भारतात बहुतांश घरात आपल्याला तुळशीचे एक तरी रोपटे सापडेल. तुळशीच्या रोपट्याचे विशेष महत्व आहे. तुळस घरातील एक महत्वपूर्ण रोपापैकी एक आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुळशीचे अनेक फायदे आहेत.पण बऱ्याच कारणांमुळे तुळशीचे रोपटे सुकते तर, कधी पानांवर कीड लागते. तर कधी तुळशीला चांगला बहर येत नाही. तुळशीच्या रोपाची विशेष काळजी घ्यावी लागते .काही नकळत घडणाऱ्या चुकांमुळे तुळस सुकते, किंवा तुळशीची पानं काळी-पिवळी पडतात (Tulasi Plant). पण तुळशीची पानं पिवळी-काळी का पडतात? तुळशीची पानं काळी पडू नये यासाठी काय करावे? तुळस सुकू नये यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? पाहूयात
तुळशीची पानं काळी का पडतात?
– तुळशीची पाने काळी पडण्याची अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी एक म्हणजे झाडांमध्ये कीटकांचा वाढणारा प्रादुर्भाव. हे कीटक आपल्याला झाडांवर दिसतीलच असे नाही. कारण हे कीटक मातीच्या आत देखील तयार होतात. ज्यामुळे तुळशीची पानं काळी पडू लागतात.
– तुळशीच्या पानांमध्ये होणारा बदल पाहून, त्वरित यावर उपाय करा. घरगुती कीटकनाशक बनवून झाडांवर त्याचा वापर करा. यामुळे हे कीटक नष्ट होतील, यानंतर झाडांची काळी पडलेली पाने छाटून काढा.
– तुळशीची पाने काळी पडण्याचे कारण पाणी देखील असू शकते. कमी किंवा अति प्रमाणात रोपट्याला पाणी देणे रोपट्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे पाने कमकुवत होऊन काळी पडू लागतात.
– तुळशीच्या रोपट्याला जास्त प्रमाणात पाणी देऊ नये. फक्त माती ओलसर ठेवण्यासाठी पुरेसे पाणी घाला.
– जास्त प्रमाणात रोपट्याला पाणी घातल्याने रोपट्याची मुळे कुजतात. नंतर हळूहळू कालांतराने त्याची पाने काळी होऊ लागतात. त्यामुळे पाणी जास्त घालणे टाळा.
– जमिनीतील ओलावा तपासण्यासाठी आपल्या बोटांचा वापर करा. बोट सहज मातीत गेले तर, कुंडीत पाणी घालू नका.