Saturday, May 18, 2024
HomeNewsचिंचवडगांव : जेष्ठांची मागणी असूनही गावडे जलतरण तलाव सुरू नाही

चिंचवडगांव : जेष्ठांची मागणी असूनही गावडे जलतरण तलाव सुरू नाही

जनसंवाद सभेत अधिकारी गोड बोलुन प्रशासकीय उत्तरे देतात, पण कामे होत नाहीत – जितेंद्र निखळ

पिंपरी चिंचवड
: चिंचवडगाव येथील गावडे जलतरण तलाव गेले दीड वर्ष बंद आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिक आणि जलतरण पटूंनी सराव कुठे करावा चिंचवडगावातील नागरिकांना पिंपरी येथील भिकू वाघेरे जलतरण तलावात प्रवेश नाकारला जातो, तेथील कर्मचारी उद्धट उत्तरे देऊन, जेष्ठांचा अपमान करतात, असा आरोप हवाई दलातील निवृत्त अधिकारी जितेंद्र निखळ यांनी केला आहे. येथील ब प्रभाग जनसंवाद अधिकारी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, प्रभाग अधिकारी अभिजित हाराळे यांना त्यांनी स्वतंत्र निवेदन दिले.

त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की,कोरोना आधीपासून जानेवारी 2020 पासून केशवनगर येथील तलाव बंद आहे. त्या तलावाची डागडुजी,दुरुस्ती देखभाल करून खुला करण्यात येईल असे वारंवार सांगण्यात येते पणं कामे होत नाही. चिंचवड गाव परिसरातील नागरिकांना जलतरणाची सोय करून द्या यासाठी जनसंवाद सभेमध्ये वारंवार मागणी केली आहे. मात्र अधिकारी गोड बोलतात, निवेदने घेऊन प्रशासकीय उत्तरे देतात, असाही आरोप करण्यात आला आहे.

खडकी डिफेन्स मधील निवृत्त कर्मचारी सलीम सय्यद म्हणाले की, आम्ही वार्षिक शुल्क भरून पासेस घेतल्या आहेत. चिंचवड गावतील तलाव येथील तलाव बंद असल्यामुळे आम्हाला कासारवाडी येथे जाण्यास सांगितले. तेथील तलाव बंद झाल्याने पिंपरी येथील भिकू वाघेरे येथील तलाव सुरू असल्यामुळे तेथे गेलो असता आम्हाला तेथे प्रवेश नाकारला, तेथील कर्मचाऱ्याने अपमानास्पद वागणूक दिली आहे. “पिंपरी गावातील तलाव हा फक्त पिंपरीतील नागरिकांसाठी आहे” असे भाष्य तेथील कर्मचाऱ्यांकडून केले जाते.

तरी आम्हाला प्रशासनाने जोपर्यंत चिंचवड गावातील तलाव सुरू होत नाही तोपर्यंत महापालिकेच्या कोणत्याही सुरू असलेल्या तलावामध्ये सराव करण्याची परवानगी लेखी स्वरूपात द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जलतरण तलावाचे प्रभारी क्रीडा उपायुक्त तथा उपजिल्हाधिकारी विठ्ठल जोशी यांना ही स्वतंत्र निवेदन ईमेल द्वारे दिले आहे.

दिलीप चक्रे, रवींद्र काळे या जेष्ठ निवृत्त नागरिकांनी सांगितले की, जुलै महिन्यात दोनवेळा ब प्रभाग जनसंवाद सभेमध्ये आम्ही मागणी करूनही समस्या निवारण होत नसेल तर आयुक्त राजेश पाटील यांनी तलाव सुरू करण्यासाठी उच्च स्तरावर आदेश द्यावेत.

शिष्टमंडळातील जितेंद्र निखळ, सलीम सय्यद, दिलीप चक्रे, रवींद्र काळे यांनी आयुक्तांना स्वतंत्र निवेदन पाठवले आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय