अकोले : विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सांदण आदिवासी लोकचळवळ, ऑल इंडिया आदिवासी एम्पलॉइज फेडरेशन, आदिवासी शिक्षक संघटना अकोले आणि आदिवासी अभ्यास संशोधन केंद्र, राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी संस्कृती भवन अकोले येथे पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी वाहरु सोनवणे यांचे ‘आदिवासी संस्कृती आणि चळवळ’ व ‘रोडाली’ आणि संतोष दगडू मुठे यांचे ‘सह्याद्रीतील आदिवासी कोळी महादेव जमाती लगीन संस्कृती’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार डॉ. किरण लहामटे, शुभहस्ते रानकवी तुकाराम धांडे व शेतकरी नेते कॉ. डॉ. अजित नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमासाठी महिला प्रतिनिधी मीनाक्षी शेंगाळ, आदिबीज मशरुमचे युवा उद्योजक महेश धिंदळे, दिव्यांग कर्मचारी संघटनेचे केशव भांगरे आदिवासी बोलीचे भांडार म्हणून ओळखले जाणारे तुळशीराम बांबळे तसेच तालुक्यातील अनेक आदिवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
आदिवासी विचारवंत प्रा. नितीन तळपाडे यांनी आदिवासी संस्कृती विषयी मार्गदर्शन केले. सह्याद्रीतील आदिवासी कोळी महादेव जमाती या पुस्तकाची संकल्पना सुचविणारे धनंजय पिचड यांनी पुस्तकाविषयी सांगितले.
यावेळी विद्रोही आदिवासी चळवळीचे स्वप्निल धांडे, सांदण आदिवासी लोकचळवळीचे अध्यक्ष अरविंद सगभोर, सचिव किरण बांडे, आदिवासी शिक्षक संघटनेचे प्रल्हाद कोंडार, सुनील मेचकर, दत्तात्रय लांघी यांनी मनोगत व्यक्त केले व आदिवासी समाजाच्या वैचारिक जागृती साठी अशा प्रकारचे साहित्य निर्माण होण्याची गरज व महत्त्व सांगितले. या वेळी आदिवासी साहित्याचे प्रदर्शन भरवत हे साहित्य आदिवासी वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले.