Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यावडिलांचे दु:ख विसरून शोधला यशाचा मार्ग शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील राहूलचे दहावीत...

वडिलांचे दु:ख विसरून शोधला यशाचा मार्ग शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील राहूलचे दहावीत यश

(अंबाजोगाई/प्रतिनिधी) वडिलांचे छायाचित्र नसलेल्या राहुल शिंदे याने हे दु:ख विसरून दहावीच्या परीक्षेत बाजी मारली. मंगईवाडी सारख्या छोट्या वस्तीतील या मुलाने मोठ्या जिद्दीने दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवत यशाचा मार्ग शोधला.

       तालुक्यातील बालाघाटच्या डोंगर रांगेत मंगईवाडी ही छोटीशी वस्ती आहे. या वस्तीच्या बाहेर स्वतःच्या शेतात रामदास शिंदे यांचे कुडाचे घर आहे. त्यात हे कुटुंब राहत आहे. २०१६ मध्ये रामदास शिंदे यांनी नापिकी व कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी संजीवनी यांनी मोलमजुरी करून मोठ्या जिद्दीने आपले कुटुंब चालवले. दोन मुलं व दोन मुली यांना सोबत घेऊन त्यांची शिक्षणही सुरू ठेवली. आई उसतोडीला गेल्यानंतर ही मुलं एकटीच घरी असायची, त्यांनी स्वतः ची कामे स्वत: करीत शाळा कधी चुकवली नाही. मोठ्या मुलीचे लग्न झाल्यामुळे राहुल व त्याची दुसरी बहीन जयश्री यांनी आपल्या वडिलांचे दु:ख विसरून शिक्षणाची कास सोडली नाही.

       

       घरापासून तीन किलोमिटर अंतरावर येल्डा येथे क्रांतीसिंह नाना पाटील विद्यालय आहे. या शाळेत तो इयत्ता पाचवीपासून चालतच जायचा. घरची सगळी कामे आटपून तो शाळा करायचा. सुट्टीच्या दिवशी आईसोबत त्याला मजुरीलाही जावे लागायचे, पुढे बहीन जयश्रीची दहावी झाल्याने ती अंबाजोगाईला शिक्षणासाठी आली. आधार माणुसकीच्या माध्यमातून तिची योगेश्वरी महाविद्यालयात सोय झाली. यावर्षी तिची बारावी झाली.

       

       राहुल हा हुशार असल्याने तो स्वत: बरोबरच शाळेचेही नाव उंचावणार याची खात्री शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांना होती. परंतू त्याची परिस्थिती हालाखिची असल्याचेही लक्षात आले. त्यामुळे शाळेचे तात्कालिन मुख्याध्यापक सुधाकर शिंदे यांनीही त्याला मदत केली. शिक्षकांनी त्याच्या अभ्यासक्रमावर लक्ष दिले. परिस्थितीला तोंड देत राहुलने दहावीत ९२ टक्के गुण घेत हे यश प्राप्त केले. त्याच्यात  जिद्द आणि धमक आहे. अश्या मुलांच्या भावी शिक्षणासाठी  समाजाने मदतीला येण्याची गरज आहे, असे मत “आधार माणुसकीचा ” उपक्रमाचे प्रमुख ऍड. संतोष पवार यांनी व्यक्त केले.

माणुसकीचा आधार

        आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना आधार देण्याचे काम येथील संत गाडगेबाबा सेवाभावी संस्था काम करते. सर्वेक्षणात मंगईवाडीचे हे कुटुंब या संस्थेच्या दृष्टिपथात आले. त्यानंतर या संस्थेचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी लोकसहभागातून या कुटुंबाला विविध प्रकारची मदत केली. राहुल शाळेत चालत जातो हे माहित झाल्यानंतर त्याला सायकल भेट दिली.

शाळेने आईचे प्रेम दिले

शाळेने मला आईचे प्रेम दिले. मुख्याध्यापकासह सर्व शिक्षकांनी अभ्यासाला कधी काही कमी पडू दिले नाही. आधार माणुसकीने मदतीबरोबरच शिकण्यासाठी बळ दिले. यापुढे वैद्यकीय क्षेत्रात करीअर घडवून आईचे स्वप्न पूर्ण करण्याच्या भावना राहुलने व्यक्त केल्या.

संबंधित लेख

लोकप्रिय