आंबेगाव,ता.२३(प्रतिनिधी) : तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(एस.एफ.आय.) आंबेगाव तालुका समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केलेली आहे.या संदर्भात दि.२२ मे रोजी आयोगाकडे संघटनेने ईमेलद्वारे निवेदन सादर केले.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून, विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला, मात्र तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढील काळात घेण्यात येतील असे म्हटले आहे. तृतीय वर्ष हे विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असते, परंतु सध्याची परिस्थिती पाहता UGC च्या मार्गदर्शक तत्वानुसार सुद्धा तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे फार कठीण आहे. कोरोनाच्या भीतीने शहरात शिकणाऱ्या राज्यातील आणि परराज्यातील विद्यार्थ्यांनी घर गाठले आहे. कोरोनाची भीती आणि त्यात परीक्षेचा मानसिक ताण विद्यार्थ्यांवर येतो आहे, त्याची पालकांना चिंता होत आहे. तसेच जून पासून पाऊस पडण्यास सुरुवात होत असते. लॉकडाऊन आणि वाहतूक व्यवस्था बंद असल्याने, परीक्षा काळात सामाजिक अंतर राखणे, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा अशा विविध कारणास्तव परीक्षेच्या काळात परराज्यातील आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होऊ शकतात. त्यामुळे प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसारखे तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षेसंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन त्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(एस.एफ.आय.) आंबेगाव तालुका समितीने विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केलेली आहे.