्या शेवटी आमदार जगताप म्हणाल्या की, “महायुती सरकार आपल्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी भक्कम उभं आहे, आणि चिंचवडमधील बहिणींच्या हितासाठी शंकरभाऊ जगताप कटिबद्ध आहेत.” म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. (Chinchwad Vidhan Sabha 2024)
पिंपळेगुरव मधील लाडक्या बहिणींचा; शंकर जगताप यांना आमदार करण्याचा निर्धार
पिंपळे गुरव परिसरातील तब्बल साडेपाच हजारांहून अधिक महिलांना मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ मिळत आहे. आमदार अश्विनी जगताप आणि शंकर जगताप यांच्या सहकार्यामुळेच या योजनेचा लाभ आम्हा महिलांना मिळत आहे. एवढंच नव्हे तर आमच्या प्रत्येक अडीअडचणीच्या काळात स्व. लक्ष्मण जगताप असतील, अश्विनी जगताप असतील किंवा शंकर जगताप हे नेहमीच धावून येतात.
म्हणूनच या निवडणुकीत आमची भावाप्रमाणे काळजी घेणाऱ्या शंकर जगताप यांनाच आम्ही मोठे मताधिक्य देऊन आमदार करणार असा निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी केला.