औरंगाबाद:-कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी औरंगाबाद शहरात संचारबंदी ला प्रारंभ झाला. या संचारबंदीच्या काळात कोणीही बाहेर पडू नये. पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. विनाकारण शहरात फिरणाऱ्या दुचाकी चालकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक बाबी मर्यादीत स्वरूपात आणि निर्बंधासह सुरू राहणार आहेत, ज्यामध्ये दुध विक्रेते यांना घरपोच दूध वितरणासाठी सकाळी सहा ते साडे आठ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे. सर्व खासगी आणि सार्वजनिक वैद्यकीय सेवा सुरू राहतील, कोणतेही रूग्णालय टाळेबंदीचा आधार घेऊन रूग्णांना सेवा नाकारणार नाही. न्यायालय आणि राज्य तसंच केंद्र शासनाची कार्यालयं, शासकीय पेट्रोलपंप आणि कंपनी संचलित पेट्रोल पंप सकाळी नऊ ते दुपारी दोन यावेळेत सुरू राहतील आणि केवळ शासकीय वाहनं आणि अत्यावश्यक सेवेतील वाहनास इंधन पुरवठा करतील. स्वयंपाकाचा गॅस सेवा घरपोच सुरू राहिल, शासकीय स्वस्त धान्य दुकाने सुरू राहतील, कृषी, बि-बियाणे, खते, किटकनाशक औषध, चारा दुकाने सुरू राहतील. याची वाहतूक चारचाकी वाहनातूक करण्यास परवानगी राहिल. दुचाकी वाहनास परवानगी असणार नाही, असं पांडेय यांनी आदेशात स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, जनता संचार बंदीच्या या कालावधीत उद्योग सुरू ठेवण्यासाठी अटी आणि शर्तींच्या अधीन परवानगी असणार असल्याचं पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी सांगितलं.
त्यानुसार जिल्ह्यात औषध आणि अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग, त्यांचे पुरवठादार चालु राहणार, यासाठी एमआयडीसी पोर्टल वरून यापूर्वी देण्यात आलेल्या परवानग्या ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तसंच औरंगाबाद शहरामधून उद्योग क्षेत्रामध्ये आणि परतीसाठी फक्त कार किंवा निश्चित बसमधूनच प्रवासाला परवानगी असल्याचं त्यांनी सांगितलं.
औद्योगिक वसाहतीमधील आणि शहराव्यतिरिक्त ईतर खाजगी जागेवरील उद्योग चालू राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. जे उद्योग समुह कामगारांची दहा दिवस कारखान्यात निवास व्यवस्था करणार आहे, त्यांना उद्योग चालू ठेवण्यास कोणतीही अडचण नसल्याचं ते म्हणाले. शेतमालाशी निगडीत प्रक्रिया उद्योगही चालु राहणार आहेत. आरोग्याबरोबरच अर्थचक्र चालू राहणे आवश्यक आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य करण्याचं आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केलं.