Saturday, May 4, 2024
Homeविशेष लेखरविवार विशेषविशेष लेख : महापूर - अतिवृष्टी : नोहाची नौका मिळणार नाही, पेरले...

विशेष लेख : महापूर – अतिवृष्टी : नोहाची नौका मिळणार नाही, पेरले तेच उगवते आहे – क्रांतिकुमार कडुलकर

देशातील आणि महाराष्ट्रातील शहरं बुडण्यामागं केवळ अतिवृष्टी कारणीभूत नाही. कित्येक दशकं सुरू असलेलं गैरशासन व खराब नागरी नियोजन यांमुळं शहरांना पावसाळ्यात पाण्याखाली बुडावं लागतं. मुंबई, पुणे, बंगलोर, कोल्हापूर, सांगली, अहमदाबाद या निवडक शहरे गेल्या दहा वर्षांपासून छातीभर पाण्यात बुडत आहेत. येथे पडणारा पाऊस भीतीदायक आहे. १२ तासांच्या कालावधीत या शहरामध्ये  ३०० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडतो.

चिपळूण, राजापूर, महाड, पोलादपूर, बदलापूर या कोकणपट्टीतील शहरांना पावसाने जलप्रलय दाखवला आहे. हा पाऊस असामान्य आहे. परंतु शहराला या महापुरामुळं गुडघे टेकावे लागले नाहीत, तर शहराचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्यांचा राज्यकर्त्यांचा संभ्रम आणि निष्काळजीपणा त्याला कारणीभूत ठरत आहे. २६ जुलै २००५ रोजी पावसाने मुंबई शहराला जेरीस आणलं होतं, त्या वेळी झालेल्या जीवितहानीमधून व मालमत्तेच्या विध्वंसामधून कोणतेही धडे घेतले गेले नाहीत.

 

२००५ पासून भारतातील अनेक शहरात सरासरीपेक्षा २३ पट पाऊस जास्त पडला. चंदीगड, बंगळूर, अहमदाबाद, मुंबई, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर इ. मोजक्या शहरात पडलेला पाऊस आणि युरोप, चीन, बांगला देश, थायलंड इ. कार्पोरेट विकसित शहरामध्ये पडलेला पाऊस, आणि प्रचंड महापूर यामध्ये समान धोकादायक लक्षणे आहेत.

पावसाने आपत्कालीन व्यवस्थापनाला शहरांनाही गुडघे टेकायला लावले आहे, अब्जावधी रुपये खर्च करून उभा केलेला कार्पोरेट स्मार्ट संस्कृतीचा नकाशा महापूर, ढगफुटीने अतिशय कमी वेळात उध्वस्त केला आहे.

वादळी पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी गटारांची पुरेशी व्यवस्था नसणं, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सहपदरी रस्ते विकास, मेट्रो मार्गिका, ग्रेड सेपरेटर, भुयारी कामे, पेविंग ब्लॉकिंग इ. अनेक मार्गाने शहरात पडणारा पाऊस मातीत जिरत नाही, आणि पाण्याचा लोंढा नद्यांमध्ये जातोय. नद्यांमधील जलपर्णी, गाळ, समुद्राची भरती इ. अनेक कारणांमुळे शहरातील रस्त्यावर पहिल्या मजल्यापर्यंत पाणी येते.

2019 चे महासंकट, ढगफुटी, भयंकर वादळ आणि पुन्हा 2021 मधील तीच पुनरावृत्ती याबद्दल कोणतीही चिकित्सा केली नाही, तर पुढील दहा वर्षात कोकणातील चिपळूण, रत्नागिरी, महाड, राजापूर, संगमेश्वर, दाभोळ, महाड इ. किनार पट्टीतील शहरे कोणत्या अवस्थेतून जातील याचा गंभीर अभ्यास केला पाहिजे.

महाराष्ट्रातील धरणे आणि प्राचीन नद्या गाळाने भरलेल्या आहेत. प्रचंड नफा देणाऱ्या बांधकाम व्यवसायांने शहरात कुठेही घरे देण्याचा सपाटा लावला आहे. निसर्गरम्य आधुनिक घरांच्या जाहिरातीत पश्चिम घाटातील डोंगरराने दिसू लागली. आयुष्यभर पर्यावरणाची वाट लावल्यावर निवृत्ती नंतर  कोकण, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे ग्रामीण तालुक्यात निसर्गातील झोपडी खरेदी करणारी नवी पैसेवाल्यांची जमात नेमकी कोणासाठी ऐश आरामी जगत आहेत. 

ओढे, नाले, नद्यांवर आक्रमण :

प्रत्येक शहरामध्ये जमीनवापराच्या बदलत्या नियमांनी या नैसर्गिक जलशोषकांना नष्ट केलं, आणि या जागांमध्ये भर टाकून बांधकामांना परवानगी देण्यात आली. पुणे, मुंबई, नाशिक, ठाणे, पिंपरी चिंचवड इ. मोठ्या महानगर मधील शेकडो ओढे नाले बिल्डरांनी जेसीबी खाली ठार मारून टाकले आहेत. टोलेजंग इमारतीमधील नवी चंगळवादी जीवन शैली आणि त्यांच्या खण्यापिण्यातून बाहेर पडणारे टनावारी मैला मूत्र नदीनाल्यामध्ये निर्लज्य पणे सोडणारे नीच प्रशासन हे या लोकशाही देशात आहे. राज्य आणि केंद्र सरकारांच्या पाटबंधारे, पर्यावरण, स्थापत्य, वनभूमी मंत्रालयाना कोणी विचारात नाही. कोणत्याही जिल्ह्यात कार्पोरेट उद्योग, नागरी वसाहती उभ्या केल्या जात आहेत. आधी जंगले तोडायची, डोंगर खोदायचे आणि नंतर पुन्हा वसुंधरा बचाव आंदोलने करायची असा इव्हेंट दरवर्षी देशात साजरा केला जात आहे.

 

पैशाच्या माजावर आम्ही वाटेल ते खरेदी करू, असा अहंकार असलेल्या विद्यमान कार्पोरेट समाजाला महापुराने योग्य वेळी भीषण धडा शिकवला आहे. नोव्हेंबर २०१५मध्ये भीषण पूर अनुभवलेल्या चेन्नईत विमानतळ हे पूरमैदानी प्रदेशावर उभं आहे, एक बसस्थानक पूरग्रस्त क्षेत्रात बांधण्यात आलं आहे आणि एका मोठ्या कालव्यावर गतिमान वाहतूक व्यवस्था बांधण्यात येते आहे. बंगळुरूमध्ये शहराला पाणी पुरवणारे व अतिरिक्त पाणी शोषून घेणारे प्रसिद्ध तलाव अतिक्रमणामुळं आता जवळपास नष्ट झाले आहेत. मुंबईमध्ये उच्चभ्रू इमारतींना जागा करून घेण्यासाठी पाणथळ भागांमधील वनस्पती नष्ट करण्यात आल्या आहेत, त्यामुळं असामान्य अतिवृष्टीनंतर वाढलेल्या समुद्रपातळीपासून संरक्षणासाठी कोणताही अडथळा उरणार नाही अशी तजवीज करण्यात आली आहे. त्यामुळं पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची मुंबईतील मिठागरं काढून टाकून त्या ठिकाणी कथित ‘परवडण्याजोगी’ घरं उभारण्याची योजना विचाराधीन आहे. खरं तर पुराचा धोका असलेल्या जमिनीवर वाईट बांधकाम असलेल्या इमारती उभ्या करण्याचा हा प्रकार आहे.

 

महापुरांसारख्या आपत्तीचा सर्वाधिक फटका जसा  सर्वांत गरीब स्तरातील लोकांना बसतो, तसा तो आता नवं श्रीमंत समृद्ध वर्गाला बसत आहे. पैसे असूनही पिण्याचे पाणी पूरग्रस्त शहरात मिळत नाही आणि पाण्याच्या सीलबंद बाटल्या त्यांना पोचवता येत नाहीत.

महावृष्टी, ढगफुटी मुळे आपत्कालीन सरकारी यंत्रणा हतबल होत आहेत, लोक महामार्गावर अडकून उपाशी रहात आहेत. सुटकेचा कोणताही मार्गच उरत नाही.

काय म्हणत आहेत तज्ञ लोक?

अतिवृष्टीसारख्या हवामानातील अनपेक्षित व टोकाच्या बदलांना जागतिक उष्णतावाढ अंशतः जबाबदार आहे, असं विविध अभ्यासांमधून सुचवण्यात आलं आहे. असाच एक अभ्यास बंगळुरूस्थित भारतीय विज्ञान संस्थेच्या जलसंशोधन आंतरविद्याशाखीय केंद्रानं केला आहे. चेन्नई, हैदराबाद व बंगळुरू इथल्या पावसाच्या आकृतिबंधाचा तपास करून या संस्थेनं असा निष्कर्ष काढला आहे की, या शहरांमध्ये पडणाऱ्या पावसात मोठी वाढ होण्यामागील एक घटक हवामान बदल हा असू शकतो. समुद्रकिनारी असलेल्या शहरांना याचा अधिक धोका आहे, कारण जागतिक उष्णतावाढीमुळं समुद्रपातळीमध्येही वाढ होते आहे, नद्यांमध्ये, धरणांमध्ये साचलेला गाळ काढला पाहिजे.

डॉ. सचिन पन्हाळकर आणि शिवाजी विद्यापीठातले अभ्यासक अमोल जरग यांनी गेली काही वर्षं कोल्हापूरच्या पूरस्थितीचा अभ्यास करून त्यामागची काही कारणं समोर आणली आहेत. पुरामागच्या कारणांमध्ये जमिनीचा बदलता वापरही असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये झालेली मोठी वृक्षतोड, शेतजमिन तयार करण्यासाठी झालेली तोड यामुळे मोठ्या प्रमाणात धूप होते. पावसाच्या पाण्यामुळे वाहून आलेला गाळ साचल्यामुळेही नद्यांची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे जेव्हा मुसळधार आणि सतत पाऊस पडतो तेव्हा पावसाचं पाणी कमी वेळात पात्राबाहेर पडतं.”

कोल्हापूरच्या पश्चिमेच्या तालुक्यांमध्ये होणाऱ्या बॉक्साइटच्या खाणकामाचाही गाळाशी संबंध आहे असं कोल्हापूरमधील पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड सांगतात.

“खाणकाम केल्यावर मातीचा जो दहा ते बारा फुटांचा थर बाहेर काढला जातो. तो पुन्हा आत टाकून वृक्षारोपण करावे असा नियम आहे. मात्र त्याचे पालन होत नाही. याच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होतो आणि ही सगळी माती वाहून जाते” असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

 

पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर यांनी पावसाच्या या लहरीपणामागचं कारणही सांगितलं, “पाऊस हा जवळपास तेवढाच पडत आहे. पण तो कोसळण्याचा कालावधी कमी झालाय. म्हणजे पावसाचे तास हे पूर्वी 100 होते. तर ते आता 60-70 वर आलेत पुढं ते 50 पर्यंत जातील. याचा अर्थ म्हणजे आधी जेवढा पाऊस 100 तासांत पडत होता, तेवढाच पाऊस आता 60-70 तासांमध्येच पडतो. त्यामुळं त्याचा वेग आणि प्रमाण जास्त असतं.”

”साधारपणे पावसाचा एक थेंब 3 ते 5 मिलीमीटर व्यासाचा असतो. तो ताशी 30 ते 40 किमी वेगानं आकाशातून जमिनीवर पडतो. पण ढगफुटीदरम्यान किंवा अतिवृष्टीत या थेंबाचा व्यास वाढतो. त्याचा वेगही ताशी 100 किमी होतो. त्यामुळं 300-400 मिलीमीटर पाऊस पडतो, एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या पावसाचा सामन करण्यासाठी मात्र आपल्याकडे पुरेशी यंत्रणाच नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं, असं देऊळगावकर यांनी सांगितलं.”

 

निसर्गा आम्ही तुझा नाश केला

 

हा बदल काही अचानक झाला नसून गेल्या ५० वर्षापासून मानवाने निसर्गाची केलेली हानी ह्याला कारणीभूत आहे. हवामान बदल आणि  नैसर्गिक आपत्ती मुळे शेतीला मोठा फटका बसत आहे, उद्योगांना सुद्धा आर्थिक नुकसान सोसावे लागते आहे. आज ह्यामुळे आपली अर्थव्यवस्था ढासळली. पुढेही संकटे वाढणार आहेत म्हणून आजच युद्ध पातळीवर हवामान बदल थांबविला पाहिजे. गेले दशक हे अत्याधिक हवामान बदलाचे झाले असून युरोप मध्ये पूर, ऑस्ट्रेलिया, अमाझोन मध्ये आगी, थंडीच्या उष्णतेच्या लाटा वाढू लागल्या आहेत. २०२० हे वर्ष महामारी सोबतच गेल्या १०० वर्षातील तीव्र हवामान बदलाचे वर्ष ठरले. जगभर उष्ण लहरी, जंगलांना आगी, लांबलेला मान्सून, नोव्हेंबर सुरवातीची थंड लहर आणि दर आठवड्यात बदलणारे हवामान असे निरीक्षण आहे.

भारतातील १४८ दशलक्ष नागरिक हे अत्याधिक प्रदूषण, तापमान आणि हवामान बदलाच्या हॉट स्पॉट क्षेत्रात राहतात. त्याचसोबत ४४१ दशलक्ष लोक साधारण हॉट-स्पॉट क्षेत्रात राहतात. महाराष्ट्रातील विदर्भाचा ह्या होत-स्पॉट मध्ये समावेश होतो.

■ विषाणूजन्य आजार वाढत आहेत

हवामान बदलामुळे रोगाणु आणि विषाणू वाढू लागले आहेत. 84 लक्ष योनीच्या या जगात ज्ञात 20 लाख उपयुक्त आणि अनुपयुक्त विषाणू आहेत. निसर्गाने त्यांना राहण्यासाठी महाप्रचंड जंगले, डोंगरावरील वनराई, महासागरातील अदृश्य ठिकाणे, पशु पक्षांची निवासस्थाने, बर्फाळ आणि वाळवंटी प्रदेश राखून ठेवले होते. भारतातील पश्चिम घाट, दंडकारण्ये, हिमालयीन व्यवस्था, पर्वतरांगा येथे विषाणू आणि अमानवी जीवांचे जीवशास्त्र होते. आता नव्या कार्पोरेट समाजाने तेथे आक्रमण केले आहे.

सध्या जगात दरवर्षी नवनवीन विषाणू स्वतः मध्ये बदल करून मानवावर आक्रमण करीत आहेत. कोरोना विषाणू हा त्याचाच एक परिपाक असल्याचे संशोधनाने सिद्ध झाले आहे. सर्वाना आनंद देणारा पाऊस आता कुठेच पडत नाही. अफाट लोकसंख्येच्या मानवाला तारण्यासाठी नोहाची नौका मिळणार नाही, श्रीकृष्णाची द्वारका, मोहेंजोदडो सारखी नगरे आणि सरस्वती नदी का लुप्त झाली, हे आता वेगळे सांगायची गरज नाही.

आपल्याच दुष्कर्मामुळे निसर्ग आपला सखासोबती आता राहिला नसून तो आता आपले विक्राळ रूप धारण करीत असून आपला नाश करू पहात आहे. आजच सावध होऊन आपण निसर्ग संरक्षणाचे उपाय केले नाही तर भविष्यात तिसरे महायुद्ध निसर्ग सुरू करणार आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

– पुणे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय