सांगली : ‘पत्रिका’ या हिंदी वर्तमान पत्रात ‘भाजपा सांसद ने किया विश्व आदिवासी दिवस का विरोध, बताया विदेशी एजेंडा’ या मथळ्याखाली ९ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाली होती. या पार्श्वभूमीवर बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी जागतिक आदिवासी दिनाचा विरोध करणारे भाजपाचे खासदार गजेंद्र सिंह पटेल यांचा संघटनेच्या वतीने निषेध केला आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने (युनो) १९९३ साली पर्यावरण संवर्धन, आदिवासी समाज व संस्कृतीच्या रक्षणार्थ ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले. तेव्हापासून जगभरात विश्व आदिवासी दिवस मोठ्या ऊत्साहात साजरा केला जातो. असे असताना मध्यप्रदेश राज्यातील बडवानी या आदिवासी लोकसभा क्षेत्राचे भाजपाचे खासदार गजेंद्र सिंह पटेल यांनी जागतिक आदिवासी दिनाला विदेशी एजेंडा सांगून देशभरातील आदिवासी समाजाचा अपमान केलेला आहे. त्यानुषंगाने या खासदाराचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी यांनी एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे केली आहे.