Friday, November 22, 2024
Homeकृषीकर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांना बँकांनी नवीन पीककर्ज उपलब्ध करू द्यावे, १ ऑक्टोबर,२०१९...

कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांना बँकांनी नवीन पीककर्ज उपलब्ध करू द्यावे, १ ऑक्टोबर,२०१९ नंतरचे व्याज आकारणी करू नये–जिल्हाधिकारी राहुल रेखावार

(बीड/प्रतिनिधी):-  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे  ०१ ऑक्टोबर, २०१९ नंतरचे  बँकांनी आकारलेले व्याज रह करून ते संबंधित शेतक-यांचे खात्यावरून कमी करावे व कर्जमाफी मिळालेल्या शेतक-यांचे कर्ज खाते निरंक करून त्यांना नव्याने खरीप पीककर्ज वाटप करावे,असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

       महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे यादीमध्ये नाव असलेल्या व आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतक-यांच्या खात्यावर काही बँकांकडून दि.०१ ऑक्टोबर, २०१९ नंतरचे व्याजाची आकारणी करण्यात आलेली आहे. सदरची रक्कम शेतक-यांचे खात्यावर थकीत दिसत आहे व त्यामुळे अशा

शेतक-यांना चालू वर्षी नवीन पीककर्ज मिळण्यास अडचणी येत आहेत.

      महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत दि.१.४.२०१५ ते दि.३१.३.२०१९ या कालावधीत घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाची दि.३०.९.२०१९ रोजी थकीत असलेली व परतफेड न झालेली रक्कम रू.२.०० लक्ष पर्यंत कर्जमुक्तीस पात्र धरण्यात आलेली आहे.दि.३०.९.२०१९ पर्यंत अशा पीक कर्जावरील व्याजाची जबाबदारी शासनाने स्विकारली आहे.

     तथापि, शेतक-यांच्या कर्जखात्यामध्ये प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम वर्ग करण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे सदर योजने अंतर्गत सर्व शेतक-यांची खाती निरंक होऊन त्यांना नव्याने शेतीकर्ज उपलब्ध होण्याचे दृष्टीने व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांनी त्यांच्या स्तरावर योजने अंतर्गत लाभार्थ्यांच्या कर्जखात्यावर दि.०१ ऑक्टोबर, २०१९ पासून योजने अंतर्गत प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी न करणेबाबत राज्य स्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे.

       याबाबत दि.१७.१.२०२० च्या सहकार,पणन व वस्त्रोदयोग विभागाच्या शासन निर्णयानुसार, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत योजनेत पात्र असलेल्या शेतक-यांच्या अल्प मुदत पीक कर्ज तसेच अल्प मुदत पीक कर्जाचे पुनर्गठन / फेरपुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रूपांतर केलेल्या कर्जखात्यावर दि.०१ ऑक्टोबर, २०१९ पासून योजने अंतर्गत प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषांनुसार पात्र लाभार्थ्यांच्या कर्जखात्यामध्ये थकीत रकमेवर सर्व राष्ट्रीयकृत बँका,ग्रामीण बैंक, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था यांनी व्याजाची आकारणी करू, नये असे कळविण्यात आलेले आहे.

      शासन निर्णयानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक, राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व खाजगी बँकांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पात्र लाभार्थीच्या थकीत रकमेवर दि.०१ ऑक्टोबर, २०१९ पासून योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत व्याजाची आकारणी करू नये, अशा सूचना सर्व राष्ट्रीयकृत,ग्रामीण,खाजगी व जिल्हा मध्यवती सहकारी बैंकेस जिल्हाधिकारी, बीड यांनी यापूर्वी दिल्या आहेत,  असे शिवाजी बडे,जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांनी कळविले आहे.

      तसेच, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेचा लाभ मिळालेल्या शेतक-यांना नवीन पीककर्ज वाटप न करण्यास याशिवाय इतर काही कारणे असतील व बँका नवीन पीककर्ज वाटप करू शकत नसतील तर अशा परिस्थितीत संबंधित बँकांनी जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,बीड यांचेकडे याबाबत मार्गदर्शन मागवावे,असे जिल्हाधिकारी,बीड यांनीसंबंधित बँकांना आदेशीत केले आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय