Friday, May 17, 2024
Homeआरोग्यआशा स्वयंसेविका वेठबिगार नाहीत, त्या माणसं आहेत; आशा गटप्रवर्तक कृती समितीचा संतप्त...

आशा स्वयंसेविका वेठबिगार नाहीत, त्या माणसं आहेत; आशा गटप्रवर्तक कृती समितीचा संतप्त सवाल


सिंधुदुर्ग
 : आशा स्वयंसेविका वेठबिगार नाहीत, त्या माणसं आहेत, त्या ढोरं नाहीत, असा संतप्त सवाल आशा गटप्रवर्तक कृती समितीने सरकारला एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. सदर प्रसिद्धी पत्रक कृती समितीचे सलिम पटेल व सिंधुदुर्ग आशा वर्कर्स युनियनच्या विजयाराणी पाटील यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

महाराष्ट्र राज्यांत कोरोना १९ चा प्रादुर्भाव वाढला असून महाराष्ट्र सरकार अंशतः लॉकडाउन करण्याच्या मनस्थितीत आहे. प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत असून मृत्यू दरांत सुध्दा वाढ होत आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने सार्वत्रिक लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. 

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या मोहीमेतही “आशा”

कोरोना १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहिम हाती घेतली आहे. त्या कामामध्ये आशा स्वयंसेविकांना जुंपण्यात आले आहे. आरोग्यवर्धिनी अंतर्गत असंसर्गजन्य पाच प्रकारच्या आजारांची माहिती त्यांना घ्यावी लागते. यात घरातील ३० वर्षापुढील व्यक्तींचा फार्म भरावा लागतो. त्यासाठी प्रति फॉर्म सुमारे अर्धा तास लागतो. या कामासाठी शासनाकडून फक्त १० रूपये मोबदला ठरवण्यात आला आहे. आशांनी किमान दररोज पाच फॉर्म भरण्याचे उद्दीष्ट त्यांना देण्यात आले आहे. त्यांनी जमा केलेल्या माहितीचा फोल्डर तयार करून प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन द्यावा लागतो व ऑनलाईन फॉर्म भरण्याकरीता मदत करावी लागते. कोविड व्हॅक्सीन अंतर्गत ४५ व ६० वर्षे वयाच्या व अतिगंभीर रूग्णांच्या याद्या तयार करण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर टाकली आहे. 

“आशा” ना अॅनिमिया मुक्त भारत अभियानचे काम 

आशांना कुटुंब व पाणी स्वच्छतेचा सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. अॅनिमिया मुक्त भारत अभियान या मोहिमेत ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना रक्तवाढीच्या गोळया आठवड्यातून एकदा देण्याचे काम आशांवर लादण्यात आले आहे. सद्य परिस्थितीत शाळा बंद असल्याने आशांना घरोघरी जावून गोळया वाटाव्या लागतात. आशांच्या कार्यक्षेत्रांतील १ ली ते ४ थी तील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळया वाटपाचे काम आशांना करावे लागते व त्यासाठी त्यांना घरोघरी फिरावे लागते. २० ते ४ ९ वयोगटांतील महिलांना रक्तवाढीच्या व कॅल्शीयमच्या गोळ्या वाटण्याचे काम आशांना सांगण्यात येते. शाळा बंद असल्यामुळे धर्नुवाताचे इंजेक्शन देण्यासाठी लसीकरण सत्रामध्ये लाभार्थी बोलावण्याचे काम आशांवर लादण्यात आले आहे.

मार्च पासून ग्रामीण व शहरी भागांत आशा व गटप्रवर्तकांची सक्तीची डयूटी लावण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये आशा व गटप्रवर्तकांना सकाळी ९ ते सायं. ६ पर्यंत सक्तीची डयूटी देण्यात येते. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून आशांना लाभार्थीची रॅपिड टेस्ट करावी लागते. दैनंदिन लसीकरणाच्या आढाव्यापासून शासनाच्या सर्व योजनांचा दैनंदिन आढावा गटप्रवर्तकांकडून घेतला जातो. गटप्रवर्तकांना २० ग्रामिण भेटी देण्याचे त्यांचे मुळ काम असताना अशा प्रकारचे काम कसे व कधी करणार , हे शासनाला कळत नाही का ? असा संतप्त सवालही केला जात आहे.

कामे अनेक पण मोबदल्याचे काय ?

धर्नुवानाचे इंजेक्शन, काविड लसीकरण कैम्प मध्ये हजर रहाणे, लाभार्थ्याची रोपड टेस्ट घेणे इ . व दररोज सुमारे ८ ते १० तास काम करणे, या कामांबद्दल त्यांना कोणताही मोबदला देण्यात येत नाही. आरोग्यवर्धीनीमध्ये काम केलेल्या आशांना त्याच्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. ही सर्व कामे करावी लागल्यामुळे आशा व गटप्रवर्तकांच्या नियमीत कामावर दुष्परिणाम होत आहे व त्यांना प्रचंड कामाचा ताण सहन करावा लागत आहे. 

मानधनवाढीपासून अनेक आशा वंचितच

१७ जुलै २०२० च्या शासकीय आदेशानुसार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात २००० रूपये ची प्रतिमाह वाढ करण्यात आली. बहुसंख्य महानगरपालिकांनी ही मानधनवाढ दिलेली नाही. ज्या महानगरपालिकांनी ही मानधनवाढ दिली ती काही तरी निमित्त सांगून प्रतिमाह ४०० रूपये कमी दिलेले आहेत. काही ठिकाणी मानधनवाड नोव्हेंबर २०२० पर्यंत दिली. त्यानंतर ही मानधनवाढ देण्यात आलेली नाही , आशा स्वयंसेविकांना दिल्या जाणा – या प्रतिदिन ३०० रू. विशेष भत्त्याची रक्कम बहुसंख्य ठिकाणी दिलेली नाही. कोरोना काळामध्ये आशा स्वयंसेविकांना दरमहा १००० रू. प्रोत्साहन भत्याची रक्कम बहुसंख्य ठिकाणी बंद करण्यात आली आहे. 

माझे कुटूब माझी जबाबदारी या योजनेतर्गत देय प्रतिदिन १५० रू. बहुसंख्य ठिकाणी देण्यात आलेले नाहीत. आशा स्वयंसेविकांना कुष्ठरोग , क्षयरोग व सांसर्गिक रोग यांच्या सर्वेक्षणाचे पैसे थाबविण्यात आलेले आहेत. 

शासकीय सेवेत कायम करा 

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकाना भविष्यामध्ये ७ ते ८ तास ड्यूटी करावी लागणार आहे, म्हणून त्यांना शासकीय सेवेत कायम केले पाहिजे, अशी आशा व गटप्रवर्तकांची मागणी आहे. मागण्यांचा विचार न झाल्या तीव्र आंदोलनाचा इशारा कृती समितीचे एम.ए.पाटील, सलीम पटेल, सुमन पुजारी, भगवान देशमुख, श्रीमत घोडके, सुवर्णा कांबळे, नेत्रदिपा पाटील, राजू देसले, रंजना गारोळे, स्वाती धायगुडे यांंनी दिला आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय