आज ६ जून रशियन भाषा दिन. रशियन कवी अलेक्सांद्र पुष्किनची जयंती. रशियात व इतरत्र रशियन भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. १९ व्या शतकातील पहिल्या चार दशकांमध्ये ज्याने काव्य निर्मिती केली, त्या पुष्किनला आजही रशियाचा सर्वोत्तम कवी मानला जातो. त्याने असे काय केलं की त्याचा जन्मदिन हा थेट रशियन भाषा दिन म्हणून साजरा केला जातो ?
पुष्किनने रशियन साहित्यिक भाषेचा आणि आधुनिक रशियन वांग्मयाचा पाया घातला. ज्या भाषेत जगप्रसिद्ध लेखकांनी स्वतःची साहित्यनिर्मिती केली त्या भाषेला आकार देण्याचं, तिला घडवण्याचं काम पुष्किनने खर्या अर्थाने केले. म्हणूनच त्याला रशियन साहित्यिक भाषेचा जनक म्हणून गौरविले जाते. काळ कोणताही असो – झार कालीन रशिया, सोवियत रशिया किंवा आजचा भांडवली व्यवस्थेतील आधुनिक रशिया- पुष्किन आणि त्याचं काव्य हेे रशियन समाजमनात खोलवर पसरून राहिलं आहे, नाही – पुष्किन हे रशियाचं चैतन्य आहे! कदाचित असा एकही रशियन सापडणार नाही की ज्याला पुष्किनच्या कुठल्यातरी काव्यपंक्ती तोंडपाठ नसतील. त्यानेे काव्यात लिहिलेल्या फेरीटेल्सवर तर अख्ख्या रशियन पिढ्यांचं बालपणातील शिक्षण झालं आहे . बऱ्याच रशियनना त्यााा संपूर्ण तोंडपाठ असतात. लोकप्रियतेच्या बाबतीत बोलायचं झालं तर शेक्सपियर इंग्लंडमध्ये् जितका जनमानसात रुजला त्याच्या कित्येक पटीन पुष्किन चे काव्यविश्व रशियात जनमानसात रुजले आहे.
कोणत्याही दुसऱ्या देशात तिथल्या जनतेने स्वतःच्या कवीवर जितके प्रेम केले त्यापेक्षा अधिक रशियामध्येे पुष्किनला तेथील जनतेच प्रेम लाभले आहे. पुष्किनचे ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य झाले आज त्या सर्व जागांचे स्मारक -म्युझियम मध्ये रूपांतर झाले आहे. कित्येक रस्त्यांना, वास्तूंना, वस्तुसंग्रहालय, शैक्षणिक संस्थांना, साहित्यिक पुरस्कारांना पुष्किनचे नाव बहाल करण्यात आले आहे. त्सारस्कये सेलो या गावाचे नामकरण पुष्किन असे करण्यात आले; कारण काय तर त्या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले होते.
‘पुष्किन आमच्या कल्पनाशक्तीचा केंद्रबिंदू आहेे. तो आमच्या जनतेचा आत्मा आहे, आमच्या मानसिकतेचा; नव्हे तर आमच्या जीवनाचाच एक अविभाज्य भाग आहे ! याप्रसंगी त्याचे स्मरण करण्याची तशी काही गरज नाही, कारण तो आमच्या सोबत एक जिवंत माणूस म्हणून अजूनही जगत आहे. ‘१९६२ साली पुष्किन च्या १२५ व्या मृत्युतिथि प्रसंगी सोवियत कवी व संपादक अलेक्सांद्र त्वारदोव्सकीने काढलेले हे उद्गार आजही समर्पक आहेत. तर त्याच्याही शंभर वर्ष अगोदर १८५९ मध्ये दुसरा एक तत्कालीन लेखक ऐपोलोन ग्रिगोरीएव याने मोजक्या शब्दात पुष्किन रशिया साठी काय आहे याचं वर्णन केलं होतं – पुष्किन – नाशे फ्स्यो ! – पुष्किन आमचं सर्वकाही आहे. आता गंमत अशी आहे की रशियामध्ये एक कल्ट असलेला पुष्किन व त्याचे साहित्य हे रशिया बाहेर इतकं वाचलं- चर्चिले जात नाही. इंग्रजी साहित्यात ज्या ज्या वेळी त्याचा संदर्भ येतो तो एक रोमँटिक रशियन कवी इतकाच काय तो! पण पुष्किनची अशी ओळख ही फारच तोकडी आहे. त्याने रशियन साहित्याचे काही अभूतपूर्व केलं त्याचं मूल्यमापन ह्याने होत नाही. रशिया बाहेरील सर्वसामान्य वाचकाला रशियाची ओळख आहे ती मुळातच १९ व्या शतकातील महान रशियन साहित्यिकांनी निर्माण केलेल्या साहित्यकृतीतून – गोगोल, टॉलस्टॉय, दस्तयेवस्की, चेखव, तुर्गनेव्ह, गोर्की. परंतु पुष्किनचं नाव येथे सहसा घेतलं जात नाही. खऱ्या अर्थाने पुश्किन पासूनच या साहित्यिक परंपरेची खरी सुरुवात होते. रशियातील ही साहित्य परंपरा-जी युरोपियन साहित्य परंपरेपेक्षा थोडीशी वेगळी आहे – ते समजून घेतलं तर पुष्किन रशियामध्ये इतका लोकप्रिय का झाला हे कळेल.
रशियामध्ये साहित्य हे केवळ साहित्य बनून राहत नाही. ग्रंथालयातील पुस्तकातून बाहेर पडून हे साहित्य राजकीय क्षेत्रात उडी मारतं. रशियाच्या एकाधिकार राज्यव्यवस्थेत नागरी स्वातंत्र्य आणि राज्य व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी पोलिटिकल स्पेस ही कधीच अस्तित्वात नव्हती. त्याची जागा रशियन साहित्यकारांच्या साहित्यकृतींनी भरून काढली. त्यामुळेच रशियामध्ये लेखक किंवा कवी हा केवळ साहित्यिक राहत नाही (आणि रशियन वाचक वर्गाने देखील त्याच्याकडे कधीही केवळ साहित्यिक म्हणून पाहिले नाही) तर तो एक प्रेषित- प्रोफेट बनतो, क्रांतिकारी विचारवंत बनतो. त्याच्या शब्दांचे मूल्य हे केवळ साहित्यिक न राहता साहित्याच्या पल्याड जाऊन जनमानसात तो एक क्रांतिकारी शब्द ठरतो; समाजात सामाजिक प्रश्नांचं मंथन घडवून आणणार सर्वात मोठं साधन ठरतं. म्हणूनच सोवियत काळातील बंडखोर लेखक सोल्झेनित्सन म्हणाले होते की ‘इथे रशियामध्ये एखादा महान लेखक म्हणजे प्रतिसरकारच होय.’ त्याच्या शब्दांना इथे राजकीय व्यवस्थेच्या जुलमा विरुद्ध लढण्यासाठीच्या शस्त्राचं वलय प्राप्त होतं. म्हणूनच टॉलस्टॉय फक्त लेखक राहत नाही किंवा पुश्किन केवळ कवी राहत नाही. म्हणूनच त्यांच्या शब्दांना दाबण्यासाठी सेन्सॉरशिपचा शब्दांवरील पहारा सुरू होतो.
एखाद्या खुनी मनुष्याला शिक्षा म्हणून दूरवरच्या सायबेरियात सक्त मजुरीची शिक्षा होते तर, दुसऱ्या बाजूला केवळ बंदी घातलेल्या कविता वाचल्या म्हणून एखाद्या माणसाला मृत्युदंड दिला जातो. कारण कुठल्याही दुसऱ्या देशापेक्षा रशियामध्ये लेखक आणि कवींचे समाजमूल्य हे अधिक राहिले आहे. त्यामुळेच शब्दांवरचा पहारा तोडणार्या साहित्यिकांचा छळ देखील रशियामध्ये इतर देशांपेक्षा अधिक झालेला दिसून येतो. गोर्की, टॉलस्टॉयपासून ते आख्मातोवा, सोल्झेनित्सन ही काही ठळक नावे. पण सुरुवात होते ती पुष्किन पासून वर म्हटल्याप्रमाणे रशियामध्ये साहित्य हे राजकारणासाठी (किंवा त्याच्या अभावासाठी) असलेलं एक रूपक आहे. (In Russia literature is metaphor for politics) हे रशियन साहित्याचं सुरुवातीपासून ते आतापर्यंत एक प्रमुख वैशिष्ट्य राहिलेलं आहे.
राजसत्तेच्या जुलूमाविरुद्ध जो विरोध प्रत्यक्ष समाजजीवनात करू शकत नव्हते ते लेखक -कवींनी त्यांच्या साहित्यातून केला. कधी सरळ सरळ उघडपणे, तर बऱ्याचदा बिटवीन द लाईन्स. हे बिटवीन द लाईन्स आपणाला युरोपातील इतर कुठल्याही साहित्यापेक्षा रशियन साहित्यात अधिक प्रमाणात सापडते. हे सर्व सांगण्याचे कारण एकच अशा तर्हेच्या वांग्मय परंपरेची सुरुवात खऱ्या अर्थाने जर कोणी केली तर ती पुष्किनने. त्याने त्याच्या बऱ्याच काव्यातून मानवी स्वातंत्र्यावर राज्य सत्तेकडून होणाऱ्या जुलुमावर हल्ला चढवला.
१८२५ ला ज्या डिसेंब्रिस्ट लष्करी अधिकाऱ्यांनी झारविरुद्ध उठाव करण्याचा असफल प्रयत्न केला होता त्यांच्याकडे पुष्किनच्या (अर्थातच हस्तलिखित ) कविता सापडल्या – ज्यामध्ये पुष्किन मानवी स्वातंत्र्याचे गीत गातो. त्याने सत्तेविरुद्ध विरुद्ध लिहिलेल्या ईपीग्राम छाप छोट्या कविता तर सेंट पीटर्सबर्ग मधील प्रत्येक शिक्षित व्यक्तीला तोंडपाठ असायच्या. त्याच्या ओड टू लिबर्टी या कवितेमुळे तर झार इतका संतापला की त्याला शहरातून हद्दपार करण्यात आले- रशियाच्या दक्षिण भागात. या कवितेत तर त्याने हुकुमशहांचा उघड समाचार घेतला होता (गमतीचा भाग हा की ही कविता नेपोलियनला उद्देशून होती, झारला नव्हे) तेव्हापासून पुष्किनच्या मागे गुप्त पोलिसांचा ससेमिरा लागला तो त्याच्या मृत्यूपर्यंत कायम राहिला. ज्यावेळी त्याला १८२६ मध्ये पीटर्सबर्ग मध्ये पुन्हा परतण्याची परवानगी मिळाली त्यावेळी नवा झार- निकोलस पहिला – याने त्याला बोलावून घेतले व सरळ सांगितले की तू आमचा सर्वात महान कवी आहेस त्यामुळे तुझ्या कवितेचे सेन्सॉरींग आता मी स्वतः करेन. व झारने त्याच्या कवितांचे सेंसोर्शिप स्वतःकडे घेतली. एका कवीच्या कवितांची भीती युरोपातील एक मोठा हुकुमशहा अशा पद्धतीने घेतो. इतकं असूनही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पुष्किन हा काही क्रांतिकारक – म्हणजेच कुठल्यातरी क्रांतीच्या उद्देशाला वाहून घेतलेला कवी – नव्हता .स्वतःच्या काव्यातून मनुष्याचा सर्वांगीण स्वातंत्र्याचे गोडवे गाणारा तो एक दूत होता. तो रशियन समाजमनात पसरला, झिरपला व टिकून राहिला तो त्याने लोकभाषेत निर्माण केलेल्या त्याच्या काव्यामुळे.
पुष्किनने रशियन भाषेसाठी काय केले हे समजून घेण्यासाठी ज्यावेळी तो रशियाच्या राष्ट्रीय पटलावर आला त्यावेळी सामाजिक – सांस्कृतिक परिस्थिती काय होती हे अगोदर समजून घेणे फार गरजेचे आहे. रशिया हा देश अठराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सांस्कृतिक दृष्ट्या एशियाटिक होता. युरोपात जेव्हा सांस्कृतिक रेनेसा चालू होता तेव्हा रशिया मंगोलांच्या दावणीला तीनशे वर्षे बांधला गेला होता. त्यामुळे त्या युरोपियन रेनेसान्स चे लोण रशियात पोहोचले नाहीत. त्यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या रशिया ( युरोप चा भाग असून देखील) युरोप पेक्षा वेगळा पडला. अठराव्या शतकाच्या सुरुवातीस ही कसर भरून काढण्याचा प्रयत्न केला तो पीटर द ग्रेट या रशियन झारने. त्याने रशियाच्या जुन्या संस्कृतीला नकार देऊन सेंट पीटर्स या शहराची युरोपियन धर्तीवर निर्मिती केली. हे फक्त शहर बांधणी नव्हती तर स्वतःच्या देशाचे युरोपियन तत्वांवर उभारणी करण्याचा एक अभूतपूर्व प्रयत्न होता. हे शहर रशियाच्या युरोपियन संस्कृतीचे केंद्र बनले. त्याने रशिया सोडून सांस्कृतिकदृष्ट्या युरोप स्वीकारला – समाजजीवन, चालीरीती, खानपान, दरबारशैली, पोशाख, वास्तुशास्त्र, साहित्य -कला, शिक्षण अशा समाजाच्या सर्वच अंगात युरोपीयन (विशेषता फ्रेंच) संस्कृतीचा शिरकाव झाला. राजदरबार आणि उच्चकुलीन घरातील भाषादेखील फ्रेंच बनली. (ज्यांनी टॉलस्टॉयची वॉर अँड पीस वाचली असेल त्यांच्या हे चांगलं लक्षात येईल) स्वतःच्या रशियन भाषेचे महत्त्व अगदीच कमी झालं होतं. संपूर्ण १८ वे शतक व १९ व्या शतकाचे पहिले दशक हे असं युरोपियन सांस्कृतिक छत्राखाली रशिया वाढला. पण हे वरकरणी होतं. फ्रेंचांचा दिखाऊ आणि तकलादू सांस्कृतिक नकलेमुळे पूर्ण शतकभर दाबला गेलेला रशियन स्वच्छंदीपणा पुष्किनच्या रुपाने उफाळून येणार होता.
त्याकाळातील साहित्याबाबत बोलायचं झालं तर रशियामध्ये त्याचं स्वतः रशियन राष्ट्रीय(देशीय)साहित्य असा काही प्रकार अस्तित्वात नव्हता. जी काही नाटके किंवा कविता लिहिल्या जायच्या त्या राजदरबारातील अपॉईंट लेखकांकडून – जो सरकार च्या कुठलातरी डिपार्टमेंट मध्ये नोकरीत असायचा. यातील बहुतांशी नाटके आणि ओपेरा ही सरळ सरळ युरोपियन (त्यादेखील फ्रेंच) नाटकांची स्थलकालनाम बदलून केलेली भाषांतरे असायची. अठराव्या शतकातील शेवटच्या सत्तर वर्षात जवळजवळ पाचशे साहित्यकृती रशियात प्रकाशित झाल्या, त्यातील केवळ सातच रशियन होत्या !.पेशाने लेखक किंवा कवी असला प्रकार नव्हता, कारण एखाद्या लिहित्या माणसाला केवळ लेखक म्हणून पेशा स्वीकारून जगणं जवळजवळ अशक्य होतं.
१८०२ मध्ये कारामजीनने (पहिला प्रतिभावंत आधुनिक रशियन इतिहासकार) रशियाच्या इतिहासातील सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत लेखकांच्या नावाची एण्थोलोजी तयार केली. त्यात खच्चून वीस नावे निघालेत. यापार्श्वभूमीवर पुष्किनने रशियाच्या साहित्य विश्वात प्रवेश केला त्यावेळी रशियाचे स्वतःचे राष्ट्रीय देशी साहित्य असं काही विशेष नव्हतं. त्याला कारणे देखील होती .युरोपात अस्तित्वात असणाऱ्या साहित्यिक सोसायट्या, वर्तमानपत्रे आणि मॅगझिन्स यांचा अभाव हे त्याचे एक प्रमुख कारण. प्रकाशनावर चर्चचे प्राबल्य आणि नियंत्रण होते. वाचक वर्ग तर अतिशय मर्यादित होता- जेमतेम उच्चवर्गातील शिक्षित स्त्रिया! (ज्या मुख्यता फ्रेंच रोमँटिक कादंबऱ्या वाचायच्या.) पण सर्वात मोठा अडथळा होता तो म्हणजे रशियन वांग्मयीन भाषेचे अविकसित रूप. त्यावेळेच्या फ्रान्समध्ये किंवा इंग्लंडमध्ये लोक जसे बोलतात तसेच त्या भाषेत लेखक आपले लिखाण करीत असत. पण रशियामध्ये बोलीभाषा आणि साहित्यिक भाषा यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक होता.
अठराव्या शतकातील लिखित रशियन भाषा ही चर्च स्लोवेनिक मिश्रित एक बोजड- पुस्तकी भाषा होती, ज्याचे अजून व्याकरणचे आणि स्पेलिंग चे कुठलेही नियम ठरवलेले नव्हते. उच्च वर्तुळात बोलल्या जाणाऱ्या फ्रेंच मिश्रित रशियन पेक्षाही त्याचे स्वरूप खूप वेगळे होते, तर सर्वसामान्य रशियन पिजंट समाजात बोलल्या जाणाऱ्या रशियन बोलीभाषेशी तर त्याचा काडीमात्र संबंध नव्हता. १८१२ च्या नेपोलियन युद्धानंतर रशियन बुद्धिजीवी वर्ग युरोपियन ( फ्रेन्च) संस्कृतीच्या प्रभावातून हळूहळू मुक्त होऊन स्वतःच्या संस्कृतिक -राष्ट्रीय अस्मितेच्या शोधात नव्या तत्वांवर राष्ट्रबांधणीची भाषा करू लागला होता. यामध्ये साहित्यिकांचा देखील समावेश होता. त्यांच्यासमोर सर्वात मोठा आव्हान होते – समाजाच्या बोलीभाषेत मुळे असणारी, त्यांच्याशी नातं सांगणारी साहित्यिक भाषा तयार करणे. पुष्किन आणि त्याच्या समकालीन कवींचं हेच ध्येय होतं -लोक जसे बोलतात तसेच त्यांच्या भाषेत लिहिणे! एक कवी म्हणून पुष्किनला या जबाबदारीचे भान होते.
रशियातील सामान्य जनता आणि युरोपियन सांस्कृतिक रशिया यांच्यामधील दरी भरून काढण्यासाठी लागणारी एक कॉमन भाषेची उनीव पुष्किनने स्वतःच्या काव्यातून भरून काढायला सुरुवात केली. या दोन रशिया़ंमधील दुवा सर्वप्रथम त्याने जोडला. त्याचं काव्य एकाच वेळी उच्चकुलीन- उच्चशिक्षित सेंट पीटर्सबर्ग मधील रहिवाशी आणि सामान्य शिक्षित खेडूत यांच्याशी देखील बोलू लागलं. हीच पुष्किन ची सर्वात महत्त्वाची कामगिरी होती – स्वतःच्या काव्यातून एक राष्ट्रभाषा विकसित करणे की जी समाजातील सर्व घटकांशी नाते सांगू शकेल. या प्रक्रियेमध्ये त्याला बऱ्याच नवीन रशियन शब्दांची पैदास करावी लागली. पुष्किन अजून एका अंगाने रशियन साहित्यात अभूतपूर्व होतााा – त्या काळात ज्या लेखकांनी साहित्य हे पेशा म्हणून, उपजीविकेचे साधन म्हणून स्वीकारला त्यापैकी तो एक होता (अर्थातच ते पुरेसं नव्हतं आणि संपूर्ण आयुष्य पुष्किन कर्जबाजारी राहिला – जे कर्ज त्याच्या मृत्यूनंतर झारने फेडले).
पुष्किनने त्याच्या अवघ्या ३७ वर्षांच्या आयुष्यात प्रचंड साहित्य निर्मिती केली. कविता, कथा, लघु कादंबरीका, नाटक आणि काव्यातील कादंबरी इत्यादी प्रकाराचे लिखाण करत त्याने आधुनिक रशियन साहित्याचा पाया घातला. त्याच्या काळाला रशियन कवितेचे सुवर्णयुग म्हणून संबोधले गेले. त्याने प्रथमच रशियातील लोककथांचा ,लोकगीतांचां समावेश स्वतःच्या साहित्यात करून त्यांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या लोककथा, लोककाव्य, लोकगीत गोळा करण्यासाठी तो गावोगावी फिरला, लोकांच्यात मिसळला. हे रशियन साहित्यविश्वात प्रथमच घडत होते. १८३७ साली जेव्हा त्याचा मृत्यू झाला त्यावेळी रशियन साहित्यात लोककथांचा वापर करणे ही परंपरा बनून गेली होती- जी पुढील पिढीतील लेखकांनी वाढवली. त्याच्या साहित्याचा पुढील लेखकांवर खुप प्रभाव पडला. ब्रांझ होर्समन या काव्यातील त्याने निर्मिलेला कारकून इवगेनी हा नंतर रशियन साहित्यातील लिटल मॅनचा जनक बनला, तर इवगेनी आनेगीन या काव्यातील ततयाना पात्र हे टॉलस्टॉय आणि दस्तयेवस्की सारख्या लेखकांसाठी स्त्री व्यक्तीरेखनाचे मॉडेल बनले. समीक्षक बेलेन्स्की याने या काव्याला रशियन समाजजीवनाचा विश्वकोश असे संबोधले होते.
पुष्किनच्या साहित्याचा रशियन संगीतावर देखील प्रचंड प्रभाव पडला. पुष्किनच्या काव्यात्मक फेरी टेल्स आणि नाटकांवर पुढे रशियन संगीतकारांनी (विशेषता मुसोर्गस्की, चायकोव्स्की) त्यांचे संगीत योजले. असा हा पुष्किन रशियाच्या साहित्य आणि कलेमध्ये पुर्ण व्यापून राहिला आहे. शेवटी एक निरीक्षण – पुष्किनच्या कविता ज्यावेळी भाषांतरीत होतात (विशेषता इंग्रजीत) तेव्हा त्या तितक्याच ताकदीच्या वाटत नाहीत. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पुष्किनच्या काव्याचे सौंदर्यच मुळात त्याने लिहिलेल्या – निर्मिलेल्या रशियन भाषेत आहे. त्याची लोकप्रियता अजूनही कायम आहे, त्याच्या कविता आजही तितक्याच उत्साहाने वाचल्या जातात, कारण त्याच्या काव्यातील जीवनावरचे प्रेम रशियन समाजमनात जगण्याची इच्छा निर्माण करतं. पुष्किनने रशियन लोकांना त्यांचं रशियनत्व दिलं; त्यामुळेच पुष्किन – रशियाचं सळसळतं चैतन्य! तो कधी पर्यंत राहील त्याचं उत्तर त्याच्याच कवितांच्या ओळीत मिळते..
As long as there is one poet here
My name will ring through Russia…
…. For having taught my lyre to sing
Of noble hearts and freedom in a cruel age..
इरशाद बोरकर, कोल्हापूर
संशोधक विद्यार्थी