प्रतिनिधी :- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्यूरोने १६ जून रोजी अखिल भारतीय निषेध दिन सर्वत्र पाळण्ययाची हाक दिली आहे.
२ जून २०२० रोजी झालेल्या पक्षाच्या पॉलिटब्युरोच्या ऑनलाइन बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
देशात आधीच बेरोजगारीने विक्राळ रूप धारण केले होते; त्यात लॉकडाऊनने १५ कोटी कामगारांना बेरोजगार केले आहे. देशातला मोठा जनविभाग उपजीविकेच्या साधनांपासून पूर्णतः वंचित झाला आहे. आपल्या घरांकडे पायी चालत जात असलेल्या मजुरांची काळीज फाडणारी उपासमार पाहून जनतेची काय अन्नान्नदशा झाली आहे, हे दिसत आहे. जनतेवर अशी दारूण परिस्थिती लादणाऱ्या सरकारचा देशभर सर्वत्र निषेध केला जाणार असल्याचे माकपने म्हटले आहे.
आपापल्या परिसरात लागू करण्यात आलेले नियम काटेकोरपणे पाळूनच आणि शारीरिक अंतर राखत, मास्कचा वापर करत रस्त्यावर येऊन निषेध करण्याची हाक पॉलिटब्यूरो दिली आहे.
निषेध दिनाच्या मागण्या पुढीलप्रमाणे :-
● इन्कम टॅक्स लागू नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला सहा महिने दरमहा ७५०० रु. रोख दिले पाहिजेत.
● सहा महिने दरडोई १० किलो धान्य मोफत पुरवले पाहिजे.
● मनरेगा अंतर्गत वाढीव मजुरी देऊन किमान २०० दिवस रोजगार पुरवला पाहिजे. शहरी गरिबांसाठीसुद्धा ही योजना लागू करा. बेरोजगारांना ताबडतोबीने बेरोजगार भत्ता जाहीर करा.
● राष्ट्रीय संपत्तीची लूट, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवा; कामगार कायदे रद्द करायचे धोरण मागे घ्या.