Monday, May 20, 2024
Homeराजकारणस्वतःचा बळी देईन पण चळवळ वाचवेन :- राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत...

स्वतःचा बळी देईन पण चळवळ वाचवेन :- राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नाराजी नाट्य सुरू

कोल्हापूर :- (प्रतिनिधी)

          स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची ऑफर स्वीकारल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नाराजी नाट्य सुरू झाले आहे. एक वेळ स्वतःचा बळी देईन, पण चळवळ वाचवेन, अशी राजू शेट्टी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. रक्त सांडून उभी केलेली संघटना फोडण्याचा कुणाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, अस सांगत कुणा एका व्यक्तीमुळे संघटना संपवी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

        राज्यपाल कोट्यातून राजू शेट्टी यांना आमदारकी देण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घोषणा केली होती. यानंतर शेट्टी यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधूनच टीका व्हायला सुरुवात झाली आहे. पक्षातीलच खंदे कार्यकर्ते शेट्टींच्या निर्णयावर नाराज झाल्याचे पाहायला मिळत आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंधर पाटील आणि शिरोळ विधानसभा निवडणूक लढवलेले सावकार मादनाईक हे दोघेही शेट्टी यांच्या निर्णयावर नाराज झाले. वर्षानुवर्ष संघटनेत काम केलेल्या कार्यकर्त्याला संधी द्यायला हवी होती, त्यांनी म्हटले आहे. याबाबत राजू शेट्टी यांनी हे फक्त पेल्यातील वादळ आहे. ते लवकरच मिटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

       शेट्टी म्हणाले, मी सकाळीच फेसबुकद्वारे माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये मी स्पष्टपणे नमूद केले आहे. कार्यकर्त्यांनीच निर्णय घेऊन माझे नाव पुढे केले होते आणि हाच निरोप घेऊन मी शरद पवार यांना भेटलो. त्यामुळे याबाबत आणखी काहीही बोलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आता संघटनेतील कार्यकर्ते शेट्टींच्या म्हणण्यानुसार शांत होतात की ते संघटनेला सोडचिठ्ठी देतात? हे आता येणाऱ्या काळात पाहावे लागणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय