Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याBhosari Vidhan Sabha 2024 : आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांचे रुपडेच...

Bhosari Vidhan Sabha 2024 : आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांचे रुपडेच बदलून टाकले – संतोष लोंढे यांचे प्रतिपादन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – पिंपरी चिंचवड महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांचा विकास १९९७ पासून रखडला होता. आमदार महेशदादा लांडगे यांनी २०१७ पासून च-होली, मोशी, चिखली, डुडुळगाव, दिघी गावांच्या विकासाला गती देत या समाविष्ट गावांचे रुपडेच बदलून टाकले. ग्रामीण भागाला नेतृत्वाची संधी दिली. त्यातून आरक्षण, रस्ते विकसित झाले. एक वेगळी नगरी म्हणून या भागाची ओळख निर्माण झाली आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष लोंढे यांनी माध्यमांशी बोलताना केले. (Bhosari Vidhan Sabha 2024)

पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भामा आसखेड मधून २६७ एमएलडी पाणी आणण्यासाठी प्रयत्न, संतपीठ या कामांचा उल्लेख करत असतानाच बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार महेश दादा लांडगे यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख लोंढे यांनी केला.
संतोष लोंढे म्हणाले की, १९९७ पासून समाविष्ट गावांचा विकास रखडला होता. नितीन काळजे, राहुल जाधव या ग्रामीण भागातील नगरसेवकांना महापौरपदी संधी दिली. महापालिकेच्या निधीच्या माध्यमातून या भागाच्या विकासाला गती देत पालिकेच्या एकूण अंदाजपत्रकापैकी एक तृतीयांश बजेट समाविष्ट गावांच्या विकासासाठी खर्ची घातले.

पूर्वीचा ग्रामीण भाग आणि आत्ताचा भाग पहिला तर विकासाची कल्पना येते. या भागात रस्ते आदी सुविधा झाल्या. सोसायटी झाल्या. रस्ते झाले, महाविद्यालय आले, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून कष्टकऱ्यांच्या स्वप्नातले घर साकार झाले. चिखली येथे गायरानाच्या जागेवर अतिक्रमण होण्यापेक्षा तेथे चांगले प्रकल्प यावेत या भावनेने महेश लांडगे यांनी काम केले त्यातून या भागात सीओईपी सारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अभियांत्रिकी महाविद्यालय आले.

देशात सर्वात प्रथम संविधान भवन भोसरी मतदारसंघात साकारत आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी स्वतः स्थायी समिती अध्यक्ष असताना माझ्या काळात निविदा काढल्या गेल्या अर्थात त्याला महेशदादांचे पाठबळ होते याचा उल्लेख करावाच लागेल. त्यातून तळवडे, चिखली, दिघी, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली या भागाचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला असे लोंढे म्हणाले. (Bhosari Vidhan Sabha 2024)

पिंपरी चिंचवडला संतांचा वारसा आहे. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेल्या आळंदी आणि देहूच्या मध्यभागी महेशदादा लांडगे यांच्या पुढाकाराने संतपिठ साकारले. पाश्चात्त्य संस्कृती वाढत असताना विद्यार्थ्यांना संप्रदायाचे धडे देण्यासाठी केलेला हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरणारा आहे.

प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांचा साडेबारा टक्के जमीन परताव्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न गेले शासनापुढे पाठपुरावा करून सोडवला. पवना थडीच्या धर्तीवर भोसरी येथे इंद्रायणी थडी सुरू केली. त्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार व स्वतःच्या पावलावर भरारी घेण्याची संधी उपलब्ध करून दिली असे लोंढे म्हणाले. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी महेशदादा यांनी केलेल्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख संतोष लोंढे यांनी केला. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी आमदार महेश दादा लांडगे यांनी चाकण येथे आंदोलन केले.

मुंबईपर्यंत आवाज उठवला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत वकील नेमला व बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याचे काम केले. कोरोना महामारीच्या काळामध्ये महापालिका प्रशासनाने कसे काम करावे याबाबत आमदार महेश दादा लांडगे यांनी मार्गदर्शक सूत्रे घालून दिली. सातारा, सांगली मध्ये पूर आला त्यावेळी ते पूरग्रस्तांच्या मदतीला धावून गेले अन्नधान्याचे ५० ट्रक पाठविले पन्नास गोमाता दान केल्या असेही लोंढे म्हणाले. मोशी मार्केट यार्ड समोर १४० फूट उंच छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्यात येत आहे.

त्याची संकल्पना खुद्द आमदार महेश लांडगे यांची आहे. शास्ती कराची टांगती तलवार सामान्यांच्या डोक्यावर होती हा प्रश्न महेश दादा लांडगे यांनी सोडवला उपयोगिता शुल्काला स्थगिती दिली. न्यायालयाचा प्रश्न मार्गी लावला त्यामुळे काम करणारा आमदार म्हणून महेश दादा लांडगे यांची प्रतिमा असल्याचे संतोष लोंढे म्हणाले. कामाच्या बळावर महेश दादा तिसऱ्यांदा आमदार म्हणून निश्चित विजयी होतील असा विश्वास लोंढे यांनी व्यक्त केला.

संबंधित लेख

लोकप्रिय