Friday, November 22, 2024
HomeNewsबारामतीचे सुपुत्र अक्षय प्रमोद काकडे यांना चीफ ऑफ इंडियन एअरफोर्स कमांडेशन मेडल...

बारामतीचे सुपुत्र अक्षय प्रमोद काकडे यांना चीफ ऑफ इंडियन एअरफोर्स कमांडेशन मेडल जाहीर !

बारामती : भारतीय वायुदलात स्क्वाड्रन लिडर असलेले बारामतीचे सुपुत्र अक्षय प्रमोद काकडे यांनी भारतीय वायुदलात केलेल्या सर्वांगिण कामगिरीची दखल घेत अक्षय यांना वायुदिनाचे औचित्य साधून चीफ ऑफ इंडियन एअरफोर्स कमांडेशन मेडल जाहीर झाले आहे.

संपूर्ण भारतातून निवडक वीस जणांना हे मेडल दिले जाते. भारतीय वायुदलाचे प्रमुख ही नावे निवडतात. सत्तावीस वर्षांच्या अक्षय काकडे यांना त्यांच्या वायुदलातील नेत्रदीपक कामगिरीची दखल घेत या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. सन 2015 मध्ये अक्षय काकडे यांची वयाच्या बाविसाव्या वर्षी भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली. त्या नंतर त्यांना फ्लाईट लेफ्टनंट म्हणून बढती मिळाली. त्या पाठोपाठ त्यांना आता स्क्वाड्रन लिडर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अवघ्या पाच वर्षांच्या काळात त्यांची नेत्रदीपक प्रगती झाली.

त्यांनी आजपर्यंत भारतीय वायुदलातील कर्नाटकातील बिदर, पश्चिम बंगालमधील कलाईकोंडा, राजस्थानमधील जोधपूर येथे काम केलेले असून आता ते हरियाणामधील सिरसा तळावर कार्यरत आहेत. वायुदलातील हॉक, पिलॅटस, सूर्यकिरण, मिग 27 ही विमाने त्यांनी चालविली असून आता ते सुखोई विमान चालवित आहेत. बारामतीतील विद्या प्रतिष्ठान विनोदकुमार गुजर बाल विकास मंदीर या शाळेत त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले असून त्यांनी औरंगाबादला नॅशनल डिफेन्स अँकेडमीची दोन वर्षे तयारी केली.

लाखो विद्यार्थ्यांमधून अक्षय यांची नॅशनल डिफेन्स अँकेडमीमध्ये निवड झाली होती. अत्यंत लहान वयात त्यांनी केलेली ही प्रगती युवापिढीपुढे एक आदर्श आहे. ग्रामीण पार्श्वभूमी असलेला एक युवक भारतीय वायुदलात कार्यरत होऊन वायुदल प्रमुखांचे पदक प्राप्त करतो हा अक्षय यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मराठी मुलेही आकाशाला गवसणी घालू शकतात हेच अक्षय यांनी त्यांच्या आजवरच्या खडतर प्रवासातून सिध्द केलेले आहे.

सोर्स सकाळ

संबंधित लेख

लोकप्रिय